
मला साडी नेसायला खूप आवडते. कारण, मला ती लहानपणापासूनच आवड आहे. मी लहानपणी माझ्या आईच्या साड्या खूप नेसत असे.
माय फॅशन : ‘औचित्यानुसार पोशाख निवडा’
- पूजा कातुर्डे
मला साडी नेसायला खूप आवडते. कारण, मला ती लहानपणापासूनच आवड आहे. मी लहानपणी माझ्या आईच्या साड्या खूप नेसत असे. त्या वेळी आई मला टोमणे मारायची, की लग्नानंतर तुला साड्याच नेसायच्या आहेत. मला ट्रॅडिशनल कपडे घालायला खूप आवडतात. त्यामध्ये पंजाबी, कुर्ती आवडते; पण कुठलाही कार्यक्रम असेल, तर मी साडी परिधान करायला प्राधान्य देते. कारण, मला साडी खूप छान दिसते. कारण, ‘मिसेस मुख्यमंत्री’ या मालिकेत प्रेक्षकांनी मला पाहिलंय, त्या सर्वांना मी साडीमध्ये खूप आवडली आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त चित्रीकरण मी साडी परिधान करूनच करते.
फॅशन करताना मी नेहमीच कम्फर्ट झोन पाहत असते. आपण ज्या कार्यक्रमाला जाणार आहोत, तिथे कुठली साडी नेसतोय किंवा कुठला ड्रेस घालतोय, हे तिथे सूट होते की नाही, याला प्राधान्य देते. आपले छान इम्प्रेशन कसे पडेल, याकडे माझे जास्त लक्ष असते. माझ्या मते, प्रत्येकाची फॅशन वेगवेगळी असते; पण आपण कोणत्या कार्यक्रमाला जातोय, त्यानुसार कपडे परिधान करण्यास मी प्राधान्य देते. महत्त्वाचे म्हणजे आपण जी साडी नेसू, ती कॅरी करता आली पाहिजे.
आपल्याला जे कपडे सूट होतात, तेच कपडे घालणे हा माझा साधा अन् सोपा फॅशन फंडा आहे. काहींना वन-पीस सूट होतो, तर काही जणांना जीन्स- टॉप सूट होतो. त्यामुळे आपल्या शरीरयष्टीला जे कपडे सूट होतील, तेच कपडे घालण्यास प्राधान्य द्यावे.
रंगांची निवड करणे, ही माझ्यासाठी खूप सोपी गोष्ट आहे. कारण, प्रत्येकाला माहीत असते, की आपल्याला कोणता रंग सूट होतो. त्यामुळे आपण आपल्याला सूट होणारेच कपडे घेतो. मात्र, कधीकधी असे होते की, आपण जर वेगळ्या रंगांचे कपडे घातले तरी ते आपल्याला सूट होतात; पण आपल्या डोक्यात कधी निळा तर कधी गुलाबी हाच रंग बसलेला असतो; पण मी तसे न करता वेगवेगळ्या रंगांचे कपडे खरेदी करत असते. तुम्हीही एकाच रंगाचे कपडे खरेदी न करता वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घेत राहा.
खरेतर माझ्यासाठी कुणीएक फॅशन आयकॉन नाहीये; पण मला जे कपडे सूट होतात अन् मी ज्या कपड्यांमध्ये छान दिसते, तेच कपडे मी परिधान करते. कुणीतरी कपडे घातले, फॅशन केली म्हणून मी त्यांची कॉपी करत नाही. मात्र, आपल्याला छान दिसायचे असते, म्हणून मी जी फॅशन छान वाटते, ज्या कपड्यांत आपण उठून दिसतो, तेच कपडे घालते. त्यामुळेच माझी फॅशन आयकॉन मी स्वतःच आहे.
फॅशन टिप्स
आपण कुठल्या कार्यक्रमाला जातोय, याचा विचार करून कपड्यांची निवड करावी.
आपण जे कपडे घालतो आहोत, त्यात कम्फर्टेबल वाटत आहे का, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे.
आपण उन्हाळा, पावसाळा व हिवाळ्याला अनुसरून कपडे घालावेत.
आपला फॅशन सेन्स आपल्याला समजला पाहिजे अन् त्यावरून दुसऱ्यांनी आपल्याला फॉलो केले पाहिजे, अशी फॅशन करून कपडे घालावेत.
आपणच आपला फॅशन ट्रेंड बनविला पाहिजे. आपण जे करू ती फॅशन झाली पाहिजे.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)
Web Title: Pooja Katurde Writes My Fashion Dress Selection
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..