esakal | Women's day 2021: 'बाईक रायडिंग ही काही फक्त पुरुषांचीच मक्तेदारी नाही'

बोलून बातमी शोधा

Bike riding}

आज बाईक रायडिंगच्या विविध मोहिमांमध्ये आम्ही दोघी एकत्र भाग घेत आहोत. सांगतेय  तळेगाव येथील २३ वर्षीय गार्गी बीचे.... 

Women's day 2021: 'बाईक रायडिंग ही काही फक्त पुरुषांचीच मक्तेदारी नाही'
sakal_logo
By
अक्षता पवार

पुणे : लहानपणापासूनच आईला बाईक चालविताना पाहत होते. त्यात नविन काय? सगळ्याच महिला हे करत असतील... हा गैरसमज मात्र वयाच्या १७ व्या वर्षी दूर झाला. आज देखील समाजात पुरुषांप्रमाणे बाईक चालविणाऱ्या महिलांची संख्या कमीच आहे. त्यात आईमुळे मला सुद्धा हा छंद जडला. आईने मला देखील बाईक चालवायला शिकविले. आज बाईक रायडिंगच्या विविध मोहिमांमध्ये आम्ही दोघी एकत्र भाग घेत आहोत. असं सांगत होती तळेगाव येथील २३ वर्षीय गार्गी बीचे.... 

गार्गीची आई मंजिरी या गेल्या २६ वर्षांपासून बाईक चालवत आहेत. हीच प्रेरणा घेत गार्गीने देखील आईच्या पावलावर पाऊल टाकत बाईक रायडिंगची सुरवात केली. गार्गीने नुकतेच पदवीचे प्रशिक्षण पूर्ण केले असून तिची आई व्यावसायिका आहे. मागील सहा वर्षांपासून माय-लेकीच्या या जोडीने पुणे ते गोवा आणि राज्यातील विविध भागात तब्बल दहा हजाराहून अधिक किलोमीटरचा प्रवास केला आहे. 

हेही वाचा - Fashion:प्रत्येक हंगामात स्वतःला आकर्षक ठेवण्यासाठी चार महत्वाच्या गोष्टी

गार्गी म्हणाली, ‘‘लहान असताना आई सोबत बाईकवरून जात होते तेव्हा सगळ्यांच्या नजरा आईकडे असायच्या. पुरुष प्रधान समाजात महिलेने बाईक चालविणे म्हणजे काही वेगळं करणे. हेच पाहत मी सुद्धा मोठी झाले आणि इतर महिला मुलींना देखील प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने आपण सुद्धा आई सारखंच बाईक चालवू हा ध्यास केला. गेल्या वर्षी कोरोनामुळे एकही मोहीम करता आली नाही. मात्र आता लवकरच लेह-लडाख, हिमाचल प्रदेश, राजस्थान अशा विविध ठिकाणी बाईक रायडिंगची मोहीम पार पाडणार आहोत.’’ 

दरवर्षी रॉयल एनफिल्ड रायडर मेनिआ या बाईक रायडिंग मोहिमेत देशभरातून बाईक रायडर भाग घेतात. पुणे ते गोवा आयोजित या रायडर मेनिआत २०१९ मध्ये आम्ही दोघींनीही भाग घेतला. यामध्ये पुरुषांच्या तुलनेत केवळ तीन टक्के महिला बाईक रायडरनी भाग घेतला होता. तेव्हा समजले की बाईक रायडिंगच्या क्षेत्रात महिलांची संख्या कमीच आहे. यासाठी महिला व मुलींना प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. असे गार्गीने सांगितले. 
हेही वाचा - 'या' चार पध्दतींचा उपयोग करून करा पॅन्टॉन कलरचा मेकअपमध्ये समावेश
‘‘बाईक चालविण्यासाठी तुम्ही शारिरीकरित्या कमजोर असता, केवळ पुरुषच बाईक चालवू शकतात अशा प्रकारची शिकवण महिला व मुलींना लहानपणापासून दिली जाते. त्यामुळे इच्छा असूनही आपण बाईक चालवू शकणार नाही किंवा त्यावरून पडू अशी भीती अनेक महिलांच्या मनात असते. ही भीती मनातून काढण्याची गरज आहे.’’ 
- मंजिरी बीचे