सौंदर्यखणी : गढवाल की गदवाल?

‘गढवाल साडी’ या नावानं प्रचलित असलेल्या साडीचं खरं नाव ‘गदवाल साडी’ असं आहे! या साडीच्या जन्मगावावरून या साडीला ‘गदवाल’ हे नाव पडलं.
Prasad-Manjiri
Prasad-ManjiriGoogle file photo

‘गढवाल साडी’ या नावानं प्रचलित असलेल्या साडीचं खरं नाव ‘गदवाल साडी’ असं आहे! या साडीच्या जन्मगावावरून या साडीला ‘गदवाल’ हे नाव पडलं. आंध्र प्रदेशमध्ये म्हणजे आत्ताच्या तेलंगणमध्ये गदवाल जिल्ह्यात दोनशेपेक्षा जास्त वर्षांपूर्वीपासून ही साडी विणली जात आहे. उत्तराखंडमध्ये असलेल्या ‘गढवाल’ प्रांताचा आणि या साडीचा काहीही संबंध नाही. महाराष्ट्रात बोलीभाषेत ‘गदवाल’ शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘गढवाल’ हे नाव रुळलं; पण दाक्षिणात्य भारतात या साडीला ‘गदवाल साडी’ असंच म्हणलं जातं. पौराणिक संदर्भानुसार गदवाल साडीचे जे विणकर आहेत, ते हिंदू देव-देवतांची वस्त्रं विणणारे ‘जीवेश्वर महाराज’ म्हणून जे विणकर होते, त्यांचे वंशज मानले जातात. गदवाल साडीला असलेल्या पौराणिक या संदर्भामुळे या साडीला एक धार्मिक अधिष्ठान प्राप्त झालं आहे. त्यामुळे दक्षिण भारतात धार्मिक कार्यक्रमांत आणि लग्नकार्यात आवर्जून ही साडी नेसली जाते. शिवाय तिरुपती बालाजी मंदिरातील ब्रह्मोत्सवाच्या सोहळ्यात देवाची पालखी निघते, तेव्हा देवाला ‘गदवाल वस्त्र’ परिधान केलं जातं! धार्मिक अधिष्ठान असलेली आणि हातमागावर विणलेली ही पारंपरिक साडी म्हणजे एक सुंदर कलाकृतीच वाटते.

गदवाल साडी तीन प्रकारात बनते- पूर्ण कॉटनमध्ये किंवा संपूर्ण सिल्कमध्ये किंवा मुख्य साडी कॉटनची आणि काठ व पदर सिल्कचा असलेली गदवाल. साडीच्या मधल्या भागात कधी चौकड्या, तर कधी अंतरांअंतरावर सुंदर जरीचे बुट्टे असतात. गदवालचे सुंदर कॉन्ट्रास्ट काठ-पदर ही या साडीची खासियत आहे. काही ‘डिझायनर गदवाल’मध्ये तर गंगा-जमुना काठ असतात, म्हणजे वरचा काठ वेगळ्या रंगाचा आणि खालचा काठ वेगळ्या रंगाचा. काठा-पदरावरील भरजरी नक्षीकामावर दाक्षिणात्य मंदिरांवरील कोरीवकामाचा आणि नैसर्गिक घटकांचा खूप मोठा प्रभाव पडलेला दिसतो. गदवालच्या काठा-पदरामध्ये खूप कलात्मक वैविध्यता दिसून येते. या साड्यांच्या नक्षीकामामध्ये विणकरांनी खूप कलात्मक प्रयोग केलेले दिसतात. मोर, कमळं, चाफ्याची फुलं, वेल, कोयऱ्या, रुद्राक्ष, गोपुरं इत्यादी घटकांची सुंदर गुंफण केलेली आढळते. बऱ्याचदा या साडीच्या पदराच्या शेवटी सुट्ट्या उभ्या धाग्यांचे बांधून गोंडे केलेले असतात किंवा काहीजणी तर खास तसे गोंडे करून घेतात. अशा साड्या फारच ‘ग्रेसफुल’ दिसतात.

हातमागावर विणलेली प्रत्येक गदवाल साडी विणकरांच्या कल्पकतेनुसार वेगवेगळी विणलेली असते. घडीवर खराब होऊ नये म्हणून रुळावर गुंडाळलेल्या स्वरूपात मिळणाऱ्या या साड्या उलगडत जातात, तसतशी साड्यांची सुंदर रंगसंगती आणि अप्रतिम नक्षीकामातले सौंदर्यही उलगडत जाते.

ओरिजिनल ‘गदवाल’ साडी ओळखायची कशी?

  • या साडीच्या काठाचा सुरुवातीचा भाग- जो साडी नेसताना खोचला जातो, त्या काठाच्या भागावर जी नक्षी असते ती नक्षी टोचू नये म्हणून मुद्दाम ‘जरी’मध्ये न विणता, रेशमी धाग्यात किंवा कॉटनमध्ये विणलेली असते.

  • हातमागावर विणलेल्या सिल्क गदवालचे काठ आणि पदर मुख्य साडीला ‘इंटरलॉक सिस्टीम’ने बेमालूमपणे जोडलेले असतात. साडीच्या उलट्या बाजूने बारकाईने पाहिल्यास ते कळते. बऱ्याचदा हे ‘इंटरलॉक’, ‘टेम्पल बॉर्डर’ स्वरूपात केलेले दिसते.

