ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : जगावेगळ्या पोह्यांची ‘कॉम’कथा

पोहे म्हटले, की सुदामा आणि भगवान श्रीकृष्ण यांची कथा आठवते. मित्राने दिलेल्या मूठभर पोह्यांनीदेखील भगवंत प्रसन्न झाले. या कथेवरून हेही कळते, की किती प्राचीन काळापासून भारतात पोहे तयार केले जात असत.
Poha
PohaSakal

पोहे म्हटले, की सुदामा आणि भगवान श्रीकृष्ण यांची कथा आठवते. मित्राने दिलेल्या मूठभर पोह्यांनीदेखील भगवंत प्रसन्न झाले. या कथेवरून हेही कळते, की किती प्राचीन काळापासून भारतात पोहे तयार केले जात असत.

भारतात ज्या पद्धतीने पोहे तयार केले जातात त्याच पद्धतीने आशियामध्ये काही देशांत पोहे तयार करतात. त्यातील एक प्रकारचे खास पोहे म्हणजे हिरवे पोहे. व्हिएतनाममधील या हिरव्या पोह्यांना ‘कॉम’ म्हणजे ‘यंग ग्रीन स्टीकी राईस’ असेही म्हटले जाते. व्हिएतनाममधील उत्तरेकडील वॉंग नावाच्या लहानशा खेड्यात हे पोहे तयार होतात. शरद ऋतूत जेव्हा तांदूळ तयार झालेला असतो, परंतु अजूनही कोवळा असतो अशा मोक्याच्या वेळी हा भात काढला जातो. शक्यतो भात पहाटे काढला जातो आणि लगोलग त्यावर काम सुरू होते. वॉंग खेड्यात या काळात प्रत्येक घरात हे पोहे तयार केले जातात. काढलेला भात पाखडून घेतात आणि पाण्यात टाकतात. भात कोवळा असल्याने तो जास्त काळ भिजवायची गरज पडत नाही. पाण्यात टाकून वर तरंगणारा पोकळ भात वेगळा करतात आणि खाली उरलेला भरीव भात बाहेर काढून लगेच भाजायला मोठ्या कढईत टाकतात. भाजण्याच्या पूर्वापार पद्धतीनुसार चुलीवरच भात भाजला जातो. योग्य वेळी भाजलेला भात बाहेर काढून तो लगेच कांडायला घेतला जातो. कांडण्याकरता एका वेळेस केवळ आठशे ग्रॅम भातच घेतला जातो.

कांडतानासुद्धा थोड्या वेळाने बाहेर काढून पाखडून पुन्हा कांडायला टाकला जातो. पुन्हा शेवटचे पाखडतानादेखील त्याची वर्गवारी करून उत्तम प्रतीचा बाजूला काढून घेतात. असे तीन ते चार प्रतीचे पोहे त्यातून तयार होतात. अर्थात उत्तम प्रतीचे पोहे चढ्या भावाने विकले जातात. आपल्याकडे जसा हुरडा खायची पद्धत आहे, तशीच तिथे तांदळाचा हा वेगळ्या प्रकारचा हुरडा खायची पद्धत आहे. हुरड्याप्रमाणेच तांदळाचे हे पोहेदेखील ताजे खाण्यात जास्त मजा आहे. तयार पोहे लगोलग बाजारात विकायला पाठवले जातात. या पोह्यांना एक खास गंध आणि स्वाद असतो जो फारफार तर २४ तास टिकतो. हे खायचीसुद्धा खास पद्धत आहे. हे पोहे चिमूटभर घेऊन तोंडात टाकले जातात आणि नंतर बराच वेळ तोंडात ठेवून मऊ करून हळूहळू चावून खाल्ले जातात. अशाच पद्धतीने खाल्ले तर त्याची खरी चव कळते असे म्हणतात. त्यापासून काही पाककृतीसुद्धा तयार केल्या जातात. जसे की, ‘ग्रीन स्टीकी राईस केक’ ज्यात मुगाचे पुरण भरलेले असते, नारळाच्या दुधात भिजवलेले भरपूर खोबरे घातलेले पोहे, ‘कॉम झामो’ एक प्रकारचा केक जो संध्याकाळच्या चहासोबत खाल्ला जातो, हिरव्या पोह्याचे आवरण करून तळलेली कोलंबी इत्यादी. मुळात सुवासिक आणि चिकट तांदळापासून हे पोहे तयार केल्याने त्याला एक खास गंध असतो आणि ते अतिशय चिकट असतात. हे भिजवून शिजवले, तर चिकट पेस्ट तयार होते आणि हे त्याच्यापासून तयार केलेल्या पदार्थांचे वैशिष्ट्य आहे. 

या पोह्यांचा शोध कसा लागला याची एक सुरस कथा आहे. एकदा वॉंग गाव प्रचंड मोठ्या चक्रीवादळात सापडले, पाठोपाठ पाऊस आणि पूर आला. गावातील सर्व अन्नाचा साठा वाहून गेला. लोकांचे अन्नाविना हाल होऊ लागले. तेव्हा शेतात उरलेला हिरवा भात काढून लोकांनी भाजून त्याचे पोहे करून खाल्ले आणि या पोह्यांनी त्यांना जीवनदान दिले. त्याची चव त्यांना इतकी भावली, की पुढील वर्षी आठवणीने त्यांनी तसेच पोहे तयार करून देवाला नैवेद्य दाखवला आणि सर्वांना वाटले. अगदी राजापर्यंत या पोह्यांची महिमा पोचली. राजानेदेखील त्याची चव घेतली आणि त्याचे नामकरण केले ‘कॉम’ म्हणजे ग्रीन स्टीकी राईस. हे खास पोहे व्हिएतनाम आणि इंडोनेशिया या देशात नैवेद्य आणि शुभकार्यासाठी वापरले जातात. कधी व्हिएतनाम किंवा इंडोनेशियाला गेलात तर या जगावेगळ्या पोह्यांची चव जरूर घ्या.

चुडा कदंब

साहित्य : २ कप जाड पोहे लाल / सफेद, १ कप खवलेले ओले खोबरे, ४ चमचे तूप, ४ चमचे किसलेला गूळ, अर्धा चमचा वेलची पावडर, मूगडाळीइतका भीमसेनी कापूर.

कृती :

  • पोहे कढईत कुरकुरीत होईपर्यंत भाजावेत.

  • थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पीठ करून घ्यावे.

  • एका भांड्यात काढून त्यात गूळ, तूप, ओले खोबरे टाकून हाताने सर्व मिक्स करून घ्या.

  • त्यात वेलची आणि कापूर टाकून मिक्स करा आणि लगेच सर्व्ह करा.

  • ओडिशामधील पुरी येथे जगन्नाथांना या पदार्थाचा नैवेद्य दाखवला जातो आणि हा ओडिशामधील सर्वांत आवडता नाश्त्याचा पदार्थ आहे. या सोबत तिखट डाळ डालमा किंवा गोड रबडी खाल्ली जाते. याच पद्धतीने दक्षिणेत याचे लाडू तयार केले जातात ज्यात साखर घातली जाते. या पदार्थाचे दुसरे नाव ‘चुडा घास’ असेही आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com