दिल तो बच्चा है! : खोटा होतो, म्हणून चांगला होतो

Nitin-Thorat
Nitin-Thorat

भर चौकात एक दारुडा सकाळ सकाळ शिव्या देत होता. दिवसाची सुरुवातच शिव्या ऐकून झाल्यामुळं मी थोडा वैगातलो. पण, त्याच्याकडं दुर्लक्ष करत स्वीटहोममध्ये दूध आणायला गेलो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘काय राव सकाळ खराब केली ह्या माणसानं. भल्या पहाटंच प्यायला बसला होता कायनू?’ माझ्या या प्रश्‍नावर स्वीटहोमवाला काहीच बोलला नाही. त्यानं दूधं दिलं आणि गुपचूप पैसे घेतले. आपल्या शब्दाला किंमतच नाही, असा विचार करत मी मनातल्या मनात त्या स्वीट होमवाल्याला शिव्या दिल्या आणि तिथून निघालो. अंडी घेण्यासाठी चिकन सेंटरमध्ये गेलो. तिथंही दारुड्याच्या शिव्या कानावर पडतच होत्या. त्या शिव्या ऐकत मी स्मित केलं. तसा तो चिकनवालाही हसला. म्हणाला, ‘सुब्ब सुब्ब देशी लगाई सालेने. सुब्ब पाच बजेसेस गाली दे रहा. पुरी निंद खराब की हरामीने.’ वाक्‍य संपल्यावर त्यानंही हळू आवाजात पेताडाच्या नावानी चार शिव्या ऐकवल्या. तसं मीही हसत म्हणालो, ‘भल्या पहाटं ह्यांना दारुच कशी मिळती काय माहिती? भल्या पहाटं मेडिकल उघडी नसत्यात.

इर्मजन्सी लागली तर सरकारी दवाखान्यातले डॉक्‍टर जाग्याव नसत्यात. कुठला सरकारी कर्मचारी भल्या पहाटं मदतीला येणार नाय. पण, दारु मात्र बरोब्बर मिळणार. वाह रे वाह आपली सिस्टीम?’ असं म्हणत मीही प्रशासनाच्या नावानं दोन शिव्या हासडल्या. इतक्‍यात एक बाई चिकन न्यायला तिथं आली. चिकनवाल्याच्या ओळखीची असावी. शेजारच्या बाईनं तिच्या अंगणात कचरा टाकला म्हणून रागावैतागानं तिही मनातली खदखद बाहेर काढू लागली. फक्त चिकनवाल्याला ऐकू येतील अशा हळू आवाजात शेजारच्या बाईच्या नावानं शिव्या देऊ लागली. मी हसतच घराकडं निघालो. 

कोवळ्या उन्हात घरासमोरच्या अंगणात एक बाप हातात काठी घेऊन बसला होता. त्याच्यासमोर त्याचा लेक वही पेन घेऊन बसलेला. बाप लेकाकडून बळजबरी अभ्यास करुन घेत असल्याचं समजलं. मला जुने दिवस आठवले. स्मित करत मी त्या लेकराकडं पाहिलं. त्याच्या वैतागलेल्या चेहऱ्यावरुनच तो मनातल्या मनात बापाला किती शिव्या देत असेल याचा अंदाज येत होता.

बळजबरी अभ्यास करायला लावल्यावर मीही घरच्यांना, गुरुजींना किती शिव्या द्यायचो हे आठवत होतं. तसाच चालत चौकात आलो. तर पुन्हा तो पेताड दिसला. त्याच्याकडं दुर्लक्ष करत घराकडं निघालो. पण, त्याच्या शिव्या ठळकपणे कानावर पडत होत्या. स्वतःच्या घराच्या दिशेकडं पाहून तो मोठमोठ्यानं म्हणत होता, ‘तुम्हाला काय वाटतं, मी दारु पेतो म्हणजे मी यडाहे ? पण, तुम्ही किती शाणेहेत मला माहितीये ना. सगळे साले आतल्या गाठीचे. मी दारु पेतो म्हणून मी वाईट, अन्‌ तुम्ही दारु पेत नाय म्हणून तुमी चांगले का? आरं जरा आरशात बघा आपापली तोंड. मग तुम्हाला कळलं, तुम्ही चांगलेहेत का वाईट ते.’ विनाकारण त्याची वाक्‍य काळजाला टोचायला लागली. तरातरा चालत मी घरात आलो आणि अंडी, दूध किचनमध्ये ठेऊन आरशासमोर थांबलो.

माझ्यात आणि दारुड्यात जास्त काहीच फरक वाटत नव्हता. मीही खूप चांगला नव्हतोच. पण, दारुडा भर चौकात शिव्या देत होता म्हणून तो वाईट होता. मी हळू आवाजात शिव्या देत होतो म्हणून मी चांगला होतो. कितीजण तरी मनातल्या मनात शिव्या देत होते म्हणून ते चांगले होते. दारुडा खरा होता म्हणून तो वाईट होता. मी खोटा होतो, म्हणून चांगला होतो. बाकी आम्ही सेमच होतो. 

पटत नसल्यास एकदा तुम्हीही आरशासमोर थांबून बघा.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com