esakal | ब्रा की ब्र
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रा की ब्र

कपड्यातून दिसणारा किती भाग लपवायचा असतो आणि किती भाग दाखवायचा, याचे पुरुषी फँटसीमधून ठरलेले काही निकष आहेत. या सर्व निकषांवर खरं उतरत आजची स्त्री मुक्त जगण्याची कसरत करत आहे.

ब्रा की ब्र

sakal_logo
By
रसिका आगाशे

एक मराठी नटी बायकांनी ब्रा वापरावी किंवा नाही याविषयी सोशल मीडियावर लिहिते आणि २१व्या शतकात मराठी जनता गडबडून जाते. सोशल मीडियावर चर्चेला उधाण येते. त्यावर लोक बोलत राहतात. माणूस म्हणून जगण्याच्या प्रक्रियेत आपण आता कुठे सामील होतोय, असं वाटत असताना परत एकदा प्राचीन काळात सोडून आलंय आपल्याला कोणी तरी असं वाटतंय गेले दोन-तीन दिवस.

हेमांगीच्या पोस्टने जे सुरू झालंय ते इतकं वरवरचं नाहीय. याचे अनेक पैलू आहेत. मुळात ‘अशा’ विषयावर उघडपणे चर्चा व्हावी का? झालीच तर ती स्त्रियांनी करावी का? मुळात स्त्रियांनी चर्चाच करावी का? स्त्रियांना हा हक्क कुणी दिला? नटी आहे म्हणजे तिच्या शरीराबद्दल कुणीही काहीही बोलू शकतं का? स्त्रीच्या अंतर्वस्त्रांबद्दल चर्चा करताना भारतीय संस्कृतीचं काय होणार? हे आणि असे अनेक प्रश्न मला ती पोस्ट वाचून नाही तर त्याखालच्या कमेंट्स वाचून पडले.

हेही वाचा: कसं आहे ड्रग्ज विश्‍व? त्याविषयी....

मुळात नटी किंवा अभिनेत्री जे काही करते, ते प्रसिद्धी मिळवण्यासाठीच करते असा जो एक गोड गैरसमज आहे तो दूर केला पाहिजे. ती स्त्री आहे, तिला बोलावंसं वाटलं, ती बोलली, इतकं सोप्पं विश्लेषणही करता येऊ शकतं. पडद्यावर, मंचावर दिसणारी नटी, मॉडेल असो वा रस्त्यात दिसणारी स्त्री, कोणीही असो ती पुरुषाच्या मनोरंजनासाठीच निर्माण झाली आहे, ही जी सरसकट धारणा आहे ती मुळातून उपटून काढण्याची गरज आहे. काही स्त्रिया आणि पुरुष प्रसिद्धीसाठी ‘अशा’ विषयावर बोलत असतील, तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांना प्रसिद्धी देणे टाळता येऊ शकते; पण याकडे दुर्लक्ष करता येत नाही. उपेक्षेने मारता येत नाही; कारण विषय ‘असा’ आहे ना! त्यासाठी कुठले विषय ‘असे’ असतात आणि का, हे बघितलं पाहिजे. सेक्स, जेंडर (मराठीत दोन्हीसाठी साधारणतः लिंग हाच शब्द वापरला जातो.) यासंदर्भातलं सर्व काही ‘असे’ या सदरात येतं का? पुरुषी कामोत्तेजना, मर्दानी ताकद वाढवणाऱ्या औषधांच्या जाहिराती सर्वत्र असतात. स्त्रीविषयक, लैंगिक अवयवांविषयी, हिंस्त्र अशा शिव्या चौकाचौकात खुलेपणाने देता येतात. स्त्रियांची बेकायदा विक्री हा सनातन धंदा आहे, पण स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांविषयी मात्र बोलायचं नाही, हा सामाजिक दांभिकपणा आहे.

हेही वाचा: श्रीमंतीचा दिखाऊपणा!

