esakal | ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : केल्याने ‘खाद्या’टन
sakal

बोलून बातमी शोधा

Food

ट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : केल्याने ‘खाद्या’टन

sakal_logo
By
मधुरा पेठे

देशाटन करताना अनेक अचंबित करणारे अनुभव येत असतात. अनेक न पाहिलेल्या, ऐकलेल्या गोष्टी अनुभवायला मिळतात. नृत्य आणि व्यवसायानिमित्ताने माझे भरपूर फिरणे झाले आणि त्यात आलेल्या अनुभवांनी माझे खाद्यविश्व समृद्ध केले आहे. शहरात राहणाऱ्या भारतीयांना उशिरा जेवून झोपायची सवय आहे; परंतु इतर अनेक देशात संध्याकाळी सातच्या आत जेवण करून साडेआठला बेड टाईम असतो. २१ वर्षांची असताना अमेरिकेत प्रथमच जाणार म्हणून मोठी खाऊची बॅग भरून नेली होती. तिथे संध्याकाळी साडेसहा वाजता डिनर होत असे, त्यामुळे रात्रीपर्यंत कडकडून भूक लागे. मग आमचे भारतीय डिनर घरून आणलेल्या सुक्या फराळावर होत असे. असाच काहीसा अनुभव सिंगापूरमध्ये आला. तिथे ९ वाजता शहर बंद व्हायला सुरुवात होत असे, दुकान ९ वाजता बंद आणि पाठोपाठ फूड कोर्टसुद्धा. जरा उशीर झाला, की काही मिळत नसे. मग मोर्चा ‘सेवन इलेव्हन’ नावाच्या छोट्याशा दुकानाकडे वळवायचा आणि तिथे मिळेल ते बेचव फ्रोजन मिल घेऊन खावे लागे.     

नवरा ट्रेनिंगकरता फ्रान्समध्ये ‘ले फॉंटे’ नावाच्या फ्रेंच कॅसलमध्ये काही दिवस वास्तव्यास होता. तिथेही संध्याकाळी साडेसात वाजता डिनर सुरू होत असे. टिपिकल ७ कोर्स फ्रेंच मिलमध्ये इवलेइवले पोर्शन वाढले जातात. पोळी-भाजी, भात-आमटी खाणाऱ्या भारतीयांना हे इतकेसे वाढलेले पदार्थ खाऊन त्यांचे पूर्ण पोट भरतच नाही. तसेच काहीसे फ्रेंच मुलींबाबतही होते; पण त्या आपल्या हुशार असतात. असे म्हणतात, की फ्रेंच मुलीना जेवायचे आमंत्रण आल्यास त्या घरी अर्धे जेवण जेवून जातात- कारण त्यांना पार्टीमध्ये मी अगदी कमी जेवते असे भासवायचे असते, आहे की नाही गंमत?

नवीन ठिकाणी नवीन पदार्थ चाखताना अनेक गमतीसुद्धा होत असतात. सावधगिरी दाखवली तर ठीक, नाही तर काय उदरात जाईल याचा नेम नसतो. अमेरिकेच्या दौऱ्यावर सातत्याने अमेरिकन जेवण जेवून आम्ही मुले अगदी कंटाळलो होतो. १५ दिवस झाल्यावर पावभाजी-पाणीपुरीची स्वप्ने पडायला लागली. एक दिवस लंचकरता लालभडक पावभाजीसदृश पदार्थ दिसला. वाढायला हात पुढे करणार तोच आमच्या गुरूंनी थांबवले. म्हणाले, ‘‘हे नको घेऊ.’’

