दिल तो बच्चा है! : स्वत:ला फसवणारा गाववाला!

Two-Wheeler
Two-Wheeler

रात्री उशिरा एसटीतून उतरलो आणि घराकडं निघालो. शहराच्या जरा आडबाजूला राहत असल्यानं कुणी रिक्षावाला घरापर्यंत यायला तयार नव्हता. साडेतीन किलोमीटरचं अंतर पायीच कापत जाण्याचं ठरवलं. अंधारातून निघालो होतो. इतक्‍यात एक टू-व्हीलर येताना दिसली. हात केला. बिचारा थांबला. म्हणाला कुठं जायचंय? मी म्हणालो, ‘पुढच्या चौकात सोडता का?’ ‘चालेल बसा,’ असं म्हणत त्यानं गिअर टाकला. गारठा पडला होता. त्यामुळं मी बुचगारून बसलो. बिचाऱ्यानं लिफ्ट दिली आहे म्हटल्यावर काहीतरी बोललं पाहिजे असा विचार करत म्हणालो, ‘तुम्ही गावाकडचे दिसताय?’ 

‘होय बरोबर ओळखलं. सोलापूर जिल्ह्यातलाहे मी. हितं मगरपट्ट्यात कामाला असतो.’ 

‘चांगलंय. मदत करण्याची सवय गावाकडच्या लोकांच्या रक्तातच असती. इकडं शहरातली लोकं कसली मदत करत्यात तेव्हा?’ माझ्या या वाक्‍यावर मान हालवत तो म्हणाला, ‘तुम्ही कुठले?’ मी म्हणालो, ‘मी दौंडचाहे. पण हितं भाड्यानं राहतो.’ तसा तिरपी मान करत तो म्हणाला, ‘वाह, म्हणजे तुम्ही पण बाहेरगावचेच म्हणायचे की.’ मी होकार दिला तसा तो बोलू लागला, ‘आपल्यासारख्या गाववाल्यामुळं तरी माणूसकी टिकूनहे हो. नायतर शहरी लोकांना कसली आलीये माणूसकी?’ 

आम्ही दोघंही बाहेरगावचे आहोत आणि शहरी लोकांना नावं ठेवण्यासाठी तोही आग्रही असल्याचं लक्षात येताच मीही तोंडसुख घ्यायला सुरुवात केली. ‘आवं हितं शहरात कोण कुणाला विचारत नाय, की कसली मदत करत नाय. सगळे आपले पैशांच्या मागं लागलेले.’ तसा तोही गडी पेटला. ‘आवं खरंहे. आपल्या गावाकडं बघा एखादा माणूस मेला, तर शून्य मिनिटात अख्ख्या गावाला खबर लागती. हितं शहरात शेजारच्या फ्लॅटमधला माणूस मेला तरी तपास नसतोय. असले तर माणूसघाणे.’ तशी जोड देत मी म्हणालो, ‘अहो, शेजारच्या फ्लॅटमधी कोण राहतं हे हिथल्या लोकांना माहिती नसतंय. आपल्यासारखी लोकं शहरात यायला लागल्यात म्हणून तरी हितली माणूसकी शाबूदहे.’ माझं वाक्‍य संपलं तसा चौक आला. तो म्हणाला, ‘तुम्हाला कुठं जायचंय?’ मी म्हणालो, ‘त्या मेडिकलपासून डावीकडं राहतो मी.’ तसा तो हसत म्हणाला, ‘अरे वा, चला तिकडंच सोडतो. मलाही तिकडंच जायचंय.’ मेडिकलपासून गाडी वळाली तसे दोन रस्ते आले. मी उजव्या रस्त्याकडं हात केला तर तो म्हणाला, ‘मलाही तिकडंच जायचंय.’ समोरची सहा मजली इमारत दाखवत त्याला मी म्हणालो, होका मी ह्या इमारतीत राहतो.’ तसा तो म्हणाला, ‘काय चेष्टा करता राव? मीही याच बिल्डिंगमधी राहतो. तुम्ही कुठल्या मजल्यावर राहता?’ मी म्हणालो, ‘तिसऱ्या मजल्यावर!’ तसा तो पार्किंगमध्ये गाडी लावत म्हणाला, ‘क्‍या बात है, मीही तिसऱ्याच मजल्यावर राहतो.’ 

आता मात्र आम्हाला एकमेकांच्या डोळ्यात पाहायला लाज वाटत होती. कारण आम्ही ज्या शहरी लोकांना शिव्या देत होतो, तो शहरीपणा आम्ही एकमेकांमध्ये अनुभवत होतो. तसं न राहवून मी त्याला विचारलं. ‘कधीपासून राहताय तुम्ही इथं?’ गळ्यातली बॅग नीट करत म्हणाला, ‘दोन-अडीच वर्षे झालेत आणि तुम्ही?’ मी त्याच्यापासून नजर चोरत म्हणालो, ‘तीन वर्षं.’ 

मला माझी लाज वाटू लागली होती, तशीच त्यालाही वाटू लागली होती बहुतेक. ‘अच्छा चलो गुड नाइट. उद्या मॉर्निंग आहे मला,’ असं म्हणत तो जिना चढू लागला. त्यापाठोपाठ मीही मंद पावलानं जिना चढू लागलो. प्रत्येक पायरीवरचे शहरी काटे खदाखदा हसत माझ्या पायात टोचत होते... 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com