आईच माझा कंफर्ट झोन 

नूपुर दैठणकर, नृत्यांगना व अभिनेत्री  
Friday, 28 February 2020

आईने कधीच माझ्यावर कोणतीच बंधने लादली नाहीत. तिचे प्रोत्साहन आणि खंबीर साथ कायम होतीच. त्यामुळे तिने कोणताही उपदेश न करता स्वतःच्या वागणुकीतून तिचा आदर्श माझ्यापुढे घालून दिला.

मेमॉयर्स : 
माझ्या आयुष्यात ज्या व्यक्तीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, ती म्हणजे माझी आई - डॉ. स्वाती दैठणकर. मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते; कारण मला माझ्या आईमध्येच माझा गुरू मिळाला. जन्मल्यापासून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिची साथ आणि मार्गदर्शन मला मोलाचे ठरले. मी तिचा रियाज बघतच लहानाची मोठी झाले आणि नृत्याची गोडी कधी आणि कशी निर्माण झाली हे कळलेच नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आईने कधीच माझ्यावर कोणतीच बंधने लादली नाहीत. तिचे प्रोत्साहन आणि खंबीर साथ कायम होतीच. त्यामुळे तिने कोणताही उपदेश न करता स्वतःच्या वागणुकीतून तिचा आदर्श माझ्यापुढे घालून दिला. घर आणि मुलांचे संगोपन उत्तमरीत्या सांभाळून स्वतःचे उदाहरण माझ्यासमोर ठेवले. माझे वडील संतूरवादक डॉ. धनंजय दैठणकर, तर आई नृत्यांगना. अशा वलयांकित आई-वडिलांची मुले असणे जितके भाग्याचे तितकेच जबाबदारीचे आहे, याची मला कल्पना आहे. त्यांच्या प्रभावातून वेगळे होऊन स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणे अवघड असते, पण आईने दिलेले विचार आणि निर्णय स्वातंत्र्यामुळेच मी वेगवेगळी क्षेत्रे अजमावून पाहत आहे. 

आईच नृत्यगुरू असल्याने तिचा २४ तास सहवास मला मिळाला. फक्त नृत्य शिक्षणापुरता सहवास सीमित न राहता तिची दिनचर्या, देश-विदेशातील कार्यक्रम, प्रवास यांची जवळून ओळख झाली. नृत्यकलाकार कसा असावा, त्याचबरोबर एक माणूस कसा असावा याची ओळख झाली. तिचा माझ्यावर अफाट विश्‍वास आहे, त्यानेही मला बळ मिळते व नवनवीन गोष्टी करण्यास मी प्रवृत्त होते. आपण आईशी मनमोकळेपणाने काही गोष्टी शेअर करतो, तर कधी भांडतोसुद्धा. माझ्या बाबतीत काही वेगळे नाही. आई हा माझा कंफर्ट झोन आहे. कधीकधी काही न बोलताही तिला माझ्या मनातल्या गोष्टी कळतात. माझ्या मालिका सुरू असताना स्वतःचे दौरे सांभाळून माझ्या झोपेची, खाण्यापिण्याची काळजी करताना ती आई असायची, तर अभिनयाचे बारकावे समजावून सांगताना गुरू असायची. असा ‘स्वीच ऑन- स्वीच ऑफ’ पण तिला मस्त जमतो. अनेकदा भारताबाहेरही तिच्याबरोबर नृत्य करायची संधी मिळाली. त्यातील जपानच्या टूरमध्ये आम्ही एन्जॉय केलेला ‘we time’ विशेष लक्षात राहिला. माझ्या हातून तिला प्रेरणा पुरस्कार देताना विशेष आनंद झाला. माझ्या बाबतीत आईचे पारडे कायमच जड राहील आणि आज मी जे काही आहे ते केवळ आईच्या शिकवणीमुळे. असे कधी विचार करून तिच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या जात नाहीत; पण आज मी हे औचित्य साधून तिला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना करते.  

(शब्दांकन - अरुण सुर्वे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nupur daithankar actress