वुमनहूड  : शिदोरी प्रवासाची... 

राधिका देशपांडे, अभिनेत्री 
Saturday, 4 July 2020

प्रवासात अनेक लोक भेटतात. काही व्यक्तींमध्ये असलेलं चापल्य, चतुराई, विनय, सौजन्य हे गुण लक्ष वेधतात, तर काहींचा हसरा चेहरा लक्षात राहतो. प्रवासात जागा,अनुभव, भेटलेली माणसं माझ्या आयुष्यात रंग भरतात.

जीवनाच्या प्लॅटफॉर्मवर गाडी आल्यावर माणूस दुसऱ्या माणसाशी संबंध जोडतो. कधी ओळख, कधी गट्टी, तर कधी हसणे-रुसणे होते. मात्र, त्यासाठी आपल्याला प्रवासी होणं गरजेचं असतं. आयुष्य एक प्रवास असून, सुख-दु-ख आपली आहेत, हे ठरवल्यास मार्ग सापडतोच. तुम्ही प्रवास कसा करायचा ठरवता, मार्ग कसा शोधता, रस्ता कसा बनवता, प्रवास कोणासोबत करता आणि सोबतीला कशाची शिदोरी बांधता, हे महत्त्वाचं. कलाकार म्हणून आम्हाला आमचा प्रवास रंजक, रमणीय, रोमांचक हवा असतो. या प्रवासातून प्रेक्षकांना रसरशीत, रंगीत आणि हृदयस्पर्शी घटनांचं रूपक दर्शन घडावं, याकडं आमचा कल असतो. प्रवास नाट्यमय हवा असा आमचा हट्ट नसतो, मात्र नाटककार आजूबाजूला घडत असलेल्या घटना, व्यक्ती, सृष्टीचं दृकश्राव्य रूपात नोंद घेतो. भूमिका रेखाटताना त्याला या अनुभवांचा उपयोग होणार असतो. यासाठी प्रवास करणं आवश्यक आहे, असं माझ्या लक्षात आलं. म्हणूनच मी गेली ५ वर्षं, वर्षातून एकदा तरी एकटीनं (सोलो) प्रवास करते. लोकांना भेटणं, निसर्गात रमणं, संपूर्ण जगाकडं सिनेदृष्य म्हणून पाहणं मला आवडतं. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

कलाकार म्हणून सूक्ष्मभाव टिपणं, अनुकरण, संस्कृती, संस्कार, संवेदना, सभोवतालचं वातावरण, कलादर्पण या सगळ्याचा अभ्यास करणं माझ्या अंगवळणी पडलं आहे. लॉकडाउनच्या काळात लांबचा प्रवास करता येत नसल्यामुळं लेखणीद्वारे मी हा प्रवास करायचं ठरवलं आहे. सोलो प्रवास करत असताना भेटलेल्या काही व्यक्तींचं वर्णन मला करावंसं वाटतं. कन्याकुमारीला गेले असताना विवेकानंद केंद्राचे व्यवस्थापक बालकृष्णनजी भेटले. एकटीच आली आहे म्हटल्यावर त्यांनी रॉक मेमोरियल साठी व्हीआयपी पास करून दिला, आपुलकीने चौकशी केली, सुखरूप घरी पोचले आहे ना, याकरताही फोन केला. मला त्यांच्या वागणुकीतून सद्प्रवृत्ती, सद्भावनांचा परितोष जाणवला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मी बांद्रा ते कच्छ हा प्रवास ट्रेननं केला. ट्रेनमध्ये भेटलेल्या एका व्यक्तिनं मोठ्या हुद्द्यावर असलेल्या चार लोकांचे नंबर दिले. कच्छ खूप सुंदर आहे आणि तुम्हाला चांगलेच अनुभव येतील, असंही सांगून गेला. मी कच्छच्या रणामध्ये २१ किलोमीटरचा प्रवास आसिफ नावाच्या रिक्षावाल्याबरोबर केला. त्यानं मला कच्छ दर्शन घडवलं. त्याच्या कुटुंबियांशी ओळख करून दिली. एकटी प्रवास करत असल्यानं बहिणीसारखी काळजी घेतली. भारत एक सुरक्षित देश आहे आणि असे बांधव जागोजागी सापडतात. लेह लडाखला मी एकटीनं प्रवास केला. तिथली माणसं साधी, प्रेमळ, दिलदार आणि देशप्रेमी असल्याचं जाणवलं. लेह-लडाख सुंदर आहे. विमानात मला खिडकीची सीट हवी होती. शेजारी बसलेल्या लामांना मी विनंती केली. मला माहित नव्हतं, ते पहिल्यांदाच विमानात बसले आहेत. त्यांनाही तीच सीट हवी होती, पण ते मला म्हणाले, ‘मला वाटते, माझ्यापेक्षा तुम्हाला खिडकीच्या सीटची जास्त गरज आहे.’ त्यांनी दुसऱ्याच्या आनंदाखातर स्वत-च्या आनंदाला मुरड घातली होती... 

ऋषिकेशला जायचं ठरलं, त्याच दरम्यान उषादेवींशी ओळख झाली. त्या तिथं एका योगाश्रमाच्या व्यवस्थापक आहेत. त्यांना एक दिवस सहज सांगितलं, मी ऋषिकेशला जाते आहे. त्यांनी माझ्या राहण्या, खाण्यापिण्याची जबाबदारी घेतली. मी तिथं असताना पुण्यातून माझी चौकशी केली. त्या आता माझ्या मैत्रीण आहेत. त्यांनी अजूनही माझ्याकडून पैसे घेतलेले नाहीत. 

सायकलवर लवासाला गेले होते. दुपारचा एक वाजला होता, भूक लागली होती. एका झोपडीपाशी बसले. त्यांनी तर्री-पोहे करून प्रेमानं खाऊ घातले. निघताना बाटली विसरले म्हणून मंदा मावशी धावत माझ्या मागं आल्या. हे ऋण मी कसं फेडायचं! शूटिंगसाठी पुणे-मुंबईचा प्रवास कारनं मी एकटीच करते. एका प्रवासात रात्रीचे ८ वाजले होते आणि गाडीत पेट्रोल भरायचे राहिलं. रस्त्याच्या पलीकडं जाऊन पेट्रोल भरावं लागणार होतं. गाडी बंद पडण्याची भीती होती. पंपावरील पोलिस दीपकदादा म्हणाले, ‘ताई काळजी करू नका, मी येतो तुमच्याबरोबर.’ माझी चिंता एका क्षणात मिटली. एक्सप्रेस वेवर दत्त स्नॅक्स आहे. तिथं माझी एक मैत्रीण आहे. मी येतं असल्याचं कळाल्यावर घरून चटणी, लाडू, चिवडा करून आणते. 

प्रवासात अनेक लोक भेटतात. काही व्यक्तींमध्ये असलेलं चापल्य, चतुराई, विनय, सौजन्य हे गुण लक्ष वेधतात, तर काहींचा हसरा चेहरा लक्षात राहतो. प्रवासात जागा, भोवतालची परिस्थिती, अनुभव, भेटलेली माणसं माझ्या आयुष्यात रंग भरतात. माणसांची मला भीती वाटत नाही. फक्त इतरांनी तुमच्याशी जसं वर्तन ठेवावं असं तुम्हाला वाटतं, तसंच वर्तन तुम्ही सर्वांशी ठेवलं पाहिजे. चांगले आणि वाईट अनुभव प्रत्येकाला येतात, पण मी माझ्या चांगल्या अनुभवांची शिदोरी गाठीशी धरून पुढील प्रवास करते... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Radhika Deshpande actress writes article about travel

Tags
टॉपिकस
Topic Tags: