esakal | खाद्यभ्रमंती : लस्सीसिंग नगरवाला...
sakal

बोलून बातमी शोधा

Lassi

खाद्यभ्रमंती : लस्सीसिंग नगरवाला...

sakal_logo
By
आशिष चांदोरकर

मध्यंतरी, म्हणजे हे कोरोनाचं संकट सुरू होण्यापूर्वी काही कामानिमित्त नगरला जाणं झालं. वाटेत अनेक ठिकाणी चांगली मिसळ मिळणारे जॉइंट्स मागं टाकत आम्ही नगरमध्ये पोहोचलो. ई टीव्हीपासून माझा चांगला मित्र असलेल्या अभय जिन्सीवालेच्या काकांचा नवी पेठेत मिसळीचा जॉइंट आहे, ‘गुंजन मिसळ’. तिथं मस्त स्वादिष्ट मिसळ चापली. अभयकडं मिसळ खाण्याची इच्छा जवळपास १५ वर्षांनंतर पू्र्ण झाली. अभयनं जसं वर्णन करायचा, अगदी तशीच मिसळ होती.

मिसळचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्हाला कामासाठी जायचं होतं, पण तिथं निघण्यापूर्वी अभयनं आम्हाला नेता सुभाष चौकामध्ये असलेल्या लस्सीवाल्याकडं नेलं. ‘नगरमध्ये ही मंडळी सर्वोत्तम लस्सी देतात. इथं आलोच आहोत तर आता लस्सी पिऊनच जाऊ,’ असं म्हणत अभयनं आम्हाला नेलं. तेव्हा ‘द्वारकासिंग’कडं पहिल्यांदा लस्सी प्यायली आणि प्रेमातच पडलो. आइस्क्रीम घातलेली फ्लेव्हर्ड लस्सी. एकदम भन्नाट.

मी कॉलेजमध्ये शिकत असताना एस. पी. कॉलेजजवळ टिळक रोडवर असलेल्या ‘पूना कोल्ड्रिंक हाऊस’मध्ये पहिल्यांदा ''फ्लेव्हर्ड लस्सी'' प्यायलो होतो. ‘मँगो लस्सी’. पण आइस्क्रीम घातलेली फ्लेव्हर्ड लस्सी हा प्रयोग एकदम हटके आणि भारी वाटला. त्यातही फक्त आंबा नाही, तर इतरही अनेक प्रकारच्या ‘फ्लेव्हर्स’चं वैविध्य, हे एकदम बढिया...

फ्लेव्हर्स लस्सी विथ आइस्क्रीम

दुर्गासिंग राजपूत यांनी नगरमध्ये सुमारे ६३ वर्षांपूर्वी एम. जी. रोडवर ‘दुर्गासिंग लस्सीवाला’ची सुरुवात केली. तेव्हा एका गाडीवर लस्सी विकली जात असे, अशी माहिती दुर्गासिंग यांचा मुलगा दीपक देतो. गाडी सुरू झाल्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षीपासूनच ‘फ्लेव्हर्ड लस्सी विथ आइस्क्रीम या अनोख्या प्रयोगाला सुरुवात झाली, असंही तो सांगतो. लस्सी अनेक ठिकाणी मिळायची किंवा आजही मिळते. मात्र, ‘फ्लेव्हर्ड लस्सी विथ आइस्क्रीम द्यायला लागल्यानंतर ''दुर्गासिंग''चं नाव झालं नि व्यवसायाची भरभराट व्हायला सुरुवात झाली. पहिल्या शाखेनंतर साधारण २३ वर्षांनंतर म्हणजे आजपासून चाळीस वर्षांपूर्वी ‘दुर्गासिंग’नं कापड बाजार, मोची गल्ली इथं शाखा सुरू केली. ही ‘दुर्गासिंग’ची सध्या अस्तित्वात असलेल्या शाखांपैकी सर्वांत जुनी शाखा.

‘दुर्गासिंग’मध्ये लस्सीची आंबा, पिस्ता, गुलकंद, अंजीर, बदाम, पायनापल आणि साधी मिठी अशा व्हरायटी मिळतात. लस्सीमध्ये कोणताही इसेन्स घातला जात नाही. ही मंडळी ताज्या फळांपासून पल्प तयार करतात आणि तो लस्सीमध्ये वापरतात. त्यामुळं लस्सीला एक वेगळा ताजेपणा आणि स्वाद मिळतो. नगरमध्ये प्लेन लस्सीत मिठी लस्सीच अधिक खपते. त्यामुळं क्वचित ऑर्डर असेल, तरच खट्टी लस्सी तयार करतो, अशी माहिती दीपक देतो. लस्सी, आइस्क्रीम आणि ड्रायफ्रूट्स या ‘कॉम्बिनेशन’चा आस्वाद घेण्यासाठी फक्त नगरकरच नाही, तर नगरला खरेदीसाठी आलेले बाहेरचे लोकही आवर्जून ‘दुर्गासिंग’ला भेट देतात.

दुर्गासिंग यांचे मुलगे आणि पुतणे यांनी नंतरच्या काळात स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. मुलांनी ‘दुर्गासिंग’ नावानंच व्यवसाय पुढं चालू ठेवला, तर पुतण्यांनी ‘द्वारकासिंग’ नावानं व्यवसायाला प्रारंभ केला. ‘द्वारकासिंग’ साधारण २२-२५ वर्ष जुनं असावं. सध्या नगरमध्ये ‘दुर्गासिंग’च्या दोन आणि ‘द्वारकासिंग’च्या दोन अशा एकूण चार शाखा आहेत. लवकरच नगर-पुणे रोडवर ‘दुर्गासिंग’ची आणखी एक शाखा सुरू होतेय.

कधी नगरला जाणं झालं, तर नगरची शान असलेल्या ‘दुर्गासिंग’ आणि ‘द्वारकासिंग’ला भेट द्यायला नि अनेक वर्षांपूर्वी सुरू केलेल्या भन्नाट प्रयोगाचा आस्वाद घ्यायला विसरू नका...

loading image