घरकुल अपुले : पुरणपोळी आणि उकडीचे मोदक

श्रावण आणि भाद्रपद म्हणजे पुरणपोळी आणि उकडीचे मोदक. श्रावणाची चाहूल लागते व्रतवैकल्ये, सणवार यांची यादीच समोर येते.
Puranpoli and uakdiche Modak
Puranpoli and uakdiche Modaksakal
Summary

श्रावण आणि भाद्रपद म्हणजे पुरणपोळी आणि उकडीचे मोदक. श्रावणाची चाहूल लागते व्रतवैकल्ये, सणवार यांची यादीच समोर येते.

- मीनल ठिपसे

श्रावण आणि भाद्रपद म्हणजे पुरणपोळी आणि उकडीचे मोदक. श्रावणाची चाहूल लागते व्रतवैकल्ये, सणवार यांची यादीच समोर येते. नागपंचमी, मंगळागौर, श्रावणी शुक्रवार या निमित्ताने गोडाधोडाचे केले जाते. यात पुरणाच्या नैवेद्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुरणपोळी तर अत्यंत आवडता पदार्थ.

मराठीमध्ये काही ठिकाणी चपातीसाठी पोळी हा शब्द रूढ आहे. पोळी हा शब्द पल या धातूपासून बनलेला आहे. याचा अर्थ असा आहे, की विस्तार, पांगापांग आणि संरक्षण करणे. लाटण्याच्या प्रक्रियेने विस्तार केला जाऊ शकणारा पदार्थ. पुरणपोळी गुळवणी, तूप, दूध; तसेच कटाच्या आमटीबरोबर खाल्ली जाते. धार्मिक परंपरेत पुरणपोळीला महत्त्व खूप!

खायला गोड आणि लुसलुशीत लागणाऱ्या खुमासदार पुरणपोळ्या बनवणे म्हणजे कौशल्याचे काम. डाळ नीट शिजेल ना? पुरण पातळ तर होणार नाही ना? पिठाचा अंदाज चुकणार नाही ना? असे एक ना हजार प्रश्न गृहिणींना पडतात. प्रत्येक ठिकाणी पुरणपोळी करण्याची पद्धत वेगळी. पुरणपोळी म्हणजे हरभरा डाळ, गूळ किंवा साखर, गव्हाचे पीठ, मैदा, तेल यापासून बनवलेला खास गोड पदार्थ.

पुरणपोळीसाठी काही खास टिप्स

  • पुरणपोळी भाजताना गॅस मध्यम किंवा मंद आचेवर असावा.

  • पोळी झाल्यावर ती लगेच डब्यात न ठेवता एखाद्या कागदावर गार होऊ द्यावी.

  • गूळ वापरताना किसून वापरावा.

  • पोळीच्यावरचे आवरण पातळ असावे. पोळी पुरेशी गोड आणि भरपूर पुरण भरलेली आणि उत्तम भाजलेली असावी.

  • पोळी दोन्ही बाजूंनी सोनेरी लालसर व्हायला हवी.

  • पुरण झाल्याचा निकष म्हणजे त्यामध्ये झारा उभा ठेवला तर काही सेकंद तो उभा राहू शकतो.

  • पोळी मऊसूत होण्यासाठी गव्हाचे पीठ किंवा मैदा बारीक चाळणीने चाळून घ्यावे.

भाद्रपद म्हणजे बाप्पांची मूर्ती... बाप्पांची आरास कशी करायची याची चर्चा... गणपती गौरीच्या नैवेद्याचे जेवण... रोजचा आरतीसाठीचा प्रसाद... घरची साफसफाई, रोज रांगोळी काय काढायची ते ढोल ताशाचे आवाज सगळेच कसे भारावून टाकणारे!

या सगळ्यांत जास्त मान म्हणजे दुर्वा आणि बाप्पांचा आवडता नैवेद्य! उकडीचे मोदक... हो उकडीचे मोदकच!! तळणीचे मोदक, खव्याचे मोदक, इतर अनेक नवनवीन प्रकार असतात हल्ली; पण खरी मजा त्या हळदीच्या पानावर वाफवलेल्या, ताज्या नारळाचे सारण घातलेल्या मोदकाचे राजेशाही रुपडे पाहाण्यातच!

आमच्याकडे माहेरी तर मी कधी तळणीचे मोदक पहिलेच नाहीत. कोकणात आजोळीही कायमच उकडीचे मोदक; पण तरीही मला लग्न झाल्यावरसुद्धा अगदी व्यवस्थित मोदक काही जमायचे नाहीत. कधी उकड चुकायची, तर कधी सारण किंचित पातळ व्हायचे.

मोदकासाठीची पिठी नवीन तांदळाची आणि ताजी वापरावी. गूळ नीट किसून ठेवायचा. उकडीचे गणित अगदी व्यवस्थित जमले पाहिजे. पारीमध्ये सारण घालून मग कळ्या करत अलगत मोदकाचे ताठ नाक दिसले पाहिजे. कळ्या करताना सहसा विषम संख्येत कराव्यात. फार तेल तूप वापरू नये. मोदक करताना घाई गडबड उपयोगाची नाही. नारळ शक्यतो ताजा खोवलेला वापरावा. जास्त पातळ असे सारण वाटले, तर त्यात थोडी तांदूळ पिठी घालावी. मोदकाची पिठी घरी बनवायची असल्यास आंबेमोहोर किंवा बासमती अशा सुवासिक तांदळाचा वापर करावा. मोदकाचा आनंद घ्यायचा, तर शिरापासून नारळगुळाचे सारण भरलेल्या तळापर्यंत.

मोदक हा मूळ संस्कृत मोद शब्दापासून बनलेला! मोद म्हणजे आनंद, हर्ष!! अर्थात प्रत्येकाची आवड वेगळी. हिंदू पुराणातील आख्यायिका म्हणजे दानशूरता, धैर्य, प्रामाणिकपणा असे अनेक गुण शिकवणाऱ्या आणि मनुष्यजन्माला जगण्याचा आधार देणाऱ्या. सणवार, प्रथा आणि त्याला दिलेली धार्मिक जोड जगण्याचे मर्म उलगडतात, सहसा गणपतीच्या नैवेद्य दाखवताना तुळस वापरत नाहीत, अशी आख्यायिका आहे; पण गणेशचतुर्थीला मोदकाच्या नैवेद्यासाठी अवश्य वापरायची अशी सूट आहे.

एकूण काय, उत्तम पुरणपोळी आणि उकडीचे मोदक येणे म्हणजे उत्तम स्वयंपाक करता येतो म्हणायला हरकत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com