केरळची ‘कसावू’ 

रश्मी विनोद सातव
Friday, 8 January 2021

साडीची निर्मिती केरळमध्ये बौद्ध काळात झाली असल्याचे दाखले मिळाले आहेत.केरळमध्ये ‘मोहिनीअट्टम’सारख्या पारंपरिक नृत्यात ही साडी आवर्जून नेसली जाते. राजा रवी वर्मांच्या पौराणिक चित्रांमध्येसुद्धा ही साडी आढळते.

दहा-बारा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘आयेशा’ चित्रपटातील, ‘मिठी मिठी बोल...’ या गाण्यात सोनम कपूरनं नेसलेली मोतिया कलरची सुंदर साडी म्हणजे केरळची पारंपरिक साडी- कसावू साडी. केरळमधील मल्याळी नववधूंची ही लग्नातली साडी. या कसावू साडीला केरळचा ‘जीआय टॅग’ मिळाला आहे. ‘जीआय टॅग’ म्हणजे ‘भौगोलिक स्थानदर्शक’ प्रमाणपत्र, ज्याला खास त्या प्रांताची ओळख म्हणता येईल. 

कसावू म्हणजे सोन्याच्या पाण्यात बुडवलेली ‘जर’. चांदीच्या तारा सोन्याच्या पाण्यात बुडवून वापरलेल्या कसावू साड्या खूप महाग असतात. सोन्याच्या पाण्यात तांब्याच्या तारा बुडवून किंवा सोनेरी-पिवळ्या रंगात तांब्याच्या तारा बुडवून केलेली जर वापरून विणलेल्या साड्यांचे पर्यायही सध्या उपलब्ध आहेत. या जरीचे काठ आणि जरीचा पदर असलेली ही मोतिया रंगाची किंवा ऑफव्हाईट साडी केरळमध्ये लग्नात आणि ओणमसारख्या सर्व धार्मिक कार्यक्रमांमध्ये आवर्जून नेसली जाणारी एक खास पारंपरिक साडी आहे. हातमागावर विणलेली ही साडी पूर्वी फक्त कॉटनमध्ये येत असे; पण आता यात सिल्कच्या डिझायनर कसावू साड्या पण मोठ्या प्रमाणात विणल्या जात आहेत. या डिझायनर साड्यांमध्ये, पारंपरिक जरीच्या काठात अतिशय सुंदर असं लाल-हिरव्या रंगातसुद्धा काम केलेलं दिसतं. या साडीवर टेम्पल ज्युलरी अतिशय सुंदर दिसते. डिझायनर कसावू साड्यांच्या पदरावर पौराणिक कथांमधल्या संदर्भांपासून ते आधुनिक चित्रकलेतल्या संदर्भांपर्यंतचा कलात्मक वापर केलेला आढळतो. 

रेखानं ओळख दिलेली कांजीवरम; सोळाव्या शतकापासूनचा इतिहास

या साडीवर त्या साडीचा पारंपरिक ब्लाऊज छान दिसतोच; पण साडीचा मधला रंग पांढरा किंवा ऑफव्हाईट असल्यामुळे दुसराही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज अतिशय सुंदर दिसतो. ज्यांना सगळ्या प्रांताच्या साड्यांचा संग्रह करायला आवडतो, त्या तर ही साडी आवर्जून घेतात. त्यामुळे केरळची खासियत असलेल्या या साडीकडे आता देश-विदेशातून एक ‘स्टेटमेंट साडी’ म्हणून बघितलं जात आहे. 

परंपरेचा साज 
या साडीची निर्मिती केरळमध्ये बौद्ध काळात झाली असल्याचे दाखले मिळाले आहेत. केरळमध्ये ‘मोहिनीअट्टम’सारख्या पारंपरिक नृत्यात ही साडी आवर्जून नेसली जाते. 
राजा रवी वर्मांच्या पौराणिक चित्रांमध्येसुद्धा ही साडी आढळते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rashmi vinod satav write article about Kerala traditional saree Kasavu saree

Tags
टॉपिकस
Topic Tags: