esakal | जिद्दीचा प्रवास 
sakal

बोलून बातमी शोधा

Solo travel Shabana Syed

जिद्दीचा प्रवास 

sakal_logo
By
शिल्पा परांडेकर

नाव : शबाना सय्यद, 
गाव : पुणे
वय : ३३ वर्षे,  
काम : लेखापाल

‘कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही; पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं. कारण, आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.’ 
- व. पु. काळे


अशीच गगनभरारी घेणारी ‘सोलो ट्रॅव्हलर’ शबाना सय्यद. आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, शैक्षणिक अडचणींवर मात करून, आपल्या सर्व स्वप्नांना सत्यात उतरवते तेव्हा खरंच ‘गगनभरारी’ म्हणजे नेमकं काय असतं, हे जाणवतं. जी मुलगी तिच्या लहानपणी कुठे फिरायला किंवा गावी नातेवाइकांकडेही गेली नाही, तिने आज ६ देश, भारतातील काही राज्ये, शहरे, ट्रेक्स असा प्रवास एकटीने केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘‘पहिली सोलो ट्रीप - थायलंड. एकटीनं कसा प्रवास करायचा असतो, हा प्रश्न तर होताच. शिवाय परदेश प्रवास म्हणजे इंग्रजी बोलणं आलंच. प्रवासाच्या ओढीनं या इंग्रजीच्या भीतीवर मी आधी मात केली’, असे शबाना सांगते. पुढे प्रवासात तिला इतर देशातील तिच्यासारखे अनेक सोलो ट्रॅव्हलर भेटले. त्यांच्याशी मैत्री, बोलणे यामुळे आपल्याला इंग्रजी येत नव्हते याचा विसर पडला, तो कायमचाच.

इतका सगळा प्रवास व कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडायच्या म्हणजे अर्थकारणाचे गणितही जमवले पाहिजे. त्यासाठी तिने योजलेले उपाय आपल्या प्रत्येकासाठी मार्गदर्शक आहेत. परदेशातील प्रवास तिकिट खर्चासहित ५० हजारांच्या आसपासच होईल, याची ती दक्षता घेते. कॅबऐवजी दुचाकीने प्रवास, स्ट्रीट फूड किंवा स्थानिक जेवणाला प्राधान्य अशा काही महत्त्वाच्या गोष्टी ती करते. शिवाय तिच्या प्रवासासाठी बँकेत तिचे एक स्वतंत्र खाते आहे. जेणेकरून वर्षातून ती जास्तीत जास्त दोन देश आणि चार शहरांचा प्रवास करू शकेल.

‘प्रत्येक प्रवास हा नवे अनुभव देणारा असतो. आचारविचार, संस्कृतीची देवाणघेवाण मला समृद्ध करते. घरची जबाबदारी पार पाडून माझ्या स्वप्नांना पूर्णत्वाकडं नेणं, ही माझी जिद्द मला एक स्वतंत्र ओळख देते,’ असे ती सांगते.  प्रवासामुळे आलेल्या प्रगल्भतेमुळे व आत्मविश्वासामुळे ती तिच्या मित्र परिवारात, नातेवाइकांमध्ये लोकप्रिय झाली आहे. प्रत्येकालाच आता तिच्या प्रवासानंतर तिच्या प्रवासाच्या गोष्टी ऐकायच्या असतात. तर काही जणांना तिच्यासारखे प्रवासाला एकट्याने जायचे असते. शाबनाही त्यांना आनंदाने  मार्गदर्शन करते.

‘स्वतःला कमी न लेखता जिद्दीने प्रवास करा. स्वतःचा आदर केलात तर आपोआपच इतर लोकही तुमचा आदर करतील. सोलो ट्रॅव्हलिंगमुळं आपल्याला आपली स्वतःची ओळख पटते,’ हा शबानाचा सल्ला देशाटनात व जीवनाच्या प्रवासातही लाखमोलाचा वाटतो. हो ना?

loading image
go to top