Priya Berde
Priya BerdeSakal

सौंदर्यखणी : ‘श्रीकलाहस्ती’ कलमकारीची ‘गोष्ट’

‘कलमकारी’ हा शब्द ‘कलम’ आणि ‘कारी’ या पर्शियन शब्दांपासून तयार झाला असून, ‘कलम’ म्हणजे पेन आणि ‘कारी’ म्हणजे कारागिरी.

‘कलमकारी’ हा शब्द ‘कलम’ आणि ‘कारी’ या पर्शियन शब्दांपासून तयार झाला असून, ‘कलम’ म्हणजे पेन आणि ‘कारी’ म्हणजे कारागिरी. खूप वर्षांपूर्वी पर्शिया आणि भारत या देशांतील व्यापारातून या शब्दांची देवाणघेवाण झाली असावी. भारतात, आंध्र प्रदेशमध्ये चित्तूर जिल्ह्यात ‘श्रीकलाहस्ती’ गावी उदयाला आलेली ‘श्रीकलाहस्ती शैलीतील कलमकारी’ आणि त्या राज्यात कृष्णा जिल्ह्यात ‘मछलीपटनम’ गावी उदयाला आलेली ‘मछलीपटनम शैलीतील कलमकारी’ अशा दोन ढंगांत कलमकारी केली जाते. ‘श्रीकलाहस्ती शैली’, चौदाव्या शतकात विजयनगर साम्राज्यात उदयाला आली. गोष्टी सांगण्यासाठी या कलेचा तेव्हा उपयोग केला जात असे.

‘चित्रकथी’ समाजातील कलाकार गावोगावी फिरून ऐतिहासिक आणि पौराणिक प्रसंगांची चित्रं कापडावर काढून गोष्टी सांगून उपजीविका करत असत. ही चित्रं देवळांच्या अंतर्गत सुभोभीकरणासाठीही लावली जात. पुढे हे कलाकार ही शैली वापरून वस्त्रांवरसुद्धा चित्रं काढू लागले आणि त्यातूनच ‘श्रीकलाहस्ती शैली’तील कलमकारी साडीचा जन्म झाला. या शैलीतील साडीवर रामायण- महाभारतातील प्रसंग, पौराणिक गोष्टी, देव-देवतांची चित्रं, प्राणी-पक्षी बघायला मिळतात. ‘मछलीपटनम शैलीतील कलमकारी’, मुघल आणि कुतुबशाही साम्राज्यात उदयाला आली. या शैलीत पानं-फुलं, झाडं-वेली, पक्षी, कोयऱ्या, कमळं किंवा नैसर्गिक देखावे वगैरेंची चित्रं काढली जात असत. ब्रिटिशांच्या काळात या शैली डबघाईला आल्या होत्या. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सरोजिनी नायडू यांच्या वहिनी कमलादेवी चटोपाध्याय यांनी कलेला पुनरुज्जीवीत केलं.

‘श्रीकलाहस्ती शैलीत’ हातानं ‘फ्री-हॅन्ड’ चित्रं काढली जातात, म्हणून त्याला ‘पेन कलमकारी’ असंही म्हणतात, तर ‘मछलीपटनम शैलीत’ हातानं ब्लॉक प्रिंटिंग केलं जातं. ‘श्रीकलाहस्ती शैली’तील साडीमध्ये कॉटन किंवा सिल्कच्या कापडावर, हातानं चित्रं काढून नैसर्गिक रंगानं रंगवली जातात. ही साडी ३० ते ४५ दिवसांत तयार होते. सर्वांत आधी साडीच्या लांबीरुंदीचं पांढरं कापड घेऊन ते पूर्ण एक दिवस पाण्यात भिजवून ठेवलं जातं. हे कापड भिजेपर्यंत हिरडा कुटून त्याची पावडर पाण्यात मिसळून घट्ट पेस्ट केली जाते. मग एका साडीसाठी अंदाजे तीन लिटर म्हशीचं दूध घेऊन त्यात ही पेस्ट कालवली जाते. त्यामुळे दुधाला हलका पिवळसर रंग येतो. या मिश्रणात साडीचं कापड एक दिवस भिजत ठेवलं जातं. म्हशीच्या दुधात उच्च दर्जाचा स्निग्धांश असतो, जो या संपूर्ण कापडावर पसरतो. त्यामुळे कापडावर सहजपणे चित्रातील ओघवत्या रेषा काढता येतात. हे कापड दुसऱ्या दिवशी घट्ट पिळून वाळवलं जातं. ते टेबलवर पसरवून मग सुरू होते कलमकारीची चित्रकारी. यासाठीचं विशिष्ट पेन ते स्वतः तयार करतात. हळदीच्या झाडाच्या बारीक- जाड वाळलेल्या काड्या कोळशाच्या निखाऱ्यांवर थोडा वेळ ठेवून त्यावर वाळू टाकतात आणि अर्धा तास झाकून ठेवतात. त्यामुळे काड्यांची पूर्ण राख न होता बारीक कोळसे तयार होतात. या कोळशाच्या काड्या म्हणजेच त्यांची पेनं. दुसऱ्या झाडांच्या काड्या, चित्र काढताना तुटतात म्हणून हळदीच्याच झाडांच्या काड्यांचा उपयोग केला जातो.

