बिनकुंकवाच्या बायका

women's
women'ssakal media

बिनकुंकवाच्या बायका

श्रावणात राब राब राबणाऱ्या या लाल कुंकूवाल्या बायका आणि सणाच्या दिवशी अनेकदा घरातून बाहेरही न पडणाऱ्या बिनकुंकवाच्या बायका... दोघींनीही आपापली श्रावण गीते लिहावीत आणि साजरा करावा श्रावण... कुणावरही ओझं होणार नाही अशा बेताने!

श्रावण आला की लहानपणीच्या आठवणी येतात... पुरणावरणाचा स्वयंपाक, रांगोळ्या, नैवेद्याचं ताट... आणि सवाष्णीची वाट. ही सवाष्ण शक्यतो आत्या किंवा मामी असायची. ती बिचारी तिच्या घरचं करून यायची. दमली भागलेली, जरीच्या साडीत, घामाने थबथबलेली... एखाद्या वर्षी आई ही अशी जायची... घरची सवाष्ण आटोपून. आता आपल्या जातीतल्या सवाष्ण बायका दरवेळी कुठून पैदा करणार. कारण श्रावण म्हटलं, की दर दुसऱ्या दिवशी काही तरी असायचंच. एक वर्षी बाबांनी फतवा काढला, की ज्या मावशी घरी स्वयंपाकाला येतात, त्यांनाच सणाच्या दिवशी पाटावर बसवून आपण जेवायला घालायचं.

(आपण म्हणजे आईनंच...) जात विचारायची नाही. एवढा पुरोगामीपणा, त्यांच्या पिढीला पुरेसा होता. आईचा चेहरा जरा बावरला होता... मग थोडी कुजबुज... सवाष्ण आहे ना, मग कशाला जात पाहायची, इत्यादी... मला सवाष्ण म्हणजे काय ते कळत नव्हतं... मग कुठलं तरी हळदी-कुंकू आलं. आसपासच्या बायकांना बोलवायला सांगितलं. मी सगळ्यांना सांगून आले. कोपऱ्यावरच्या एका मावशींनाही. आई भडकलीच; पण तशा त्या स्वतःच येणार नाहीत म्हणा, असं म्हणाली आणि मग मला समजावलं, की सगळ्या म्हणजे त्याच बायका ज्यांनी कुंकू लावलंय!

मी : काळी टिकली पण चालेल? समोरची ताई लावते.

आईंनी इतक्या फणकाऱ्यानं पाहिलं, की लाल रंगाचा अर्थ डोक्यात पारच भिनून गेला.

जी टिकली / कुंकू लावते त्याच बाईला बोलवायचं आणि बाकीच्या? त्यांचं काय होतं या श्रावणाच्या महिन्यात? कुठल्याही सणसमारंभांत? विधवा, परित्यक्ता, प्रौढ कुमारिका (हा एक शब्द मला फार त्रास देतो.) या सगळ्यांचं सणासुदीला काय होतं?

बहुतेकांच्या घरी आपण हे पाहिलंय. कारण आपल्याकडे सगळे सण सौभाग्याच्या भोवती गोळा झालेत ना! आणि सौभाग्य हे फक्त नवरा असेल तर!

आता काळ बदललाय. आता काही बायकांचे असे हाल होत नाहीत, वगैरे गप्पा मारणाऱ्यांनी, सणाच्या दिवशी, जरा घरात नजर मारून पाहावं. एखादी आत्या, सुरकुतलेलीशी बसलेली असते. एखादी काकू, आपल्या सुनेला पुढे पुढे पाठवत असते. एखादी बिनलग्नाची ताई सपाट चेहऱ्यानं शून्यात नजर लावून बसलेली असते. त्यांना या सणात काही स्थानच नाहीय. असं पुरुषांचंही होतं का? खूप कमी प्रमाणात असावं. कारण सणात गजबलेलं स्वयंपाकघर आणि सगळं घरच फक्त आणि फक्त बाईची जबाबदारी असते. त्यात सोवळ्याओवळ्यातले स्वयंपाक, नैवेद्य आले, ओलेत्याने करायच्या पूजा आल्या आणि आजही असंख्य बायका, आपला नोकरी-धंदा सांभाळून हे सगळं करत असतात. कारण श्रावणी सोमवार आहे, म्हणून काही ऑफिसला सुट्टी मिळालेली नसते.

मग गणपणी, नवरात्र हे सगळं आहेच. तपशिलाच्या फरकाने हे समस्त घरात होतंच असतं. मग यात बिनकुंकवाच्या बायका काय करतात? यातले अनेक सण बायकांना माहेरी येता यावं, चार बायका एकत्र जमा होऊ शकाव्यात, वगैरे विचारांतून सुरू झाले असावेत, पण आता ते बायकांच्या मानेवरचा जोखड बनत नाहीत ना, हे बघण्याची वेळ आली आहे. (कृपया कुंकू लावण्याचे वैज्ञानिक फायदे या विषयावर नका जाऊ. बायकांनी लावायचं आहे ना, त्यांचं त्यांनी ठरवावं आणि त्यांनीही फक्त स्वतःपुरतंच ठरवावं.)

खरं तर खूप काही परत नीट बघण्याची वेळ आली आहे. लग्नसंस्था, त्यात नवऱ्यांना असणारे वारेमाप महत्त्व, नोकरी करायची असेल, घराबाहेर पडायचं असेल तर आधी मी किती चांगली गृहिणी आहे, हे सिद्ध करण्याची चढाओढ, संस्कृती (म्हणजे कोणाची हा दीर्घ चर्चेचा विषय आहे.) वाचवण्यासाठी केली जाणारी तारेवरची कसरत... सगळंच तपासून बघायला हवं. कारण जेव्हा नवरा हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं, तेव्हा नवऱ्याशिवाय आयुष्य काढणाऱ्या सर्व बायका या दुर्भागी आहेत, असं प्रतीत होत आहे. या बिनकुंकवाच्या बायकाही त्यांचं त्यांचं आयुष्य कदाचित खूप कष्टानी उभे करत असतात.

यापैकी कोणाचे नवरे वारले असतील, कोणाचं लग्न होत नसेल, कोणाला करायचं नसेल, कोणी समलिंगी असतील, त्यांना कधी रांगोळीच्या पाटावर बसवून, प्रेमानी खायला दिलं जाणार आहे? मुळात सतत स्वयंपाकघर सांभाळणाऱ्या बाईला, फक्त नवरा आहे म्हणून अधिक महत्त्व देऊन, रोजच्यापेक्षा जास्त काम दिलं जातंय? त्यांना सुट्टी कधी मिळणार आहे? सणाच्या दिवशी पाळी आली तर किती दिवस कानकोंडे व्हावं लागणार आहे? नाही करता आले दोन पदार्थ तर किती दिवस अपराधी वाटणार आहे. (यावर अनेक बायका म्हणतील, आम्हाला मिळतो आनंद आमच्या कुटुंबाला खाऊ घालण्यात. त्यांना विनंती आहे की, पुरुषांनाही आनंद मिळू द्या की जरा.)

आता खरंच वेळ आली आहे... श्रावणात राब राब राबणाऱ्या या लाल कुंकूवाल्या बायका आणि सणाच्या दिवशी अनेकदा घरातून बाहेरही न पडणाऱ्या बिन कुंकवाच्या बायका... दोघींनीही आपापली श्रावणगीते लिहावीत आणि साजरा करावा श्रावण... कुणावरही ओझं होणार नाही अशा बेताने!

beingrasika@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com