वूमन हेल्थ  : माझ्यासाठी ‘आयव्हीएफ’ योग्य आहे? 

डॉ. ममता दिघे 
Saturday, 27 June 2020

वर्षभर किंवा त्याहूनही अधिक दिवस प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसली, तर जोडपं अस्वस्थ आणि  निराश होऊ लागतं.  आधीच खूप काळ गर्भधारणा पुढं ढकलली असल्यानं जास्तच अस्वस्थता येते.  

वर्षभर किंवा त्याहूनही अधिक दिवस प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नसली, तर जोडपं अस्वस्थ आणि निराश होऊ लागतं. आधीच खूप काळ गर्भधारणा पुढं ढकलली असल्यानं जास्तच अस्वस्थता येते. ही गोष्ट नैसर्गिकपणे होते आणि झाली पाहिजे, पण तसे होत नसल्याने अधिकच त्रास होऊ लागतो. मग फर्टिलिटी स्पेशालिस्टकडे जायची लगबग सुरू होते. तपासण्या आणि उपचार घेऊनही यश न आल्यास किंवा वेगळीच कारणे लक्षात आल्यास ‘आयव्हीएफ’ या पर्यायाचा विचार करावा का, हा प्रश्न समोर येतो. अनेक प्रकारच्या वंध्यत्वावर ‘आयव्हीएफ’ने मात करता येते. इन व्हिट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच ‘आयव्हीएफ’ने दरवर्षी हजारो जोडप्यांची संसारवेल यशस्वीपणे फुलवली आहे. 

‘आयव्हीएफ’साठी चांगला उमेदवार कोण? 
‘आयव्हीएफ’च्या आधी पेशंट आणि डॉक्टरसुद्धा साधे उपचार करून बघणे योग्य समजतात आणि त्याने गर्भधारणा होतेही. मात्र, अशा उपचारांना यश येत नसल्यास किंवा ‘आयव्हीएफ’ हेच उत्तर असलेली गंभीर कारणे समोर आल्यास त्याचा विचार वेळीच करणे उपयोगाचे ठरते. 

‘आयव्हीएफ’ करावे लागण्याची कारणे 
- फॅलोपियन ट्यूब बंद आहेत किंवा काढल्या आहेत. 
- ‘पीसीओएस’सारख्या आजारामुळे वंध्यत्व आहे आणि गर्भधारणा होत नाहीये. 
- बीज अंडकोषात कमी अंडी असणे किंवा लो ओव्हेरियन रिझर्व्ह. 
- स्त्रीचे वाढलेले वय. 
- प्रीमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर (कमी वयात पाळी जाणे). अंड्याची निर्मिती होऊ शकत नसल्यास डोनर घेऊनही ‘आयव्हीएफ’ करता येते. 
- अतिशय तीव्र endometriosis 

पुरुषांमधील वंध्यत्व 
स्पर्म काउंट कमी असणे, स्पर्मची मोटीलिटी कमी असणे किंवा कधी कधी सिमेनमध्ये स्पर्म नसणे. अशा वेळी ते थेट टेस्टीकलमधून काढता येतात. त्यांना इक्सी उपचाराचा फायदा होतो. कारण त्यात अंड्याचे फलन करण्यासाठी केवळ एक निरोगी स्पर्म लागतो. 

‘आयव्हीएफ’मध्ये नेमके काय होते? 
‘आयव्हीएफ’ सुरू करण्याआधी डॉक्टर सक्सेस रेटचा तपास करण्यासाठी काही चाचण्या करायला सांगतात. तुम्हाला फर्टिलिटीची औषधे दिली जातात. यामुळे अंडाशयाला चालना मिळून भरपूर अंड्यांची निर्मिती होते. अंडी जास्त म्हणजे गर्भधारणेची शक्यता जास्त. डॉक्टर तुमच्या हार्मोन्सच्या पातळीवर आणि अंडाशयावर लक्ष ठेवतात आणि अंड्यांची निर्मिती आणि वाढ होत असल्याची खात्री करून घेतात. अंडी तयार झाल्यावर थोडी भूल देऊन एका बारीक सुईने ती डॉक्टर काढून घेतात आणि त्यातली चांगली अंडी वापरून प्रयोगशाळेत त्यांचे स्पर्मबरोबर फलन केले जाते. या प्रकारे तयार झालेले भृण काही दिवस परिपक्व होण्यासाठी ठेवला जातो आणि योग्य वेळी गर्भ रुजण्यासाठी गर्भाशयात सोडतात. यानंतर गर्भारपणाची शक्यता वाढवण्यासाठी तुम्हाला प्रोजेस्टेरॉन दिले जाते. १४ दिवसानंतर प्रेग्नन्सीचा रिपोर्ट केला जातो. 

‘आयव्हीएफ’चा प्रवास 
‘आयव्हीएफ’चा सक्सेस रेट अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. त्यातली मुख्य गोष्ट स्त्रीचे वय आणि ओव्हेरियन रिझर्व्ह आणि वंध्यत्वाचा काळ! त्यामुळेच ‘आयव्हीएफ’ वेळेत करणे योग्य. याचबरोबर चांगली ‘आयव्हीएफ’ लॅब असणेही महत्त्वाचे. उपचार घेताना डॉक्टरांशी नीट चर्चा केल्यावर तुमच्यासाठीचा सर्वोत्तम पर्याय डॉक्टर सुचवतील. चांगल्या उपचारांबरोबरच ताण येणार नाही व चित्त प्रसन्न राहील अशा सोयी क्लिनिकमध्ये असाव्यात, जसे आहाराची काळजी, योग, ध्यानधारणा यांची सुविधा. योग्य वेळी, योग्य कारणासाठी आणि योग्य प्रकारे हा पर्याय निवडून तुम्ही बाळाचे सुख अनुभवू शकता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women health article about IVF

Tags
टॉपिकस
Topic Tags: