कीर्तनकाराची 'शिवलीला'

संपत मोरे
Saturday, 21 March 2020

पुरुषांचे क्षेत्र म्हणून मानल्या गेलेल्या कीर्तनाच्या क्षेत्रात आलेल्या महिला कीर्तनकारांनी ठसा उमटवला आहे. शिवलीला पाटील हे त्यांपैकी एक नाव.

कीर्तन म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर फेटेवाले कीर्तनकार उभे राहतात. त्यांच्याभोवती टाळकरी उभे आहेत, कीर्तन सुरू आहे, समोर बसलेले भाविक कीर्तन ऐकत आहेत, दाद देत आहेत असे कीर्तनाचे पारंपरिक स्वरूप आपण बघतो. मात्र, अलीकडच्या काळात महिलाही कीर्तन क्षेत्रात उतरल्या आहेत. गावोगावी आणि शहरी भागात महिला कीर्तनकारांची कीर्तनं होतात. शहरी भागात बदल लगेच स्वीकारला जातो, पण ग्रामीण भागात बदलाला उशीर लागतो. ग्रामीण भागातही शिवलीला पाटील यांच्यासारख्या युवा कीर्तनकारांच्या कीर्तनाला प्रतिसाद मिळताना  दिसतो आहे.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुरुषांचे क्षेत्र म्हणून मानल्या गेलेल्या कीर्तनाच्या क्षेत्रात आलेल्या महिला कीर्तनकारांनी ठसा उमटवला आहे. शिवलीला पाटील हे त्यांपैकी एक नाव. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी हे तिचं गाव. वेगळ्या वाटेनं वाटचाल करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्या समाजप्रबोधन करत आहेत.

 शिवलीला पाटील यांचे वडील बाळासाहेब पाटील कीर्तनकार आहेत. कथनशैलीचं बाळकडू त्यांना घरातच मिळालं. वयाच्या पाचव्या वर्षी शिवलीला कीर्तन करू लागली. त्यानंतर तिनं अनेक गावांत कीर्तनं केली. तिच्या कीर्तनाला प्रतिसाद मिळू लागला. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत शिवलीलानं ग्रामीण आणि शहरी भागात स्वतःचा चाहता वर्ग बनवला. तिनं एक हजार कीर्तन केली.

पुढं महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच तिनं आपली कीर्तनाची आवड जोपासली. अस्सल ग्रामीण भाषा, तर कधी प्रमाण मराठी भाषेचा वापर करत ती निरूपण करते. कौटुंबिक जीवनातील वेगवेगळे प्रसंग, समाजातील वेगवेगळ्या गोष्टी, अधूनमधून विनोदाची पेरणी करत कीर्तन करते. तिनं स्वतःची एक शैली निर्माण केली आहे. ही शैली लोकांना भिडणारी आहे. सोशल मीडियावर तिला मानणारा एक वर्ग आहे. तरुणाईला साद घालत ती जीवनमूल्यं सांगते. ती लोकांशी संवाद करत अभंगाचं निरूपण करते. कमी वेळेत तिनं आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivleela Patil article