esakal | साडीच्या घडीत ट्रीपच्या आठवणी! 
sakal

बोलून बातमी शोधा

साडीच्या घडीत ट्रीपच्या आठवणी! 

अभिनेता-लेखक-दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या यशामागे खंबीरपणे उभी असणारी त्यांची अर्धांगिनी, अभिनेत्री स्नेहल तरडे - हिच्यासाठी केरळची कसावू साडी खूप खूप खास आहे. 

साडीच्या घडीत ट्रीपच्या आठवणी! 

sakal_logo
By
रश्मी विनोद सातव

अभिनेता-लेखक-दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या यशामागे खंबीरपणे उभी असणारी त्यांची अर्धांगिनी, अभिनेत्री स्नेहल तरडे - हिच्यासाठी केरळची कसावू साडी खूप खूप खास आहे. 

स्नेहल लहान असताना, तिच्या आईचं एक छोटंसं स्वप्न होतं, स्नेहलच्या बाबांबरोबर देवभूमी केरळला फिरायला जाण्याचं. दुर्दैवानं स्नेहलचे बाबा पुढे लवकरच देवभूमीला न जाता अचानकपणे देवाघरी निघून गेले. स्नेहल आणि तिच्या आईच्या आयुष्यात निर्माण झालेल्या पोकळीत स्नेहलच्या आईचं स्वप्नही विरून गेलं! 

पण स्नेहलनं तेव्हाच ठरवून ठेवलं होतं, की आपण मोठी झाल्यावर, कधीच कोणतीही मागणी न करणाऱ्या आपल्या आईचं हे स्वप्न पूर्ण करायचंच! स्नेहलचा मुलगा परार्ध पाच वर्षांचा असताना स्नेहलनं खूप धडपड करून केरळच्या ट्रिपचा योग अखेर घडवून आणला. स्नेहल, स्नेहलची आई आणि परार्ध - असे तिघंच केरळच्या ट्रिपला गेले. ती ट्रिप तिघांसाठी खूप स्पेशल होती. केरळच्या वास्तव्यात एक दिवस त्यांना निवांत मिळाला आणि स्नेहलनं केरळचं ‘सुव्हेनिअर’ विकत घ्यायचं ठरवलं. खास केरळची पारंपरिक कसावू साडी तिला ‘सुव्हेनिअर’ म्हणून घ्यायची होती. ड्रायव्हर काकांना तिनं सांगितल्यावर, ते त्या तिघांना थेट हातमागावर साड्या विणतात त्या कारखान्यातच घेऊन गेले. 

सौंदर्यखणी : रेखानं ओळख दिलेली कांजीवरम; सोळाव्या शतकापासूनचा इतिहास

तिथं अनेक हातमाग होते, त्यावर अनेक सुंदर सुंदर साड्या विणल्या जात होत्या. तो लयबद्ध आवाज, ते निगुतीनं विणले जाणारे धागे...सगळं विलक्षण अद्‍भुत होतं! तिथं स्नेहलच्या आईनं स्नेहलला एक सुंदर ‘कसावू’ साडी घेतली. हातमागावरची सुती- क्रीम कलरची, सोनेरी बॉर्डर असलेली. त्या बॉर्डरवर लोभस कृष्णाची चित्रं होती, पदरावर ऐसपैस सुंदर-रेखीव-निळा कृष्ण होता, त्या पदराला छानसे गोंडे होते... साडी एकदम हटके होती. पाहताक्षणीच स्नेहल त्या साडीच्या प्रेमात पडली. 

येताना मात्र ती साडीची घडी खूप जड झाली होती. त्या साडीच्या घडीत बरंच काहीबाही होतं- आईचा आनंद, स्नेहलचं समाधान, परार्धच्या गंमती-जमती, ट्रिपच्या आठवणी आणि बरंच काही. आजही त्या मऊसूत घडीत त्या सगळ्या गोष्टी तशाच जपून ठेवल्या आहेत स्नेहलनं! 

loading image