बोलण्यातली संगती;मुलांना हे सांगा

बोलण्यातली संगती;मुलांना हे सांगा

काही मैत्रिणींना बोलताना रेल्वेगाडीसारखं बोलण्याची सवय असते. गाडी एकदा सुटली, की थांबतच नाही. आपल्याला खूप सांगायचं असतं, मनात खूप साठलेलं असतं, हे अगदी मान्य; पण ज्यांच्या बोलण्यात नेमकेपणा असतो, त्यांचं बोलणं इतरांना जास्त ऐकायला आवडतं, बरंका. विशेषतः एखादी महत्त्वाची गोष्ट सांगायची असेल, तर ती फापटपसारा मांडून सांगितली, तर मूळ गोष्टीकडे लक्षच जात नाही. आपणही अनेकदा बोलण्याच्या ओघात महत्त्वाची गोष्ट, निरोप विसरून जातो. त्यामुळे बोलण्यात जसा ठामपणा हवा, तसाच नेमकेपणाही हवा. त्यातून अनेक गोष्टी साध्य होतात. 

खासगी असो किंवा सार्वजनिक ठिकाणी; तुमच्या बोलण्यात प्रामाणिकपणाही जाणवला पाहिजे. ‘पोटात एक आणि ओठात दुसरं’ असलं, तर समोरचाही ते गांभीर्यानं घेत नाही किंवा त्याची दखल घेत नाही. त्यामुळे संभाषणकला विकसित करताना तुमची एरवीची मतं, विचार, वर्तन या गोष्टी तुमच्या बोलण्याशी जुळल्या पाहिजेत, हे लक्षात घ्या. खूप भाषणं, निवेदन, सूत्रसंचालन करायची इच्छा असेल, तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवाच; पण अगदी घरात पालक म्हणून वावरतानाही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. पालक स्वतः सतत मोबाईल वापरत असतील आणि मुलांना गॅजेट्स नकोत, असं सांगत असतील; तर मुलं कितपत गांभीर्यानं ऐकतील? त्यामुळे ‘वक्ता आणि वर्तन’, ‘वक्ता आणि विचार’ या गोष्टीही एकमेकांशी खूप सुसंगत असल्या पाहिजेत, हे लक्षात घेतलं पाहिजे. एका मुलाला साखर खाऊ नको, असं सांगण्यापूर्वी महात्मा गांधी यांनी स्वतः दोन आठवडे साखर खाल्ली नाही आणि मग त्याला सांगितलं, अशी गोष्ट आपण ऐकली आहे. गांधीजींच्या आत्मचरित्राच्या ‘माझे सत्याचे प्रयोग’ या अनुवादात अनेक गोष्टी वाचायला मिळतात. बोलण्यातली आणि वागण्यातली सुसंगती किती महत्त्वाची, ते त्यातून कळतं.

‘बोल’के कानमंत्र 
घरात असो किंवा सार्वजनिक ठिकाणी; बोलणं जितकं नेमकं, सुसंगत असेल, तितकं ते गांभीर्यानं ऐकलं जातं. 
बोलण्याच्या ओघात मूळ गोष्ट काय सांगायची आहे ती विसरू नका. 
तुमचं बोलणं स्पष्ट असू द्या, स्वर खूप टिपेचे किंवा खूप खालचे नकोत. ते व्यवस्थित ऐकता आलं पाहिजे.
तुमचे विचार, वर्तन आणि तुमचं बोलणं यांच्यात सुसंगती असू द्या. 

मुलांना हे सांगा
मुलांच्या बोलण्यात अनेकदा एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी संबंध नसतो. त्यात संगती यावी, यासाठी त्यांना गोष्टी सांगण्याची सवय लावा.
घरात कुणी पाहुणे, मित्रमंडळी आल्यास मुलांना काहीतरी सादर करायला प्रोत्साहन द्या. त्यातून ‘स्टेज डेअरिंग’ येतं.
मुलांमध्ये भाषा विकसित होण्यासाठी अधूनमधून एखादा विषय देऊन त्या विषयावर घरातल्या घरातच बोलायला सांगा. ते बोलणं इंटरेस्टिंग कसं बनवता येईल, हेही शिकवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com