ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : ट्रेंडिंग इराणी मावा केक

इराणी मावा केक ट्रेंड गेले काही दिवस सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अनेक जणी हा केक घरी बेक करून पोस्ट करत आहेत.
Mava Cake
Mava CakeSakal

इराणी मावा केक ट्रेंड गेले काही दिवस सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अनेक जणी हा केक घरी बेक करून पोस्ट करत आहेत, त्यावर कविता किंवा मिम्स टाकल्या जात आहेत, रेसिपीबाबत चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मी या केकची रेसिपी पोस्ट केली आणि अक्षरशः हजारो गृहिणींनी तो करून पाहिला. मागील वर्षी लॉकडाउनमध्ये डोलगोना कॉफी ट्रेंडिंग होती, तर या वर्षी माझा इराणी मावा केक.

गेलं शतकभर मावा केक लोक आवडीनं खात आहेत. हा मुंबईकरांचा जिव्हाळ्याचा विषय. ‘मेरवान’चा गरमागरम मावा केक आणि चहा हा आवडता नाश्ता. हा केक प्रथम कोणी तयार केला हा वादाचा विषय आहे; पण तो ‘मेरवान’चा असो किंवा पुण्यातील रॉयल बेकरीचा, खवय्यांना दोन्ही तितकेच प्रिय.

मावा केक म्हटलं, की इराणी कॅफेमधील इतकं माहीत असतं; परंतु तो तयार कसा झाला असेल बरं?

हा केक इराणी म्हटला तरी भारतीय आहे बरं का. कसा ते ऐका. साधारण सव्वाशे वर्षांपासून मुंबई, पुणे इथं इराणी कॅफे आहेत. चहाकरता तिथं सातत्यानं राबता असे. त्याकरता त्यांना अनेक लिटर दूध दिवसभरात वापरावं लागे. परंतु शंभर वर्षांपूर्वी मुंबईसारख्या अतिशय गरम शहरात दूध दीर्घकाळ टिकवणं हे मोठं आव्हान होतं. तेव्हा दूध सातत्यानं उकळत ठेवून वापरलं जाई. त्यामुळे रात्रीपर्यंत दूध उकळून तयार झालेला मावा भरपूर साठत असे. या माव्याचं करायचं काय म्हणून केकमध्ये वापरून पाहिला गेला आणि तयार झाला मावा केक. या चविष्ट, मऊ, सुगंधी केकच्या लोक प्रेमात पडले आणि तेव्हापासून पिढ्यान्‌पिढ्या हे प्रेमप्रकरण सुरू आहे.

हा केक भारतीय पदार्थ मावा वापरून तयार झालेला, वेलची, काजू किंवा बदाम पेरलेला, भारतीय मिठाईच्या चवीशी साधर्म्य असलेला म्हणून भारतीयांना प्रिय; पण याचं मूळ शोधलं तर त्याच पठडीतले काही पदार्थ सापडतात. मिडलईस्टमध्ये बेक केलेला गोड पदार्थ ‘रेवानी’ प्रसिद्ध आहे. रेवानी म्हणजे रवा वापरून केलेले काही गोड पदार्थ. यात ‘बासबोसा’ हा दही आणि भरपूर साजूक तूप वापरून बेक केलेला गोड पदार्थ, ‘पोर्टाकल्ली रेवानी’ हा दही, मैदा वापरून केलेला पदार्थ, ‘रेवानी तातलीसी’ हा अंडं वापरून केलेला पदार्थ अशा अनेक रेसिपीज प्रचलित आहेत. हे पदार्थ बेक करून थंड झाल्यानंतर त्यावर शुगर सिरप टाकलं जातं. यातलीच एखादी रेसिपी पारशी लोकांनी त्यांच्यासोबत आणून त्यात बदल करून केक तयार केला गेला असावा.