हे कारागीर पूर्ण साडीवर हातानं सुंदर ‘स्केच’ काढून घेतात. संपूर्ण चित्राची आउटलाइन काढून झाल्यानंतर ती काळ्या शाईनं डार्क केली जाते. या आऊटलाईनसाठीचं पेनसुद्धा ते स्वतः तयार करतात. बांबूच्या बारीक काड्यांना टोक केलं जातं, मग हे पेन बोटांमध्ये जिथं धरतो तिथं सुती कापडाची पट्टी, सुती दोऱ्यानं बांधली जाते. हे पेन, बांधलेलं कापड बुडेल इतकं काळ्या शाईत बुडवलं जातं, जेणेकरून त्या कापडातही ही शाई शोषली जाते आणि आऊटलाईन करताना त्या कापडातून शाईचा सलग ‘फ्लो’ मिळेल. ही काळी शाईसुद्धा खास असते. लोखंडाचे तुकडे, तुरटी आणि गूळ पंधरा दिवस पाण्यात बुडवून ठेवतात आणि सगळ्या घटकांची प्रक्रिया होऊन तयार होणारा डार्क काळ्या रंगाचा द्रवच ते शाई म्हणून वापरतात. आऊटलाईन झाल्यानंतर आतील रंग भरायला घेतले जातात. वेगवेगळ्या नैसर्गिक घटकांपासूनच रंग तयार ठेवलेले असतात. टोक नसलेल्या बांबूच्या पेननंच ते निगुतीनं भरले जातात. रंग वाळल्यानंतर वाहत्या पाण्यात साडी धुवून घेतली जाते. मग रंग अजून पक्के करण्यासाठी अर्धा तास पाण्यात उकळून घेतली जाते. साडी उकळून झाल्यावर परत थंड पाण्यात टाकून शेवटी वाळवली जाते.

‘श्रीकलाहस्ती शैली’तील साडीवरची कलमकारी म्हणजे कॅनव्हासवर चितारलेली अप्रतिम कलाकृती वाटते. ‘चित्रकथी’शी नातं सागणारी ही प्रत्येक साडी एकेक गोष्ट सांगत नसती तरच नवल...

चोखंदळ प्रिया बेर्डेंची ‘कलमकारी’

‘अशीही बनवाबनवी’ या सुपरहिट चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या प्रिया अरुणला, लहानपणीच आपल्या आईकडून- लता अरुण यांच्याकडून अभिनयाचं बाळकडू मिळालं. पुढे अनेक चित्रपटांमधून एकत्र काम करताना प्रिया अरुण आणि लक्ष्मीकांत बेर्डे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि १९९७ मध्ये प्रिया अरुण, ‘प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे’ झाल्या. गहिऱ्या डोळ्यांच्या आणि मोहक खळ्यांच्या प्रिया बेर्डे यांच्या मराठी चित्रपटांमधील बऱ्याच भूमिका त्यांच्या सहजसुंदर अभिनयामुळे लक्षात राहिल्या. त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांची अजून एक गोष्ट लक्षात राहते, आणि ती म्हणजे त्यांच्या ‘हटके साड्या!’

त्यांच्याकडे खूप सुंदर साड्यांचा संग्रह आहे. त्यांना साड्यांचे सगळेच प्रकार आवडतात. त्या म्हणाल्या, ‘‘मला सिल्क, कॉटन आणि लिननच्या साड्या जास्त आवडतात. पारदर्शक साड्या मी फार नेसत नाही, मला त्यात बिलकुल ‘कम्फर्टेबल’ वाटत नाही. शिवाय मी मुंबईत कधीच साड्या घेत नाही. पुण्यातून किंवा कोल्हापूरमधून मी खूप साड्या घेत असते. अगदी बेळगाव, किंवा निपाणीलाही छान साड्या मिळतात म्हणून मी तिथंही जाऊन घेत असते. मी साड्या खूप निवडून घेते, माझ्या साड्या हटके असाव्यात असं मला आवर्जून वाटतं.’ साडीचा वेगळा प्रकार नेसता यावा म्हणून काही साड्या तर त्या स्वतः तयार करतात. चेन्नईला जाऊन तिथल्या मलबेरी सिल्कचे तागे आणून त्याला आईच्या आणि स्वतःच्या जुन्या साड्यांचे भरजरी काठ-पदर लावून, काही साड्यांवर स्वतः भरतकाम किंवा ‘सिक्वेंसवर्क’ करून त्याला स्वतः बनवलेले रेशमी गोंडे वगैरे लावून त्यांनी स्वतःसाठी साड्यांचे काही नवीन प्रकार तयार केले आहेत. कधीकधी हटके साड्या घेण्यासाठी, त्या हॅन्डलूम साड्यांची प्रदर्शनं भरतात तिथं जाऊन साड्या घेत असतात.

अशाच एका पुण्यात भरलेल्या हॅन्डलूम साड्यांच्या प्रदर्शनात त्यांना, प्लेन मस्टर्ड रंगाच्या कॉटन साडीच्या पदरावर हातानं कलमकारी केलेली, पदराला रेडीश-पिंक रंगाचे टॅसल्स असलेली डिझायनर कलमकारी साडी खूप आवडली आणि ताबडतोब त्यांनी ती साडी विकत घेऊन टाकली. नंतर लवकरच त्यांनी ती एका ॲवॉर्ड फंक्शनला नेसली आणि त्यावर ॲन्टीक ज्युलरी घातली. तेव्हा त्या कार्यक्रमात, नजरेत भरणाऱ्या त्या साडीमुळे सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. त्या कार्यक्रमात त्यांना आणि त्यांच्या साडीलासुद्धा खूप ‘कॉम्प्लिमेंट्स’ मिळाल्या होत्या.

‘माझ्यासारखी साडी दुसरीकडे कुठे दिसू नये’, असा आग्रह धरणाऱ्या प्रिया बेर्डे यांना कलमकारी साडी आवडली यात नवल नाही, कारण हातानं चित्र काढून रंगवलेली प्रत्येक कलमकारी वेगवेगळी असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com