esakal | ऑन स्क्रीन : कोई जाने ना : थ्रिलरच्या नावाखाली थिल्लर मसाला...
sakal

बोलून बातमी शोधा

Koi Jaane Na

ऑन स्क्रीन : कोई जाने ना : थ्रिलरच्या नावाखाली थिल्लर मसाला...

sakal_logo
By
महेश बर्दापूरकर

लॉकडाउनच्या काळात चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत, मात्र हे चित्रपट नक्की पूर्ण करून प्रदर्शित केले गेले आहेत का, अशी शंका येण्यासारखी परिस्थिती आहे. ‘कोई जाने ना’ हा लेखक दिग्दर्शक अमिन हाजी यांचा ‘ॲमेझॉन प्राईम’वर चित्रपट याच प्रकारात मोडतो. एक लेखक आणि त्याला भर रस्त्यात भेटलेली मुलगी व त्यानंतर सुरू झाली खुनांची मालिका असा प्लॉट असलेल्या या चित्रपटातील रहस्य अत्यंत हास्यास्पद आहे. कथा, अभिनय, संगीत, छायाचित्रण या सर्वच आघाड्यांवर चित्रपट निराशा करतो व थ्रिलरच्या नावाखाली थिल्लर चित्रपट पाहिल्याचं दुःख पदरी पडतं.

कबीर (कुणाल कपूर) कादंबरी लेखक आहे आणि त्याच्या कथेत उल्लेख झाल्याप्रमाणं काही घटना घडत असल्यानं पोलिसांचा त्याच्यावर संशय आहे. त्याचा पत्नीबरोबर घटस्फोट झाला आहे आणि मालमत्तेच्या वादावरून दोघांत संघर्ष सुरू आहे. आगामी कांदबरीचे पैसे घेऊन ती न लिहिल्यानं प्रकाशक त्याच्या मागं हात धुवून लागला आहे. त्यातच सुहाना (अमायरा दस्तूर) ही कोणताही आगापीछा नसलेली मुलगी त्याला रस्त्यात भेटते आणि ‘मुझे अपने घर ले चलो,’ अशी विनवणी करते. कबीर तिला घरी घेऊन येतो आणि ती एका हॉटलेमध्ये रिसेप्शनिस्टची नोकरीही करू लागते. आता कबीरच्या कादंबरीत घडणाऱ्या खुनाच्या घटनांचे संदर्भ बदलून ते अधिक तीव्र होतात व या दोघांवर पोलिसांचा संशय अधिक बळावत जातो. महिला पोलिस अधिकाऱ्याला (अश्विनी काळसेकर) प्रत्येक घटनेच्या वेळी या दोघांवरच संशय येत राहतो व शेवटी या सर्व हत्या आणि कादंबरीतील लेखनाचा काय संबंध आहे, याचा उलगडा होतो.

कथेमध्ये लेखक, दिग्दर्शकानं अनेक प्रश्न अनुत्तरीत ठेवल्यानं प्रेक्षकांचा गोंधळ उडतो व हे प्रत्येकच प्रसंगाच्या बाबतीत होत राहतं. कोणतीही माहिती नसलेल्या मुलीला कबीर साथ का देतो, स्वतःबद्दलची कोणतीही कागदपत्रं नसल्याचं सांगणाऱ्या मुलीला नोकरी कशी मिळते, या दोघांना ब्लॅकमेल करणाऱ्यांचा नक्की उद्देश काय असतो, पोलिस अधिकारी प्रत्येक खुनाच्या वेळी या दोघांना त्या ठिकाणी पाहूनही ‘कल थानेमें आके स्टेटमेंट दे जाना,’ असंच का सांगत राहते असे शेकडो प्रश्न प्रेक्षकांना पडतात. पाचगणी-महाबळेश्वर भागातील चित्रण असून, ते खूपच भकास वाटते. शेवटी घटनांचा होणारा खुलासा थोडासा मनोरंजक असला, तरी आधीच्या दोन तासांच्या त्रासावर तो उतारा ठरत नाही.

कुणाल कपूरचं व्यक्तिमत्त्व छान आहे, मात्र चित्रपटात अनेकदा त्याचा गेटअप बदलण्याचं कारण कळत नाही. तो अभिनयाचे फारसे कष्ट न घेता वावरत राहतो. अमायरा दस्तूरला मोठी भूमिका मिळाली आहे, मात्र ती प्रभाव पाडू शकलेली नाही. इतर कलाकारांना फारशी संधी नाही.

loading image