त्या काळी दक्षिण मुंबईत ब्रिटिश कंपन्यांची कार्यालयं होती आणि ब्रिटिश लोक तामझामासहित दुपारच्या चहासोबत केक आवडीनं खात असावेत. त्याचसोबत भरपूर भारतीय कर्मचारीही चहा आणि नाश्त्याकरता कॅफेमध्ये येत-जात असत. मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यात क्षणभर थांबून झटपट काहीतरी खाणं हा त्यांच्या आयुष्याचा भाग असतो. अशा वेळी हातात पकडून चालत खाता येऊ शकेल असे पदार्थ मुंबईकरांना भावले. चालताचालता खाता येऊ शकणारे वडापावच्या आधी असेच काही पदार्थ मुंबईकरांची छोटीशी भूक भागवत असतील. भारतीयांना आवडणारा दुधाचा चहा आणि ब्रिटिशांना आवडणारे केक, तेसुद्धा खास भारतीय चवीचे यामुळे हे इराणी कॅफे त्या काळात भलतेच ट्रेंडिंग होते.

शतकभरापेक्षा जास्त काळ भारतीय मनावर राज्य करणारा मावा केक यंदा पुन्हा ट्रेंडमध्ये आहे. रवा, मैदा, तेल, बटर आणि मिल्क पावडर याचा एकत्रित परिणाम केकची चव द्विगुणित करणारा आहे. यात मावा वापरला नसला, तरीही मिल्क पावडर, बटर आणि रव्यानं ती चव साधता येते. माव्यात अधिक प्रमाणात फॅट असतं आणि केकमध्ये मात्र प्रत्येक पदार्थ योग्य प्रमाणातच आवश्यक असतात. म्हणून यात मिल्क सॉलिड्स आणि फॅट निराळ्या स्वरूपात वापरायचे तरीही परिणाम मात्र हवा तोच येतो. तुम्हीसुद्धा करून पाहा हा ट्रेंडिंग इराणी मावा केक.

इराणी मावा केक

साहित्य : १ वाटी जाडा रवा, १/२ वाटी आंबट दही, २ वाटी मैदा, १/२ वाटी कॉर्नफ्लोअर, ३/४ वाटी दूध पावडर, ४ अंडी, १/२ वाटी बटर, १/२ वाटी तेल, चिमूटभर मीठ, १ वाटीभरून बारीक साखर, ३ टेबलस्पून व्हॅनिला इसेन्स, २ टेबलस्पून बेकिंग पावडर, १/२ टेबलस्पून बेकिंग सोडा

पूर्वतयारी :

  • आंबट दह्यात रवा मिक्स करून घ्या. रवा श्रीखंडाइतका घट्ट भिजेल इतपत दही घालायचे आहे. गरजेनुसार कमी-जास्त प्रमाणात दही वापरा. ४ ते ६ तास रूम टेम्प्रेचर वर ठेऊन द्या. आता हे भिजवलेलं दही रवा वापरून लगेच केक तयार करा किंवा फ्रिजमध्ये २ दिवस ठेवून हवा तेव्हा केक तयार करा.

केक कृती :

  • रवा फ्रिजमध्ये ठेवलेला असल्यास किमान अर्धा तास बाहेर काढून ठेवा.

  • मैदा, कॉर्नफ्लोअर, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, दूध पावडर, मिक्स करून किमान ४ वेळेस चाळून घ्या. बटर, तेल, अंड, साखर एकत्र करून फेटून घ्या. त्यात भिजवलेल्या रव्याचे मिश्रण टाकून नीट मिक्स करा. त्यात थोडा थोडा मैदा मिक्स करत जा. आणि सर्व एकरूप झाल्यावर त्यात व्हॅनिला इसेन्स आणि आवडत असल्यास रंग टाका.

  • केक टिनमध्ये बटरचा हात फिरवून त्यावर मैदा भुरभुरावा. या मिश्रणात २ केक तयार होतील. केक टिनमध्ये केकचं मिश्रण ओतून घ्या आणि १८० डिग्री वर ४० ते ४५ मिनिटे बेक करा. वरील मिश्रणात १८ ते २० कपकेक तयार होऊ शकतील.

  • गरमागरम मावा केक चहासोबत सर्व्ह करा किंवा बटर क्रीम लावून सजावट करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com