माझिया माहेरा : सुगंधी आठवणी

माझं माहेर सातारा जिल्ह्यातील गोंदवले. श्री सद्‍गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांमुळे एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेलं हे गाव. मंदिरापासून माझं घर अंदाजे एक किलोमीटर अंतरावर, सातारा-सोलापूर रोडच्या बाजूलाच आहे.
माझिया माहेरा : सुगंधी आठवणी
Summary

माझं माहेर सातारा जिल्ह्यातील गोंदवले. श्री सद्‍गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांमुळे एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेलं हे गाव. मंदिरापासून माझं घर अंदाजे एक किलोमीटर अंतरावर, सातारा-सोलापूर रोडच्या बाजूलाच आहे.

- स्मिता साळुंखे (पडमलकर), कोथरूड, पुणे

माझं माहेर सातारा जिल्ह्यातील गोंदवले. श्री सद्‍गुरू ब्रह्मचैतन्य महाराजांमुळे एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेलं हे गाव. मंदिरापासून माझं घर अंदाजे एक किलोमीटर अंतरावर, सातारा-सोलापूर रोडच्या बाजूलाच आहे. माझे वडील कृषी अधिकारी होते (आता ते रिटायर झाले). त्यामुळे माझ्या माहेरचं घर छान चिक्कूच्या, आंब्याच्या, नारळाच्या चिंचेच्या अशा विविध झाडांनी नटलेलं! आम्ही चार भावंडं, आम्ही तीन बहिणी आणि एक भाऊ. मी सगळ्यात शेंडेफळ त्यामुळे सगळ्यांची खूप लाडकी!

आमच्याकडे शेतीही भरपूर होती. वडिलांच्या ऑफिसमुळे त्यांना शेतीकडे लक्ष द्यायला हवा तेवढा वेळ मिळायचा नाही, त्यामुळे शेतीची सगळी जबाबदारी आईनं खंबीरपणे स्वतःवर घेतली. कंबर कसून ती रोज सकाळी शेतात जायची ते संध्याकाळीच परत यायची. घरातली बरीचशी कामं माझ्या दोन्ही मोठ्या बहीणी करायच्या, त्यामुळे आईला हातभार लागायचा. हळूहळू, माझ्या मोठ्या दोन्ही बहिणींची लग्नं झाली, आता आईवर घरातल्याही सगळी कामांची जबाबदारी आली. मी तेव्हा पाचवी-सहावीत असेन. आता मी आणि माझ्या भाऊ शाळेतून घरी आलो की घरी कोणीच नसायचे. संध्याकाळी आई परत येईपर्यंत मी तिच्यासाठी चहा करायचे, भात करायचे जमेल त्या आकाराच्या पोळ्या करून ठेवायचे. कारण आई खूपच दमून यायची आणि बऱ्याचदा संध्याकाळची लाईटपण जायची.

गुरुवारी मी आणि दादा खूप खूश असायचो- कारण त्या दिवशी आठवडी बाजारामुळे, आई घरीच असायची. कधी एकदा शाळेतून घरी जातोय असं व्हायचं. आई आमच्यासाठी बाजारातून भरपूर खाऊ आणून ठेवायची. गुरुवार कधी संपूच नये असं वाटायचं. रविवारी आम्हीपण आईबरोबर शेतात जायचो आणि दिवसभर तिच्या मागे मागे फिरायचो. नंतर भावाचंही लग्न झालं. वहिनी आल्यावर आईचा बराचसा भार कमी झाला. आईचं वय ६८, आता मात्र तिनं सगळ्या कामांमधून रिटायरमेंट घेतली आहे. तरीही आम्ही माहेरपणाला गेलो, की तिच्यात हत्तीचं बळ येतं. मुलींचं, जावयांचं व नातवंडांचे कौतुक करायला ती तसूभरही कमी पडत नाही. तिच्या मुलांच्या सुखाचं समाधान तिच्या थकलेल्या चेहऱ्यावर आम्हाला दिसतं. अजून काय हवं असतं माहेरी गेल्यावर!

गोंदवल्याला दरवर्षी दत्तजयंतीपासून सलग दहा दिवस श्री महाराजांचा उत्सव चालू असतो. मंदिराच्या परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना विविध सौंदर्यप्रसाधनांची, खेळण्यांची आणि खाऊची दुकानं लागतात. लहान असताना हा उत्सव म्हणजे आमच्यासाठी आनंदाची पर्वणीच असायची. माझे आजी-आजोबा उत्सवात खरेदीसाठी आम्हा सर्व भावंडांना पैसे द्यायचे. पैसे अगदी थोडेच असायचे; पण आम्ही एकदम खूश होऊन जायचो, त्याचं काय घेऊ नी काय नको असं व्हायचं. उत्सवाच्या दहा दिवसांत मंदिरात दिवसरात्र अन्नदान सुरू असायचं. आम्हाला आमच्या शाळेकडूनच मंदिरात प्रसादासाठी नेले जायचे. आज वर्षानुवर्षं त्या प्रसादाची चव तीच आहे, जी अजूनही जीभेवर रेंगाळत आहे.

आता लग्नानंतर दरवर्षी उत्सवाला जाणं होत नाही; पण उत्सवाच्या दहा दिवसांत मन मात्र सगळा उत्सव फिरून येतं आणि परत माहेरच्या आठवणी ताज्या होतात आणि....

‘वाटनं माहेराच्या धावत मन जातं गुलाब जाईजुई मोगरा फुलवीत...’

आवाहन

माहेर... प्रत्येक स्त्रीचा जिवाभावाचा विषय. घराचा उंबरठा ओलांडून स्त्री सासरी जाते; पण मनातला एक कप्पा कायमच माहेरासाठी राहतो. माहेर म्हणजे फक्त घरच नाही, तर कुटुंबीय, आजूबाजूचे लोक, गाव, संस्कृती यांचे असे चित्र. तुमच्याही मनात माहेरच्या आठवणी रुंजी घालत असतीलच. अशा आठवणींसाठी आम्ही उपलब्ध करून देत आहोत एक खास व्यासपीठ. तुमचे माहेराविषयीचे मनोगत आम्हाला पाठवा. शब्दमर्यादा साधारण तीनशे-साडेतीनशे शब्द. माहेरातला एखादा सेल्फी किंवा फोटो मात्र त्याबरोबर हवाच. तुमचं आधीचं आणि आत्ताचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबरही त्यात आवश्यक. चला तर मग, करा सुरुवात. मजकूर पाठवण्यासाठीचा ई-मेल : maitrin@esakal.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com