esakal | खगोलज्ञान : करु या अंतराळ पर्यटन
sakal

बोलून बातमी शोधा

खगोलज्ञान : करु या अंतराळ पर्यटन

खगोलज्ञान : करु या अंतराळ पर्यटन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

डॉ. विनिता नवलकर

जगात ‘स्पेस टुरिझम’चा नवा अध्याय सुरू झाला आहे. भारताला मात्र अशी अंतराळ उड्डाणे करण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. गेल्या दोन ते तीन दशकांतील इस्रोची प्रगती बघता तो दिवस दूर नाही.

रशियाच्या युरी गागारीनने १२ एप्रिल १९६१ रोजी एक नवीन इतिहास रचला. ‘वोस्तोक-१’ या यानातून पृथ्वी प्रदक्षिणा करणारा तो पहिला मानव ठरला. त्यानंतर काही दिवसांतच अमेरिकेचा अंतराळवीर अॅलन शेफर्ड याने अवकाशात झेप घेतली. पृथ्वी प्रदक्षिणा करताकरता दहा वर्षांतच मानव चंद्रावरदेखील जाऊन पोहोचला.

दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस अमेरिका आणि रशियामध्ये शीतयुद्ध अगदी जोरात चालू झाले होते. याच शीतयुद्धातून या सर्व मोहिमांचा जन्म झाला. अंतराळ तंत्रज्ञान सर्वप्रथम कोणता देश विकसित करेल यावर सर्वांचे लक्ष होते. रशियाने बाजी मारत १९५८ ते १९७० पर्यंत आपले वर्चस्व स्थापित केले; पण १९६९ च्या अपोलो मोहिमेने सर्व चित्र पालटले. त्यानंतर अमेरिकेच्या नॅशनल एरोनोटिक्स अॅण्ड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा)ने बाजी मारत सर्व मोहिमांचे प्रयोजन खगोलीय विज्ञानाच्या विकासासाठी केले.

हेही वाचा: कर्नाटकात नेतृत्व बदलाची पुन्हा चर्चा; येडियुरप्पा म्हणाले...

१९७१ च्या सुमारास अंतराळ स्थानकाची कल्पना प्रथम रशियाने ‘सॅल्यूट-१’ या स्थानकाद्वारे प्रत्यक्षात आणली. नंतर मीर, स्काय लॅब व सध्या कार्यक्षम असलेले इंटरनॅशनल स्पेस स्थानक (आय.एस.एस.) उभारून मानवाने अंतराळात कायमचे वास्तव्य चालू केले. इंटरनॅशनल स्पेस स्थानक हे पाच देशांच्या समूहाने स्थापित केलेले स्थानक असून, त्यात सतत विविध वैज्ञानिक प्रयोग चालू असतात. तेथे वास्तव्यास असलेल्या अंतराळवीरांची तुकडी दर तीन ते सहा महिन्यांनी बदलण्यात येते.

पृथ्वीवरून या अंतराळवीरांना ने-आण करण्यासाठी अर्थातच अमेरिका आणि रशियाने विविध अंतराळ याने विकसित केली; पण सद्यस्थितीत नासाचे एकही यान कार्यक्षम नाही. त्यामुळे सर्व भिस्त सध्या रशियाच्या यानांवर आहे. अशातच खाजगी कंपन्या आता या क्षेत्रात उतरायच्या तयारीत आहेत.

आत्तापर्यंत या सर्व मोहिमांची जबाबदारी देशांच्या राष्ट्रीय संस्थांवर होती; पण काही अब्जाधीश खाजगी कंपन्यांतर्फे एका नवीन शर्यतीची सुरुवात होत आहे. त्यातूनच स्पेस टुरिझमचा नवा अध्याय चालू होतोय.

हेही वाचा: 'आम्हाला माहिती नाही'; दानिश यांच्या मृत्यूवर तालिबानने झटकले हात

अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचे मित्र, ब्रिटिश अब्जाधीश सर रिचर्ड ब्रॅन्सन हे आपल्या व्हर्जिन गॅलॅक्टिक कंपनीतर्फे नुकतेच अंतराळात प्रवास करून आले. त्यांनी १७ वर्षांपूर्वी अंतराळ प्रवासी होण्याचे स्वप्न पाहिले होते. ११ जुलै २०२१ रोजी वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांचे हे स्वप्न सत्यात उतरले आणि खासगी अवकाश पर्यटनाच्या नव्या युगाचा प्रारंभ झाला. त्यांच्या या सफरीत आणखी पाच क्रू मेम्बर होते. त्यात भारतीय वंशाची, व्हर्जिन गॅलॅक्टिक कंपनीचीच एरोनॉटिकल इंजिनिअर व अंतराळवीर सिरीशा बांदालासुद्धा सामील होती. न्यू मेक्सिकोच्या स्थानकातून उड्डाण करत हे सुपरसोनिक स्पेस शटल सुमारे ८८ किलोमीटर उंचीवर पोचले. तीन ते चार मिनिटे गुरुत्वाकर्षणरहित स्थितीचा आनंद घेत हे अंतराळवीर परत सुखरूप पृथ्वीवर उतरले.

