ती कुठे काय करते!

प्रत्येकालाच एका वैयक्तिक जागेची गरज असते. जिथे तो किंवा ती, जसे आहेत तसे राहू शकतात. वागू शकतात. एखाद्या गोष्टीचा त्रास झाला तर क्षणभर एकांत मिळवू शकतात.
Women
WomenSakal

प्रत्येकालाच एका वैयक्तिक जागेची गरज असते. जिथे तो किंवा ती, जसे आहेत तसे राहू शकतात. वागू शकतात. एखाद्या गोष्टीचा त्रास झाला तर क्षणभर एकांत मिळवू शकतात. बाईसाठी ही जागा कायमच दुर्लक्षित राहिली आहे. यात मूलभूत प्रश्न हा आहे, की बायकांचं काही वैयक्तिक असतं का? त्यांचं त्यांचं, स्वतःसाठीचं?

अलीकडेच एक बातमी वाचण्यात आली. चंडीगडमध्ये एका बाईचा फोन तिच्या नवऱ्याने तिला न सांगता रेकॉर्ड केला. ती त्याविरुद्ध कोर्टात गेली आणि कोर्टाने या पद्धतीने फोनवरील संभाषण रेकॉर्ड करणं, हा पत्नीच्या गोपनीयतेच्या हक्काचं उल्लंघन करणे आहे, असं सांगून कोर्टाने तिच्या बाजूने निकाल दिला. हे वाचून मला व्हर्जिनिया वूल्फच्या एका पुस्तकाची आठवण झाली. प्रत्येकीची स्वतःची खोली! तुम्ही म्हणाल, या दोन गोष्टींचा आपापसात काय संबंध आहे? तर गोपनीयता आणि खासगीपणा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि आजच्या युगात जिथे राहायला जागा कमी पडते, तिथे प्रत्येकाचा आणि प्रत्येकीचा फोन ही त्यांची स्वतःची खोली (रूम) झाला आहे.

प्रत्येकालाच एका वैयक्तिक जागेची गरज असते. जिथे तो किंवा ती, जसे ते आहेत तसे राहू शकतात. वागू शकतात. एखाद्या गोष्टीचा त्रास झाला, तर क्षणभर एकांत मिळवू शकतात. बाईसाठी ही जागा कायमच दुर्लक्षित राहिली आहे. यात मूलभूत प्रश्न हा आहे, की बायकांचं काही वैयक्तिक असतं का? त्यांचं त्यांचं, स्वतःसाठीचं? दिवसभर घरातील कामं, मूल, नवरा किंवा आई-वडील किंवा सासू-सासरे यांचे व्याप सांभाळणे, जर नोकरी करत असेल त्या कामाचा बोजा वेगळाच. यात तिला स्वतःसाठी वेळ असतोच कुठे? तिचं सगळं, म्हणजे अगदी सगळं घरातल्या तिच्यावर हक्क गाजवणाऱ्या पुरुषांना माहीत असतं... म्हणजे माहीत असावं, अशी अपेक्षा असते.

मला लहानपणापासून माझे भाऊ, मित्र, ज्या पद्धतीने, ‘जरा बाहेर जाऊन येतो, चक्कर टाकून येतो’ म्हणतात, याचं आकर्षण वाटत आलं आहे. कारण अजूनही कारणाशिवाय घराबाहेर पडायचं नाही, हा ‘संस्कार(!) मनावर इतका रुजला आहे की, वाटलं म्हणून बाहेर कधीही चक्कर टाकताच येत नाही. आधी मुळात वेळच नसतो आणि असला तरी एकट्या बाईने बाहेर जाऊन काय करायचं असतं? तिला सहज फिरून यावंसं वाटत नसेल?

ती कुठं काय करते? किती वाजता नक्की कुठं असते? हे सारे प्रश्‍न पुरुषांनीच जन्माला घातले आहेत. ती ऑफिसमध्ये असेल, तर अमुक वाजता घरी येतेच. यात त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असला, तर तो पुरुषांमुळेच आहे. नवऱ्याशिवाय इतर कुणाहीबरोबर ‘ती’ गप्पा टाकायलाही जाऊ शकत नाही. घरी मूलबाळ असेल तर रात्री मित्रच काय, मैत्रिणीबरोबरही राहायला जाऊ शकत नाही. (एक तर हे रात्रीचं काय गौडबंगाल आहे, हे मला कधीही कळलं नाही... म्हणजे दिवसभर ती एखाद्या पुरुषाबरोबर असेल तर संशय येत नाही, पण रात्र म्हणाली की सगळ्यांनी काढलाच संशयाचा फणा!) कोणतीही ‘ती’ तिच्या वैयक्तिक आयुष्यात काय करते हो? म्हणजे कुठल्याही बाईचं तिच्या घराव्यतिरिक्त काय आयुष्य असतं? कारण बाईपण हे सगळं घराशीच निगडित असतं. कुठल्याही ‘ती’ला एखाद्या नवीन माणसाबरोबर मैत्री करावीशी वाटली तर? दिवसभराच्या रगाड्यानंतर कुठेतरी शांतपणे बसावसं वाटत असेल आणि मी कुठे आहे हे आत्ता कुणालाही कळण्याची गरज नाही, असं वाटत असेल तर? ती ‘तिचे’ पैसे कुठे आणि कसे खर्च करते, याचा इत्थंभूत हिशेब द्यायचा नसेल तर? ती फोनचा वापर गेम खेळण्यासाठी करते, पॉर्न बघण्यासाठी करते, कुणाशीही गप्पा मारण्यासाठी करते, की बातम्या वाचण्यासाठी करते, हे तिला सांगावंसं वाटत नसेल तर? तर काय करायचं असतं?

गोपनीयता म्हणजे लपवाछपवी नसते. बाईला कशाला हवी गोपनीयता? लफडी करायला? असा एक सामूहिक सूर असतो. मुळात बाईची प्रत्येक गोष्ट लफडं करण्यासाठी, सेक्स करण्यासाठीच असते ही यामागची धारणा आहे. अगदी सेक्स करावासा वाटत असण्या किंवा नसण्यापासून स्वतःबद्दलची किती माहिती कुणाला द्यावयाची आहे किंवा नाहीपर्यंत काहीही आणि सगळं काही गोपनीयतेच्या अधिकारात येतं. माणूस म्हणून प्रत्येकाला स्वतःबद्दलची काही माहिती खासगी ठेवण्याचा अधिकार आहे. पण बायकांच्या आयुष्यात ‘त्या चार दिवसाव्यतिरिक्त’ काहीही खासगी नसतं, असं मानण्यात येतं.

प्रत्येकाला आणि प्रत्येकीला एक खासगी आयुष्य असतं आणि त्याचा जोवर आपण मान राखत नाही, तोवर समानतेच्या नुसत्या गप्पा मारत आहोत, असंच आजचं वास्तव आहे.

beingrasika@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com