संघर्षाची साक्षीदार

‘तुळशीच्या मंजिरी’मध्ये जसं नवनिर्मितीचं बी रुजलेलं असतं, अगदी तसच नवनिर्मितीचं बी, मंजिरी ओकमध्ये रुजलेलं दिसतं! मंजू-प्रसाद ओकच्या यशस्वी प्रवासात आणि सहजीवनात मंजूचा वाटा भक्कम आहे. प्रसादच्या कलाकृतीच्या निर्मिती प्रक्रियेत ती समर्थपणे उभी असते शिवाय ती एक उत्तम गृहिणी, सार्थक-मयंकची सक्षम आई, ‘क्रिएटिव्ह शेफ’, ‘दागिना’ हा ज्वेलरी ब्रँड चालवणारी उद्योजिका आणि चोखंदळ निर्माती आणि सहायक दिग्दर्शक आहे. मंजिरीनं प्रसादच्या सुरुवातीच्या ‘स्ट्रगल-काळात’ म्हणजे अगदी कॉलेजपासून त्याला खंबीर साथ दिली आहे. त्या दोघांच्या वाटचालीच्या दोन साक्षीदारांची गोष्ट आज आपण वाचणार आहोत. हे साक्षीदार म्हणजे चक्क दोन साड्या आहेत!

मंजू आणि प्रसाद लग्नानंतर मुंबईत स्थायिक झाले. पंधराशे रुपयांची नोकरी करणारी मंजू आणि नाटकाच्या प्रयोगाची दोनशे रुपये ‘नाइट’ घेणारा प्रसाद... असा तो काळ होता. लग्नात आईकडून मिळालेल्या पाच साड्यांशिवाय मंजूकडे साड्याच नव्हत्या. एकदा मंजू तिच्या ऑफिसमधल्या मैत्रिणीनं नेसलेल्या साडीच्या जाम प्रेमात पडली होती. कधीतरी तशी साडी घ्यायचीच अशी खूणगाठ बांधून, महिन्याकाठी थोडे पैसे ती साठवू लागली. पुढे दोन-तीन वर्षांनी साठलेले पैसे घेऊन ती पुण्यात तिच्या नेहमीच्या दुकानात गेली; पण तिला साडीचं नाव काही आठवेना. बरीच काहीबाही नावं ती घेत राहिली... शेवटी मंजूनं त्याच्यासमोर त्या साडीचं ‘कॅरॅक्टर स्केच’ उभं केलं आणि त्या सेल्समनचे डोळे चमकले. त्याने लगबगीनं एक साडी आणली आणि म्हणाला, ‘अशी असेल ती साडी, गढवाल म्हणायचंय का तुम्हाला?’’ मंजूनं तर आनंदाने उडीच मारली.

मंजूनं एक सुंदर काळ्या काठ-पदराची लालबुंद गढवाल निवडली आणि किंमत विचारली. साडेतीन हजार किंमत ऐकून मंजूचा हिरमोड झाला कारण तितके पैसे तिच्याकडे नव्हते. खजील होऊन मंजू निघाली; पण दुकानदार म्हणाला, ‘‘ताई तुम्हाला आवडली आहे ना साडी, मग घेऊन जा, हप्त्याने पैसे द्या.’’ तेव्हा मोबाईलही नव्हते आणि प्रसादही मुंबईत होता, मंजूला काय करावं ते कळेना; पण तिला तो मोह आवरता आला नाही. तिच्याकडे तेव्हा पर्समध्ये चेकबुकसुद्धा होतं, मग पाचशे रुपये आणि ‘पोस्ट डेटेड चेक्स’ देऊन मंजूनं चक्क हप्त्यानं साडी घेतली! पण घरी गेल्यावर प्रसाद मंजूवर खूप चिडला होता आणि आपण मंजूला तिच्या आवडीची साडी घेऊ शकत नाही म्हणून त्याला वाईटही वाटलं होतं. पुढे त्या साडीचे सगळे पैसे मंजूनं फेडले आणि आजही त्यांच्या ‘स्ट्रगल-काळा’ची आठवण म्हणून तिनं ती साडी जीवापाड जपून ठेवली आहे.

पुढे कालांतरानं प्रसाद स्थिरावला आणि मंजूनंही नोकरी सोडली. पुढे ‘हिरकणी’च्या शूटिंगच्या वेळेस, ‘हिरकणी’ कोण आहे.... हे दाखवण्यासाठी एक खास सोहळा आयोजित केला होता. मंजिरी म्हणाली, ‘‘स्त्रीत्वाचा सन्मान करणाऱ्या त्या चित्रपटाच्या त्या सोहळ्यासाठी, माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान असणारी तीच गढवाल मी नेसून गेले होते. स्त्रीत्वाचा सन्मान करण्यासाठी साडीसारखं दुसरं वस्त्र नाही म्हणून आम्ही तो सोहळा सुरू होण्यापूर्वी तिथल्या एका छोटं बाळ असलेल्या माऊलीची साडी-चोळीनं ओटीही भरली होती.’ गंमत म्हणजे याच चित्रपटाच्या प्रमोशनच्या कार्यक्रमांसाठी साड्या ठरवत असताना मंजिरीनं ठरवलं, की आपण ‘हिरकणी’च्या प्रमोशनच्या एका कार्यक्रमासाठी अजून एक गढवाल घ्यायची. मग मंजिरी त्याच दुकानात जाऊन तिला हवी तशी ‘युनिक’ अशी ‘डिझायनर गढवाल’ घेऊन आली आणि ‘हिरकणी’च्या त्या कार्यक्रमाला नेसली. चित्रपट यशस्वी झाला आणि ही दुसरी गढवाल त्या यशाची साक्षीदार झाली. त्यामुळे या दोन्ही गढवालच्या घड्यांमध्ये मंजूनं यशाची अनेक मोरपिसं जपून ठेवली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com