अंतर्वस्त्रांच्या निमित्ताने एक वेगळीच खिडकी उघडली आहे, असं मला वाटतं. यापूर्वीही स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीने अनेक वेळा लिहून, बोलून झालं आहे. आपण महासत्ता बनण्याच्या दृष्टीने (म्हणजे काय हा वेगळाच प्रश्न आहे!) ज्या वेगाने आपला प्रवास चालू आहे आणि दुसऱ्या बाजूने ज्या पद्धतीने आपण कट्टरतेच्या मार्गाने आदिम काळात जाण्याचा प्रयत्न करत आहोत, हे मुळातच हास्यास्पद आहे. या सगळ्यात स्त्रीची भूमिका काय आहे? स्त्रिया सर्व क्षेत्रांत काम करत आहेत, म्हणून त्या स्वतंत्र आहेत का? हा पहिला प्रश्न आहे. अजूनही आम्ही आमच्या बायकांना, मुलींना काम करू देतो म्हणणारे महाभाग सर्वत्र आढळतात! ‘करू देता?’ म्हणजे तुम्ही त्यांना समान दर्जा दिलेला नाहीय हेच अनेकांना समजत नाही. इतक्या प्राथमिक पायरीवर आपण उभे आहोत!

त्यानंतर संस्कृती आणि उतू जाणारे देशप्रेम! यामध्ये स्त्री कुठे आहे? आपली संस्कृती, एक तर स्त्रीला देवी म्हणून पुजायची आहे किंवा वहाण म्हणून बघण्याची आहे! (‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः’सारखा एखादा श्लोक आपल्या संस्कृतीचे दाखले ट्रोल करताना देऊ नका!) आणि मुळात स्त्रियांना कुणी विचारलंय का, की त्यांना पूजा करून घ्यायची आहे का स्वतःची? या संस्कृतीच्या भिंतीला पाठ टेकवून अनेक पुरुष आणि स्त्रिया, मुक्तपणे बोलणाऱ्या स्त्रीला घेराव टाकण्यास उत्सुक असतात. हो, स्त्रियादेखील! कारण त्यासुद्धा याच पितृसत्ताक समाजाची निष्पत्ती आहे. भारतासारख्या देशात चार पौराणिक, ऐतिहसिक स्त्रियांची नावं घेतली की बोलणारीला गप्प करता येईल, असा एक सरळ हिशेब असतो. त्या महान स्त्रिया त्यांच्या त्याच्या काळात पितृसत्तेशी लढत होत्याच आणि त्याही काळात त्यांच्यावर शेण फेकण्यात आलेच होते! (यावर सर्वप्रथम येणारी प्रतिक्रिया, ‘तुम्ही काय स्वतःची तुलना महान स्त्रियांबरोबर करता का?’ अशी येत असेल तर थांबा. ही तुलना आम्ही नाही तर तुम्ही करत आहात. करू नका. इतकं सोप्प आहे!) यातही शक्यतो अशा स्त्रिया निवडायच्या ज्यांना ‘मर्दानी’ म्हणता येईल आणि आत्ता एखाद्या स्त्रीने लढायचा प्रयत्न केला तर ती कशी पुरुषी आहे, यावर चर्चा करायची हा असंख्य लोकांचा छंद आहे.

हेही वाचा: खगोलज्ञान : करु या अंतराळ पर्यटन

या सगळ्याबरोबर भांडवलशाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. स्त्री ही फक्त उपभोग्य वस्तू आहे, हे जाहिराती, मालिका, सिनेमा, वेबसिरीज, शक्य त्या माध्यमांतून समाजमनावर बिंबवण्याचा प्रयत्न झालाय. त्यात स्वतःच्या मनातील काही व्यक्त करण्याचा अधिकार जर स्त्रीला मिळाला, तर ती या प्रतिमा तोडत बाहेर पडेल अशी भीती आहे. त्याचबरोबर दुतोंडीपणा. उदाहरणार्थ मालिकांमध्ये एखाद्या आत्याचा रोल करणारी नटी बघा प्रत्यक्ष आयुष्यात किती सेक्सी दिसते, अशा पद्धतीच्या बातम्या (?!) समाजमाध्यमांवर सतत असतात. म्हणजे स्त्रीने आत्याबाईसारखं सोशिक असलं पाहिजे ही पात्राकडून अपेक्षा आणि नटींनी सेक्सी दिसलं पाहिजे, अशी ही अपेक्षा आहे. मग तिने त्या सेक्सी अवतारात फोटो टाकला तर तो पाश्‍चात्त्य संस्कृतीचा प्रभाव आणि कशी आपली संस्कृती बुडवून टाकली असा ओरडा असतोच.

