‘पॉवर’ पॉइंट : नात्यांमधलं ‘व्हॉट्सअप पॉलिटिक्स’ | Whatsapp | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Whatsapp
‘पॉवर’ पॉइंट : नात्यांमधलं ‘व्हॉट्सअप पॉलिटिक्स’

‘पॉवर’ पॉइंट : नात्यांमधलं ‘व्हॉट्सअप पॉलिटिक्स’

sakal_logo
By
हर्षदा स्वकुळ

‘तिनं/त्यानं मेसेज केला, व्हॉट्सअपवर ब्लू टिकमार्कही दिसला; पण रिप्लाय आलाच नाही.’ ‘समोरून मेसेज आला, मुद्दामहून तो वाचला, त्याला ब्लूटिकमार्क गेला; पण रिप्लाय केलाच नाही.’ कदाचित ही वाक्यं ऐकायला सारखी वाटू शकतात; पण आजकाल हे ‘व्हॉट्सअप पॉलिटिक्स’ डोकं खायला लागलंय.

‘नात्यांमध्ये राजकारण नसतं’ या गोष्टीवर माझा फारसा विश्वास नाही. फक्त ते राजकारण धडधडीत दिसत नाही. काहीवेळा कपटी नसतं, इतकाच काय तो फरक. लोक कॅलक्युलेटेड राहतातच आणि त्यात काही गैर नाही. मात्र, हल्ली नात्यांतलं हे ‘पॉलिटिक्स’ सोशल मीडियावर खेळलं जाऊ लागलंय. ही अगदी सरसकट जाणवलेली गोष्ट आहे. त्यामुळे व्यक्तीश: घेऊ नका.

कुटुंबाचा ग्रुप व्हॉट्सअपवर आला आणि नको तितका संपर्क वाढला. एकत्र कुटुंबात झालं नसेल; पण या ग्रुप्समध्ये घुसमटायला लागलं. आमच्या ओळखीच्या एक जण आहेत. त्या स्वत: मेसेज करून, वरून इन्फर्मेशनमध्ये जाऊन किती जणांनी वाचला, किती जणांनी वाचून रिप्लाय केला, मग पुढच्या वेळी कुठल्या व्यक्तीनं किती वेळात रिप्लाय केला, त्याप्रमाणे त्याला रिप्लाय करण्याची गणितं मांडत असतात. आता तुम्ही म्हणाल, की ‘बराच वेळ दिसतोय त्यांच्यांकडे’; पण रिप्लाय देण्याच्या वेळांची गणितं मांडायला या सोशल मीडियात हल्ली १० सेकंदही लागत नाहीत अहो.

अजून एक खतरनाक पॉलिटिक्स दिसतं ते म्हणजे समजा चार जावा, चार नणंदा एकाच ग्रुपमध्ये असतील, तर कोण कुणाला किती फास्ट रिप्लाय देतंय, याची हिस्टरी मोबाईल ठेवो न ठेवो, ती सगळ्या बायकांच्या डोक्यात फिक्स असते. इतकी अफाट मेमरी येते कुठून, असा मला प्रश्न पडतो. घरातल्या लहान बाळाकडून चुकून मोबाईल खेळताना एखादा मेसेज उघडला, आणि समोरच्याला ‘ब्लू टीकमार्क’ गेला, तरी त्या बाळाकडे त्रासिक नजरेनं पाहणाऱ्या आया मी स्वत: बघितल्यात. ‘‘अरे देवा, हिला आता वाटेल मी वाचला मेसेज. मला तर रिप्लाय करायचाच नव्हता,’’ या जागतिक विवंचनेत त्या असतात. मग पटकन त्या ‘सेटिंग’ बदलायला जातात; पण तोपर्यंत काळाची गाडी चुकलेली असते ही वैश्विक जाणीव त्यांना होते.

हे कितीही हसण्यावारी नेलं, तरी असं नात्यांमध्ये शिरकाव करणारं राजकारण पुढच्या काळात गडद होण्याची मला भीती वाटते. उत्तराची वाट बघण्याची मजा यातून केव्हाच गेलीये; पण केलेला मेसेज वाचला का, नाही तर मुद्दामहून नाही की अजून काही, या गणितांत नात्यांची बेरीज चुकतीये.

‘अगं मी मेसेज केला होती की तुला,’ असं तोंडावर फेकलं, की ‘माझी जबाबदारी मी पार पाडली’ या थाटात अनेक माणसं वावरतायत. डोळ्यांतून घडणारा संवाद, स्पर्शातून समजावता येणारी भाषा, ही मेसेजच्या छोट्याशा चौकटीत अडनिड्या वयाची मुलं अडकवायला लागलीच आहेत. मात्र, आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या कित्येक व्यक्ती हल्ली या चौकटीत अडकल्यात. ज्या एके काळी एकत्र कुटुंबात राहिल्यात, घरातलं चहाचं भांडं सतत गॅसवर रटरटत असणाऱ्या काळात जगल्यात. अशा व्यक्ती तरी किमान या डिजिटल राजकारणात अडकू नयेत असं मला मनापासून वाटतं. नातं टिकवणं म्हणजे एक मेसेज टाकणं, एक स्माईली पाठवणं नाही, हे आम्हाला तुम्ही मेसेजमधून समजावू नका, इतकीच लहान म्हणून अपेक्षा.

loading image
go to top