दिल तो बच्चा है! : जगायला शिकवणारी माणसं

नितीन थोरात
Wednesday, 5 August 2020

‘तुमी पुस्तकं ल्हेता मंजी तुमी लईच हुशारे म्हणा की?’ 
‘नाय नाय मी कसला हुशार तवा? उगं आपलं लिहाय जमतं म्हणून लेतो.’ 
‘असं कसं कुणालाबी जमलं? मी हुशार असतो तर मलाबी जमलं असतंच की. पण आमी अडाणी. कनाय?’

‘तुमी पुस्तकं ल्हेता मंजी तुमी लईच हुशारे म्हणा की?’ 
‘नाय नाय मी कसला हुशार तवा? उगं आपलं लिहाय जमतं म्हणून लेतो.’ 
‘असं कसं कुणालाबी जमलं? मी हुशार असतो तर मलाबी जमलं असतंच की. पण आमी अडाणी. कनाय?’

रानातल्या झाडाखाली बसलो होतो. इतक्‍यात पाच-पन्नास मेंढ्या घेऊन एक मेंढपाळ आला आणि बोलत बसला. तुमी पोटापाण्यासाठी काय करता, असं म्हणत तो खोलात शिरला आणि मी लेखक आहे असं सांगितल्यावर त्यानं बैठक मांडली. जोडीला त्याचा दहा वर्षाचा पोरगाबी होता. कंबरेला धोतर, अंगावर सदरा, डोक्‍याला पागोटं बांधलेलं ते लहान लेकरू संशयानं माझ्याकडं बघत होतं. त्याची आई मेंढ्याच्या मागं उन्हातान्हात इकडून तिकडं पळत होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘हा आमचा म्हादबा. हाबी लय मागं लागला होता शाळा शिकायची म्हणून. पण मीच नाय टाकला. आमचं काय एक ठिकाण असतयं व्हय? दर दोन दिवसानी गावं बदलणारी माणसं आमी. कुठं शाळंची कटकट डोक्‍यामागं लावून घ्यावा?’

लेकराची कीव वाटली. म्हणालो, ‘आवं तो म्हणतोय तर टाकायचं की त्याला शाळेत. लिहाय वाचायला आलं मंजी बरं पडतं. काय सांगावं उद्या तुमचा पोरगा शिकला तर मोठा अधिकारी बनंल.’ तसा त्यानं तंबाखूचा ईडा मळला आणि जिभेखाली ठेवत म्हणाला, ‘अधिकारी बनवा आन्‌ पाटवा मंबईला. काय बोलता तुमीबी सायेब? माझ्या आत्याच्या दिराचा पोरगा झालाय की मोटा अधिकारी. मंत्रालयात असतोय. बापाच्या मौतीलाबी नव्हता आला. करुना झालाय म्हणत होता. एवढा मोटा अधिकारी झालता, तरीबी कसकाय झाला त्याला करुना?’ ‘अहो कोरोना काय तुमचं पद पाहून होत नसतोय. तो कुणालाबी होऊ शकतो. अजून त्याच्यावर औषध सापडलेलं नाय. मोठमोठे शास्त्रज्ञ शोधताहेत. आज ना उद्या सापडंल औषध.’ ‘बघा म्हंजी शिकल्या सवरल्याली माणसं करुनानी मरत्यात अन्‌ शिकल्या सवरल्याल्या माणसांना अजून त्याच्याव औषधबी सापडाना. अन तुमी म्हणताय माधबाला शिकायला पाठवा. ऐकलं का माधबा. तुला माझं म्हणणं पटत नव्हतं ना, आता तुच ऐकलं ना तुझ्या कानानी सायेब काय म्हणाले ते. म्हणून म्हणतोय शिकून कायबी उपेग नसतोय.’

मला काय बोलावं तेच समजाना. तसा तो पुढं बोलू लागला, ‘साहेब ही रान तुमचंहे का?’ 
‘नाय नाय जोडीदाराचंहे.’ 
‘तुम्हाला नाय का रान?’ 
‘होतं आमालाबी. पण, पैशाची नड होती म्हणून विकाय लागलं.’ 
तशी त्यानं माधबाकडं मान वळवली आणि म्हणाला, ‘ऐकलं का माधबा. स्वत:चं रान सांभाळता येत नसलं तर काय उपेगाचंहे तुमचं शिक्षण. शेवटी दुसऱ्याच्या रानात बसूनच पुस्तक ल्हेत बसल्यात का नाय हे सायेब? म्हणून म्हणतो तु आपली बकरी सांभाळ. पैज लावून सांगतो ह्या सायबांच्या खिशात आत्ता पाचशेच्या वर रुपये नसणार. पण, तु आत्ता दहा लाखाची प्रॉपर्टी घेऊन हिंडतोय. दहा लाखाची! कुठं त्या पुस्तकांच्या नादी लागतो. चालती फिरती शाळा तुझ्याबरंहे. कनाय?’ 

बापाच्या या वाक्‍यावर पोराच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली. मेंढपाळ उठून उभा राहिला. त्यानं मला नमस्कार केला. मीही नमस्कार केला. बाप लेक चालत निघाले. बाप काहीतरी सांगत होता. लेक त्याला प्रश्‍न विचारत होता. मी मात्र दगडासारखा बसून राहिलो. आपण शाळेत जाऊन चूक केली की, लेकाला शाळेत पाठवून चूक करतोय याचा विचार डोक्‍यात फिरत होता. ते बापलेक मात्र आनंदानं एकमेकांच्या मागं पळत होते. खऱ्या अर्थानं आयुष्य जगत होते. जगायचं कसं हे शिकत होते.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article nitin thorat on A man who teaches us to live