यात अनेकदा स्त्रीच स्त्रीची शत्रू असते. त्याच एकमेकींना समजून घेत नाहीत, असे एक नॅरेटिव्ह मांडण्यात येते. पुरुष तर याच नजरेने बघणार, असा यात एक सूर असतो. एक स्त्री म्हणून असा सूर का असतो, हे मी समजू शकते; पण हा विचार लांबवरच्या वाटचालीसाठी घातक आहे. जेव्हा आपण स्त्री म्हणून आपल्या समूहाविषयी काही मांडायचा प्रयत्न करतो तेव्हा किमान समान लिंगाच्या व्यक्तींनी तरी त्याची पाठराखण करावी, अशी इच्छा असणे स्वाभाविक आहे. यामध्ये दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. सगळ्या जगण्याकडे आपण पुरुषी नजरेने तर पाहत नाही आहोत ना, हे पाहणं इथं सयुक्तिक ठरेल.

मेल गेझ किंवा पुरुषी नजर हा एक यातला अविभाज्य घटक आहे. आपल्याला समाज म्हणून, म्हणजे स्त्री, पुरुष आणि इतर लैंगिक, कोणीही व्यक्ती असली तरीही स्त्रीकडे पाहण्याची नजर / दृष्टिकोन हा पुरुषी आहे. एक उदाहरण म्हणून सांगते. स्वतःला आवडते म्हणून तयार होताना जाचक, बंधनकारक, त्रासदायक, घट्ट असे कपडे का कुणी स्वतःहून घालेल? पुरुषी नजरेला जे चांगले दिसते, ती त्या त्या काळातली फॅशन असते. म्हणजे पूर्वीच्या काळी स्त्री देहाची महती गाताना गजगामिनी, भरल्या छातीची, कमनीय बांधा अशा पद्धतीची वर्णने व्हायची. त्या काळातल्या कलांमधून होणाऱ्या स्त्री देहाच्या आविष्कारातही हेच चित्र आपल्याला दिसते. आत्ता बारीक, उंच आणि तरीही कमनीय अशा ठेवणीचे आकर्षण आहे (हे देश, कालानुरूप बदलणारेही आहे) तेव्हा अनेक स्त्रियांची इच्छा तसेच दिसण्याची असते. कारण पुरुषी नजरेला जे आवडते तेच सुंदर असते, ही धारणा समाज म्हणून सगळ्यांच्या मनात आहे. त्यात कपड्यातून दिसणारा किती भाग हा लपवायचा असतो आणि किती भाग दाखवायचा, याचे पुरुषी फँटसीमधून ठरलेले काही निकष आहेत. या सर्व निकषांवर खरं उतरत आजची स्त्री मुक्त जगण्याची तारेवरची कसरत करत आहे.

हा विषय वाटतो तितका छोटा नाही. यात जात, वर्ग, धर्म, शहर, खेडी, पातिव्रत्य, व्यभिचार, मालकी हक्क, लैंगिक सुखापासून वंचित समाज, लैंगिक नैराश्य असे अनेक पदर आहेत. या सगळ्यातून जात असताना जर एखादी अंतर्वस्त्र घालण्याबद्दल तिच्या अंतर्मनातून काय वाटते, हे सांगत असेल तर पुरुषसत्तेला त्याचा हादरा बसणारच! मुळात स्त्रियांची लढाई ही पुरुषांबरोबर नसून पितृसत्तेशी आहे. पितृसत्ता, धर्म, संस्कृती या एकमेकांत गुरफटलेल्या गोष्टी आहेत. एक धागा खेचला की गुंता होणारच आहे... आणि मग ‘ब्रा’बद्दल तर तिला मुळीच बोलू द्यायचं नाही, खरं म्हणजे तिने ‘ब्र’ही नाही काढला पाहिजे, या अपेक्षेतून समाज प्रतिक्रिया देतच राहणार. स्त्रिया म्हणून आपल्याला बोलत राहावंच लागणार ही वस्तुस्थिती आहे.

(लेखिका प्रसिद्ध दिग्दर्शक आणि कलावंत असून, त्यांचे शिक्षण राष्ट्रीय नाट्य विद्यालयातून झाले आहे.)

beingrasika@gmail.com

loading image