टेक्नोहंट : नव्या सायबर हल्ल्यांपासून वाचण्यासाठी... 

टेक्नोहंट : नव्या सायबर हल्ल्यांपासून वाचण्यासाठी... 

कोरोनामुळे उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसला. त्याचे पडसाद भारताबरोबरच संपूर्ण जगावर उमटले. कोरोनामुळे बहुतांश उद्योगधंदे, व्यवसाय व दैनंदिन व्यवहार ऑनलाइन झाले आहेत. त्यामुळे सहजगत्या व्यवहार होऊ लागले, पण सोबतच सायबर हल्लेही वाढले. मध्यंतरी मालवेअरचा हल्ला करून मोठ्या प्रमाणात संवेदनशील माहिती चोरीला गेल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यामुळे हा धोका लक्षात घेता नव्या वर्षात सायबर हल्ल्यांसारख्या आव्हानांना सामोरे जायचे असेल तर त्याबाबत खबरदारी घेणे क्रमप्राप्त आहे. दरम्यान, येत्या वर्षात डबल एक्स्टॉर्शन, क्रिप्टो मायनिंग, एथिकल हॅकिंग यासारखे प्रकार वाढतील, असा अंदाज ‘क्विक हील’च्या अहवालात मांडला आहे. 

1. डबल एक्स्टॉर्शन : मध्यंतरीच्या काळात सायबर हल्लेखोर वेगवेगळ्या प्रकारच्या हॅकिंग पद्धतींनी संगणक प्रणाली एनक्रिप्ट करत आणि ते डिक्रिप्ट करण्यासाठी खंडणीची मागणी करत होते. अलीकडे रॅनसमवेअरद्वारे संगणकीय माहितीसोबतच वैयक्तिक व गोपनीय माहितीही हॅक केली जाते. त्यावरून खंडणी न दिल्यास गोपनीय माहिती व्हायरल करण्याची धमकी दिली जाते. एखाद्या कंपनीची गोपनीय माहिती उघड झाल्यास त्याचा संबंधित कंपनीच्या प्रतिष्ठेवर मोठा परिणाम होतो. हे संकट टाळायचे असल्यास तुम्हाला खंडणी द्यावीच लागते. अशा प्रकारच्या दुहेरी संकटाला रॅनसमहॅक अथवा डबल एक्स्टॉर्शन असे म्हणतात. मेझ, डॉपल पेमर, युर्क, लॉकबीट, नेटवॉकर, माऊंटलॉकर, नेटफिल्म हे ज्ञात रॅनसमहॅकर्स असून, त्यामुळे येत्या वर्षातही त्यांच्यापासून धोका असण्याची शक्यता आहे. 

2. क्रिप्टो मायनिंग : मध्यंतरीच्या काळात क्रिप्टोकरन्सीची बरीच चर्चा सुरू होती. गेल्या वर्षात बीटकॉइन्स आणि मोनेरो यांसारख्या क्रिप्टोकरन्सीची किंमत तब्बल तिपटीने वाढली. क्रिप्टोकरंन्सीच्या वाढत्या किमतीमुळे हॅकर्स अधिकाधिक क्रिप्टो मायनर्स तयार करून त्याद्वारे खंडणी वसूल करतात. रुपयांच्या तुलनेत क्रिप्टोकरन्सीची किंमत अधिक असल्याने सर्वसामान्य लोक त्याकडे सहजपणे आकर्षित होतात. त्यामुळे याबाबतीत खबरदारी बाळगलेली कधीही उत्तमच. 

3. डीप फेक्स : डीप फेक्स म्हणजे तंत्रज्ञानाच्या मदतीने एखाद्या व्यक्तीची बनावट ध्वनिफीत अथवा चित्रफीत तयार करणे होय. अशाप्रकारे बनावट चित्रफितींचा वापर खोट्या बातम्या किंवा सायबर गुन्हेगारी करण्यासाठी केला जातो. उदा. एखाद्या कंपनीचा बॉस आपण अडचणीत असल्याचे सांगत आपल्या कर्मचाऱ्यांना मदत म्हणून ठरावीक रक्कम पाठवा, अशा आशयाची ध्वनिफीत किंवा चित्रफीत पाठवतो. प्रत्यक्षात हे सारेकाही बनावट असते. आतापर्यंत अशाप्रकारच्या घटना फार दुर्मीळ होत्या, मात्र आता त्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. 

4. फिशिंग अटॅक्स : एखाद्या बँकेचा प्रतिनिधी किंवा अधिकृत कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगत तुमच्याकडून वैयक्तिक माहिती जाणून घेत सायबर गुन्हेगारी अथवा चोरी करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे फिशिंग अटॅक्स होय. हल्लीच्या काळात अनेकांना अशाप्रकारचे अनुभव आले असतीलच. मात्र, आता त्याहूनही आधुनिक पद्धतीने आणि तुम्हाला कळणारही नाही अशाप्रकारे तुमची वैयक्तिक माहिती तुमच्याकडून काढून घेतली जाईल. पुढील काळात अशा घटना वाढण्याची शक्यता अधिक आहे. 

5. मोबाईल बँकिंगमधील हल्ले : मोबाईल बँकिंग ट्रोजनचा सोर्सकोड तीन ते चार महिन्यांपूर्वी समोर आला होता. त्याद्वारे अनेक लोकांच्या मोबाईल बँकिंग ॲप्स बाधित होऊन संबंधितांची बँकिंगविषयक, वैयक्तिक तसेच गोपनीय माहिती मोठ्या प्रमाणात चोरली गेली होती. बहुतांश वेळा ही चोरलेली माहिती डार्क नेटवर विक्रीसाठी उपलब्ध केली जाते. त्या पार्श्वभूमीवर अशाप्रकारच्या मालवेअरपासून सावध राहण्याची गरज आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com