
SakalMedia
@SakalMediaNews
सोशल मीडियावर ट्रेंड येतात आणि जातात. काही लक्षात राहतात आणि अनेक विस्मरणात जातात. तुम्हाला वाटत असेल, की तुमच्या ट्रेंडवर चर्चा व्हायलाच हवी, तर जरूर कळवा #TweetToSakal हा हॅशटॅग वापरून.
सोशल मीडियावर आज मीम्सचा जमाना आहे. मीम्स म्हणजे विनोद, कोपरखळी, गंमत वगैरे सारं काही. छोटासा व्हिडिओ, जीएआयएफ किंवा एखादा फोटोही मीम्ससाठी पुरे. आज एक एप्रिल आहे. म्हणजे मीम्सचा धुमाकूळ. कुठल्या विषयावर काय मीम्स तयार होतील, सांगायला नको.
बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
आज एक काळजी घ्यायला हवी. कोरोना विषाणूच्या संसर्गानं जगावर आपत्ती कोसळलीय. रोज शेकड्यांनी मानवी बळी जात असल्याच्या बातम्या धडाधड समोर येताहेत. जितके मानवी बळी प्रत्यक्ष जात आहेत, त्याहून अधिक मानसिक बळी मीम्सच्या नावाखाली फेक न्यूज प्रसारित करून जाताहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘एप्रिल फूल’ करून कुणाचा मानसिक बळी आपण घ्यायला नको. ''एप्रिल फुल नको, फॅक्टफुल हवा'' हा निर्धार एक एप्रिलच्या निमित्तानं करूया.
ट्विटरवर किंवा कुठल्याही सोशल मीडियावर जी माहिती संशयास्पद वाटतेय, ती तपासा. सत्य, वस्तुनिष्ठ माहिती देणाऱ्या यंत्रणांकडून खात्री करून घ्या. माहिती असत्य असल्यास ती तिथंच रोखा. मीम्सच्या बुरख्याआड फेक न्यूज प्रसारित करून समाजात अस्वस्थता पसरवू पाहणाऱ्या घटकांना पायबंद घालण्याचा हा एकच मार्ग आहे.
याच सदरात १८ मार्चला अफवा कशा रोखाल, याबद्दल लिहिलं होतं. गेल्या दोन आठवड्यांनी अफवांचे परिणाम आपल्यासमोर आलेत. आणखी परिणामांना सामोरं जायचं नसल्यास फॉरवर्ड, शेअर किंवा रिट्विटचं बटण फक्त फॅक्टसाठी क्लिक झालं पाहिजे.