‘बीफ बॉल्स इन टोमॅटो सॉस’ हा पदार्थ होता. मी पुढे गेले; मात्र मागून बऱ्याच वेळाने आलेल्या काही जणांनी मात्र पावभाजी समजून आनंदाने त्यावर ताव मारला. त्यावेळी मात्र आमच्या गुरूंनी ‘त्यांना सांगू नको’ असे सांगितले. त्यांच्या अर्ध्यावर आलेल्या भोजनात खंड नको म्हणून आम्ही शांत राहिलो. तसाच अनुभव सिंगापूरमध्ये आला. काम आटोपून जेवायला जायला उशीर झाला होता. शेवटची ऑर्डर माझी होती. मी नेहमीप्रमाणे लक्सा ऑर्डर केले. लक्सा म्हणजे नारळाच्या दुधातील कोलंबी आणि नूडल्सचे सूप. गरमागरम सूप प्यायले आणि खाली असलेल्या नूडल्स घ्याव्या म्हटले, तर खाली कोलंबीऐवजी भरपूर ऑक्टोपसचे काप होते. या आधी कधीही ऑक्टोपस खाल्ला नसल्याने ते दृश्य पाहून ढवळून आले. माझ्यापुढे यक्षप्रश्न उभा राहिला- पुढे असलेले अन्न ब्रह्म म्हणून खावे की रात्रभर उपाशी राहावे? कारण त्यानंतर फारसे काही खायला मिळाले नसते.

दुसऱ्या दिवशी मीटिंगमुळे ब्रेकफास्ट करायलाही वेळ मिळणार नव्हता. तेव्हा समोर आलेले त्यातील सर्व परिचित पदार्थ डोळे बंद करून खाऊन टाकले. त्याच ट्रिपमध्ये ‘हाय टी’मध्ये अगदी एक सँडविच तोंडात टाकले, तर ते निघाले कच्च्या फिशचे सँडविच. सर्वांसमोर ते तोंडातून बाहेर कसे काढणार म्हणून तसेच डोळे बंद करून खावे लागले. कच्च्या माश्याच्या चवीने खरेच ब्रह्मांड आठवले. पण नंतर तिथेच स्मोक सालमन आणि कॅव्हीयरची आवड लागली. या दोन पदार्थांकरता मी ‘हाय टी’ची वाट पाहत असे.

जितके नवीन चाखायला जाऊ, तितके आपल्या खाद्यविश्वात अनेक स्वादांची अनुभवांची भर पडत जाते. प्रत्येक पदार्थासोबत अनेक आठवणींचा मुरांबा तयार होतो आणि हा मुरांबाच पुढे चिरकाल सोबत राहतो. अशाच काही मुरांब्यासारख्या आठवणी पुढे कधी तरी. तूर्त मुरांब्यासारखाच आंबट, गोड, तुरट चवींचा एक पदार्थ पाहूयात आज.

सॉम टॅम : थाई पपई सॅलड

साहित्य -

दीड कप कच्ची पपई बारीक उभे काप केलेले, २ लसूण पाकळ्या, २ ते ३ लवंगी/ थाई मिरच्या, अर्ध्या लिंबाएवढा गूळ आणि अर्धा चमचा साखर, २ ते ३ फ्रेंच बीन्स लहान तुकडे, ३ टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूट, १ टेबलस्पून सुकट (वाळवलेली लहान कोलंबी), २ टेबलस्पून लिंबाचा रस, २ टीस्पून चिंचेचा कोळ, दीड टीस्पून थाई फिश सॉस, अर्धा कप टोमॅटो.

कृती -

  • कच्च्या पपईचे काडेपेटीच्या काडीसारखे अगदी बारीक उभे काप करावेत आणि बर्फाच्या पाण्यात १५ मिनिटे ठेवावे.

  • सॅलड करायच्या आधी उपसून त्यातील शक्य तितके पाणी काढून टाकावे.

  • मोठ्या दगडी/ लाकडी खलबत्यात लसूण मिरची ठेचून घ्यावे. त्यातच साखर आणि गूळ घालावा आणि सर्व एकजिनसी करून घ्यावे.

  • यातच सुकट, फ्रेंच बीन्स, शेंगदाणे कूट घालून थोडे ठेचावे.

  • यात फिश सॉस, चिंच कोळ आणि लिंबाची साल टाकून सर्व बत्याने घोटावे. लिंबाच्या सालीची चवदेखील यात येते.

  • यात कापलेला पपई, टोमॅटो टाकून नीट मिक्स करावे आणि कापलेल्या लिंबाच्या फोडीसोबत सर्व्ह करावे.

  • यात मीठ टाकायची आवश्यकता नाही कारण फिश सॉस खारट असतो.

  • हे सॅलड ग्रील फिश चिकन आणि गरम भातासोबत देतात, आपल्याकडे फिश फ्रायसोबत हे फारच छान लागेल.

loading image