आयवं, तुमी पुण्याचं तर नाय ना?

नितीन थोरात
बुधवार, 18 मार्च 2020

दोष पुण्याच्या लोकांचाही नाही. दोष खेड्यापाड्यात पसरलेल्या अफवांचा आणि त्या पसरवणाऱ्या तुमच्या आमच्यासारख्या लोकांचा आहे, अर्थात हे आपण मान्य केले तर.

मांढरदेवीला निघालेलो. भोरमध्ये चहा प्यायला एका टपरीवर थांबलो. ‘रयवार असूनबी गर्दी नाय हो माऊशी?’ असं म्हणत चहाचा कप घेतला तशी पदरानं कपाळ पुसत ती बाई म्हणाली, ‘व्हय ना पोरा. त्या कोरोनानी पार धंदा बसवलाय आमचा. नायतर पुसंपुनवंसारखी गर्दी असती रयवारी काळुबाईला जाणाऱ्यांची. पण आज सकाळपासून एकबी किटली संपली नाय अजून. चार दिस झाले. अख्ख्या दिवसाला फक्त तीन लिटर दूध लागतंय. आधी पंधरा लिटरबी पुरत नव्हतं.’ चहा पेत काहीतरी टाइमपास म्हणून मी ते ऐकलं आणि आजूबाजूला पाहू लागलो. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

शेजारच्या बाकावर एक फॅमिली बसलेली. नवरा- बायको आणि दोन लेकी. चौघंही मांढरदेवीला निघालेले. तेही चहा पिण्यासाठी थांबले होते. माऊशींच्या वाक्‍याला जोड देत बाकावर बसलेली बाई म्हणाली, ‘व्हय ना मावशी, आमच्याकडं तर मॉलबी बंद केल्यात आणि शाळेलाबी सुट्टी दिलीया.’ तशी ती माऊशी भुवयांचा आकडा करत म्हणाली, ‘आमच्याकडं म्हंजी? कुठून आलाय तुम्ही? आयंव, तुमी पुण्याचं तर नाय ना?’ हॉटेलवाली बाई असं म्हणाली तसे त्या नवराबायकोचे चेहरे पडले. त्यांच्या कपातला चहा अजून गरमच होता. तशी माऊशी लांब गेली आणि तिचा नवरा पुढं आला. समोर होतं त्यांच्याकडं पाहत चढ्या आवाजात म्हणाला, ‘पटापट चहा प्या आणि बाकावरच पैसे ठेऊन निघा.’ त्याच्या या वाक्‍यावर बाकावर बसलेल्या नवऱ्याचा स्वाभिमान दुखावला. त्यानं तसाच चहा ठेवला आणि उठून उभा राहात बाकावर वीस रुपये ठेवले. तशी बायकोही चहाचा कप ठेवून उठली. ‘पप्पा, तुम्ही चहा कनाय पेला?’ लेकीच्या या वाक्‍यावर दोघं नवराबायको काही न बोलता उठले आणि गाडीला किक हानून निघाले. 

मला मोठं नवल वाटलं. माऊशी वीस रुपयांकडं पाहत होती. तिचा नवराही त्या नोटांकडं पाहत होता. पण, त्या नोटा उचलायच्या कसा असा प्रश्‍न होताच. त्या नोटांना कोरोना व्हायरस चिकटला असंल तर आपल्यालाही तो रोग होईल, अशी त्यांना भीती वाटत होती. तशी नवऱ्यानं शक्कल लढवली आणि हातात प्लॅस्टिकची पिशवी घालून त्या नोटा उचलल्या आणि उन्हात ठेवल्या. 

‘तुम्ही पुण्याच्या सगळ्या लोकांसोबत असंच वागता का,’ माझ्या या वाक्‍यावर त्या नवऱ्यानं आपल्या बायकोकडं पाहिलं. तसं त्या माऊशीलाही लाजल्यासारखं झालं. तिनं मान खाली घातली. तसा धीर एकवटत नवरा बोलू लागला, ‘आमची लेक पुण्याला असती. नातीला दहा दिस झाले सर्दी खोकला झालाय. तिला भेटाय जावा म्हणलं, तर लेक म्हणती पुण्यात येऊ नका. हिकडं कोरोना आलाय. जीव तुटतो नातीला भेटाय. पण जाता येत नाय. म्हणून मग पुण्याच्या लोकांवर असा राग निघतो...’ असं म्हणत त्यानं उकळत पाणी लांबूनच बाकावरच्या चहाच्या कपांवर ओतलं आणि कामाला लागला. 
दोष त्याचा नव्हता. दोष पुण्याच्या लोकांचाही नाही. दोष खेड्यापाड्यात पसरलेल्या अफवांचा आणि त्या पसरवणाऱ्या तुमच्या आमच्यासारख्या लोकांचा आहे, अर्थात हे आपण मान्य केले तर.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nitin thorat article Coronavirus rumors spread in the village