मेकओव्हर : साडी : परंपरेसोबतच फॅशनही!

Saree
Saree

भारतात साड्यांचे १०८पेक्षा अधिक प्रकार स्त्रियांच्या नेसण्यात येतात. पेशवाईतील स्त्रिया प्रसंगानुरूप लुगडी, साड्या, चिरड्या, पातळे, पीतांबर, शालू, पैठणी नेसत असत. एकोणिसाव्या शतकात हिंदू स्त्रियांच्या वापरात असलेल्या साड्यांमध्ये लाल व हिरव्या रंगांचे रुंद काठ असलेली धारवाडी, माहेश्वरी, इरकली व नागपुरी लुगडी विशेष लोकप्रिय होती. तमीळ स्त्रियांचे लुगडे सात ते दहावार लांबीचे असते. कर्नाटक राज्यातील हुबळी, धारवाड, विजापूर या भागांत गडद रंगांतील सुती साड्या तयार होतात. इरकली साडी हा त्या भागात तयार होणारा विशेष प्रकार. आंध्र प्रदेशातील नारायणपेठ येथेही इरकली तलम साड्या तयार होतात, तसेच तमिळनाडूतील कांजीवरम रेशमी साड्या प्रसिद्ध आहेत. डाळिंबी लाल, मोराच्या मानेसारखा झळझळीत निळा, पोपटी हिरवा आदी आकर्षक रंगछटांमुळे या साड्या महिलांमध्ये विशेष प्रिय आहेत.

सहावार साडी, नऊवार साडी, बंगाली साडी, गुजराती साडी अशा पारंपरिक पद्धतीने साडी नेसता येते. पलाझो साडी, चुडीदार साडी, घागरा साडी, हाफ सारी दुपट्टा हा आता इंडोवेस्टर्न फ्यूजन प्रकार हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींचा आवडता झाला आहे. क्लासिक फॅब्रिक, जसे की सिल्क, लिनेन, कॉटन, लेस आदी नेहमीच ट्रेंडमध्ये असतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 वजन अधिक असलेल्या महिलांनी मोठ्या ठसठशीत दिसणाऱ्या प्रिंट किंवा एम्ब्रॉयडरीच्या साड्या शक्यतो टाळाव्यात. नाजूक दिसणाऱ्या महिलांनी बनारसी, ब्रोकेड साड्या नेसाव्यात. लायक्रा पेटीकोट बॉडीफिट असतात, साडीच्या आत हा पेटीकोट खूप कंफर्टेबल असतो. त्यामुळे फिगर व्यवस्थित दिसते. साडी पेटीकोट आपल्या उंची आणि बॉडी साइजप्रमाणे असावेत. पेटीकोट साडीखाली दिसू नये.

शिफॉन, जॉर्जेट, सॅटिन साडीचा पदर जास्त सोडावा आणि शक्यतो वनशोल्डर ठेवावा. पॉम-पॉम लेस, टेसल, कुंदन लावून आपण घरच्या घरी डिझायनर साडी बनवू शकतो. मार्केटमध्ये रेडीमेड साड्या देखील बनवून मिळतात, त्या स्कर्टप्रमाणे घालून आणि पदर घेता येतो. साडी निवडताना साडीचा रंग, कापडाची पोत आणि फंक्शनचा विचार करून साडी विकत घ्यावी. साड्या चांगल्या राहाव्यात, यासाठी त्याच्या घड्या बदलत राहाव्या. खडी, जरी, एम्ब्रॉयडरी असलेल्या साड्या ड्रायक्लीन कराव्यात.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com