esakal | वुमनहूड  : सवारी  
sakal

बोलून बातमी शोधा

radhika

आपण कलाकार स्वच्छंदी, आपला अभिनयाचा व्यवसाय किती अस्थिर असतो हे तुला माहितीच आहे. मला फिरायला आवडतं. ही कल्पना मला माझ्या बायकोनं दिली.रिक्षा चालवायच्या माझ्या व्यवसायात वेळ,काळ,स्थळ यांचं बंधन नाही.

वुमनहूड  : सवारी  

sakal_logo
By
रानी (राधिका) देशपांडे, अभिनेत्री

‘बोला ताई, कुठे जायचंय?’ गोड, गोंडस, पिवळ्या काळ्या रंगाच्या या हत्तीच्या पिल्लातून तुम्ही कधी सवारी केली आहे का? अहो, म्हणजे ऑटो रिक्षा. मला वाटतं बहुतांश लोकांनी यात प्रवास केला असणार आणि एखादा अविस्मरणीय किस्सा नक्कीच असणार. तुम्हाला प्रश्‍न पडला असणार, की मी ऑटोत ड्रायव्हरच्या सीटवर बसून काय करते आहे? 

तर ही रिक्षा आहे रमेश चांदणे, आमच्या ‘आई कुठे काय करते’ मधल्या एका कलाकाराची. तो कलाकार असून रिक्षाही चालवतो. ही त्याची स्वतःची रिक्षा आहे. मला ही बाब कौतुकाची आणि कुतूहलाची वाटली. मी त्याला विचारलं, ‘रिक्षाच का?’ तो म्हणाला, ‘हे बघ राधिका, रिक्षा चालवायला वेळ, काळ, स्थळ लागत नाही. आपण कलाकार स्वच्छंदी, आपला अभिनयाचा व्यवसाय किती अस्थिर असतो हे तुला माहितीच आहे. मला फिरायला आवडतं. ही कल्पना मला माझ्या बायकोनं दिली. रिक्षा चालवायच्या माझ्या व्यवसायात वेळ, काळ, स्थळ यांचं बंधन नाही. शिवाय ते मूलभूत गरजांमध्ये मोडतं.’ 

खरंय त्याचं म्हणणं. आम्हा कलाकारांना पडेल ते काम करण्याची सवय असते, कुठलीही लाज न बाळगता. आम्हीही पोटार्थी माणसंच आहोत की! त्यात चांदणेसारखा हरहुन्नरी सारथी मिळाल्यावर प्रवास रंजक होत असेल हे निश्‍चित. त्यावर त्याचं म्हणणं होतं, ‘राधिका, अगं प्रवाशांचा अनुभव चांगला ठेवायचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो. त्यांना त्यांच्या ठिकाणी सुखरूप पोचवतो, माझी सर्व्हिस त्यांना प्रामाणिकपणे, आत्मीयतेनं आणि आनंदानं देतो. माझे अनुभव चांगले आणि म्हणशील तर बरेच कठीणही असतात. तू रिक्षा चालवत नाही, मी रोज चालवतो त्यामुळं ते तुला कसं कळणार. हे मला ठाऊक आहे.’ चांदणे बोलत होता ते खरं आहे. मला रिक्षा चालवण्याचा अनुभव नाही, मात्र ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये काम करण्याचा आहे. मी अभिनय क्षेत्रात काम करण्याआधी दोन वर्ष बंगळूरला एअरपोर्टवर एअरलाइनमध्ये काम केलं आहे. ट्रॅव्हल इंडस्ट्री आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्री यांचा जवळचा संबंध आहे. कारण इथं प्रत्येक जण प्रवासी आहे, आणि प्रवास हा प्रत्येक जण आनंद मिळवण्यासाठी करतो. ‘अनेक कलाकारांनी रिक्षा, ट्रक चालवला आहे. त्यांच्यातलाच मी एक आहे,’ असं चांदणे म्हणतो. मी विचार केला आपणही रिक्षा चालवून बघायला काय हरकत आहे. तो म्हणाला, ‘रोज नवीन लोकांना भेटतो, रोज नवीन रस्ते धरतो. कृष्णाने रथ चालवला, मी रिक्षा चालवतो. त्याने अर्जुनाला उपदेश दिले, मी मात्र सवारी बसली की त्यांनी दिलेल्या अनुभवांनी श्रीमंत होतो. त्यातही मी मजा करतो बरं का! येणाऱ्या ग्राहकाच्या चालीवरून मी ओळखतो, हा प्रवासी कुठल्या प्रकारचा प्राणी आहे. वाघ, माकड, गेंडा का उंदीर. त्यावर मी त्याच्याशी वागायचं बोलायचं कसं हे ठरवतो. इथे माझे अभिनयाचे धडे उपयोगी पडतात तर कधी त्याचा कस लागतो.’ तो म्हणाला ते खरं आहे. मी एअरपोर्टवर काम करायचे तेव्हा तऱ्हेतऱ्हेची माणसं भेटायची. माणूस ओळखायला, पारखायला मी शिकले. त्यांच्याशी बोलणं, त्यांना बोलतं करणं शिकले. त्यांच्या लकबी, हातवारे, हावभाव याचं निरीक्षण करून सूक्ष्म हालचाली टिपून, घरी येऊन त्यांची नक्कल करणे, प्रसंगांचं वर्णन आणि त्यातलं नाट्य शोधणं हा खेळच होता माझ्याकरता. 

देशभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

आम्ही कलाकार स्वतःला सारथी समजतो. ड्रायव्हर सीटवर बसणं आम्हाला आवडतं. प्रवास करणं आणि तो इतरांना घडवून आणणं आम्हाला जमतं. प्रत्येक क्षणात आम्ही असतो. कर्ता-करविता आमचा दिग्दर्शक असतो. आपण फक्त स्टिअरिंग धरण्याचं काम करतो, जे जोखमीचं असतंच. गणरायाचा वरदहस्त असल्यावर आम्हाला कसली भीती! शूटिंग संपल्यावर चांदणे रिक्षा निघाला घेऊन. मी सहज विचारलं, ‘आता घरी का?’ तर म्हणाला, ‘नाही गं, एका आजोबांनी रिक्षा बुक केला आहे. गणपती बाप्पांची मूर्ती आणून द्यायची आहे. पुढं दोन दिवस आपलं शूट आहे.’ 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बरं तुमचं काय? येताय का माझ्याबरोबर? अहो, मी ड्रायव्हर सीटवर बसली आहे. चांदणेकडून शिकून घेतलंय. मी रिक्षाचं नाव ‘गजगामिनी’ ठेवलंय. मी ड्रायव्हर सीटवर असल्यामुळं फरारीच्या सवारी शिवाय कमी नसणारे! 

एकदा म्हणा ‘गणपती बाप्पा मोरया’ आणि सुरू करा किक, स्टार्ट आणि भुर्र… 

loading image
go to top