या प्रवासात त्यांना पृथ्वीची वक्रता अनुभवता आली. आत्तापर्यंत आय.एस.एस. किंवा इतर यानाने प्रकाशित केलेली पृथ्वीची छायाचित्रे आपण सर्वांनीच पाहिलेली आहेत; पण स्वत:च्या डोळ्याने हे अनुभवण्याची संधी आता लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होण्याचे संकेत आहेत. अर्थात नजीकच्या काळात हे सौभाग्य काही अब्जाधीश व्यक्तींसाठीच मर्यादित असणार यात काही दुमत नाही; पण कालांतराने ही सेवा सर्वांसाठी उपलब्ध होऊ शकते.

व्हर्जिन गॅलॅक्टिक व्यतिरिक्त एलॉन मस्कची स्पेस एक्स, जेफ बेझोजची ब्लू ओरिजिन, ओरायन स्पॉन, बोईंग अशा विविध खाजगी कंपन्या या शर्यतीत अग्रेसर आहेत. त्यामुळे काही भारतीय व्यावसायिकसुद्धा आता अंतराळ सफर करण्याच्या तयारीत आहेत. केरळचे संतोष जॉर्ज कुलंगारा यांना व्हर्जिन गॅलॅक्टिकतर्फे पुढील काही महिन्यांत अंतराळ प्रवास करण्याची संधी मिळू शकेल. तसे झाल्यास ते स्पेस टुरिस्ट म्हणून पहिले भारतीय असतील.

हेही वाचा: 'आमचं बाळ काय ढगातून पडलंय का?'; म्हणणाऱ्यांना उर्मिलाचं सडेतोड उत्तर

या सर्व मोहिमांचा खर्च खाजगी कंपन्या करीत असल्या तरी त्या नासाच्या साह्यानेच पार पडत आहेत. त्यामुळे इतर देशांमध्येसुद्धा अशा प्रकारच्या मोहिमा त्या देशांच्या राष्ट्रीय संस्थांच्या मदतीने पार पडू शकतात.

सद्यस्थितीत भारत खरंतर या शर्यतीत नाही. भारतीय अंतराळ संस्था इस्रो सध्या आपले पहिले अंतराळवीर पाठवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी हवाईदलातील काही पायलट निवडण्यात आले आहेत; पण त्याच्या तयारीसाठी लागणारी साधने सध्या भारतात विकसित नसल्यामुळे त्यांचे प्रशिक्षण रशियामध्ये पार पडत आहे.

भारताचे श्रीहारीकोटा येथील प्रक्षेपण केंद्र जगातील काही सर्वोत्कृष्ट केंद्रांपैकी एक आहे; पण अंतराळवीरांच्या प्रशिक्षणासाठी लागणारे केंद्र काहीसे वेगळे असते. या प्रशिक्षण केंद्रात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पृथ्वीवर गुरुत्वाकर्षणरहित जागा तयार करणे, जेणेकरून अंतराळवीरांना अशा अवस्थेत राहण्याची सवय होईल. हे करणे खूप अवघड असते व खूप खर्चिकसुद्धा! तसेच कुठलेही अंतराळ यान उड्डाण करताना खूप वेगाने वर जाते. त्या वेळेस आत बसलेल्या अंतराळवीरांवर त्या वेगाचा विपरित परिणाम होऊ शकतो. म्हणूनच त्यासाठी त्यांना वेगळे प्रशिक्षण देणे गरजेचे असते.

असे प्रशिक्षण केंद्र उभारण्यास भारताला काही कालावधी नक्कीच लागेल, पण त्यासाठी न थांबता इतर देशांच्या मदतीने भारतीय अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय इस्रोने घेतला. जेणेकरून सध्या ‘गगनयान’ या आपल्या पहिल्या अंतराळ यानाच्या चाचण्यांवर इस्रो लक्ष केंद्रित करू शकेल.

भारताला मानवी अंतराळ उड्डाणे करण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असली तरी गेल्या दोन ते तीन दशकांतील इस्रोची प्रगती बघता तो दिवस दूर नाही हे नक्की. एकदा या सुविधा भारतात उपलब्ध झाल्या की खाजगी अंतराळ प्रवास चालू करण्यास अनेक भारतीय कंपन्या इच्छुक असतील. भारतीयांचा कुठल्याही प्रवासाचा उत्साह बघता स्पेस टुरिझमला भारतात चांगलाच प्रतिसाद मिळेल, यात नवल नाही.

(लेखिका खगोल अभ्यासक आहेत.)

loading image