दिल तो बच्चा है :  मरणाचं मार्केटिंग शिकलेला पोरगा 

नितीन थोरात 
बुधवार, 24 जून 2020

पोरगा माझ्याकडं पाहून गुपचूप गालातल्या गालात हसत होता. वयाच्या बाराव्या वर्षीच मरणाचं मार्केटिंग शिकल्याचा तो आनंद होता. आजच्या दुनियेत जगण्याचा आणि फसव्या दुनियेला पद्धतशीर यड्यात काढण्याचा मार्ग त्यानं निवडला होता... 

लेकासोबत मंडईत गेलेलो. तिथं एक दहा-बारा वर्षांचा पोरगा भाजी विकायला बसलेला. त्या पोराला लेक म्हणाला, 

‘तू हितं का बसलाय? तुझ्या पप्पांना इकडं पाठवून तू घरी होमवर्क करत बसायचं ना?’ पोरानं स्मित केलं आणि म्हणाला, 

‘माझे पप्पा आभाळात गेलेत भैया.’ 

त्याच्या उत्तरावर माझ्या काळजातच चमक निघाली. लेकानं असा प्रश्‍न का विचारला, असं मनात आलं. पण, लेकाला तरी काय म्हणणार? तो तर फक्त आठ वर्षांचा. भाजीवाल्या पोराचं वाईट वाटलं. मी खाली बसून त्याच्या समोरचे कांदे-बटाटे निवडू लागलो. तोच लेकांनं पुढचा प्रश्‍न केला. ‘तुझे पप्पा आभाळात गेलेत, मग मम्मीला पाठवायचं आणि तू होमवर्क करायचा.’ लेक त्या पोराचा एवढा विचार का करतोय, तेच कळत नव्हतं. तो पोरगा होमवर्क सोडून मंडईत येऊन बसलाय आणि आपल्याला घरी बसून होमवर्क करावा लागतो, या तळमळीनं लेक प्रश्‍न विचारतोय का, अशीही शंका मनात आली. तसं त्या पोरानं पुन्हा स्मित केलं आणि म्हणाला, ‘माझे पप्पा आभाळात गेले म्हणून मग मम्मी पण मला सोडून गेली भैया. मी आज्जीकडं राहतो.’ पोराच्या या उत्तरावर मात्र आता माझ्या अंगातलं त्राणच गेलं. लेकाला जवळ ओढून गप्प बसायला सांगितलं आणि त्याच्याकडचे कांदे, बटाटे, लसूण, आलं, गवार, भेंडी सगळा भाजीपाला बार्गेनिंग न करता आहे त्या किमतीत विकत घेतला. 

दिल तो बच्चा है! : काका तुझी जात कोणती ?

पोराच्या डोळ्यात समाधान होतं. त्याच्या समाधानात आपण भर टाकली याच मलाही समाधान वाटत होतं. लेकाच्या हाताला धरलं आणि घरी घेऊन आलो. राहून राहून त्या पोराचा विचार येत होता. आईबापांवाचून कसं काय राहत असेल पोरगं? आपण आपल्या लेकराचे लाड करतो. पाहिजे ते आणून देतो. काय हवं नको ते विचारतो. त्या पोराला कोण विचारत असेल? त्याची आज्जी थकली असेल. ती त्याचे लाड करू शकत असेल का? मामा, मामी त्याला नीट सांभाळत असतील का, असे विचार डोक्‍यात येत होते. जास्त नाही, दोन दिवस डोक्‍यात विचार चालू होते. तिसऱ्या दिवशी मी त्याचं दुखणं विसरुन गेलो आणि स्वत:च्या आयुष्यातलं दुखणं कुरवाळत बसलो. परवा पाऊस पडत होता आणि लेकाला सामोसे खायची इच्छा झाली. ‘आपका हुकूम सर आँखो पर,’ असं म्हणत स्वीटहोममध्ये गेलो, तर तिथं तोच पोरगा काउंटरसमोर थांबलेला. बिचाऱ्याचं वाईट वाटलं. शेजारी एक आडदांड माणूस. हा नक्की त्या पोराचा मामा असणार असा विचार करत त्याला म्हणालो, ‘तुमचा भाचा खूपच गोड आहे हो. मंडईत नका पाठवत जाऊ त्याला. अभ्यासासाठी वेळ द्या. हुशार पोरगा आहे.’ तशा त्या माणसानं भुवया वर केल्या आणि म्हणाला, ‘भाचा नाय पोरगाहे माझा. अभ्यासाच्या नावानी शिमगा. निदान भाजीपाला इकतंय तर इकुद्या की.’ ‘आणि याची आई?’ माझ्या या प्रश्‍नावर तो आडदांड माणूस म्हणला, ‘तिकाय बाहेर गाडीपाशी उभीये. पण, तुम्हाला का एवढ्या चौकशा?’ त्या आडदांग माणसाच्या या प्रश्‍नावर ‘काय नाय, काय नाय,’ असं म्हणत मी स्वीटहोमवाल्याकडं पाहू लागलो. पोरगा माझ्याकडं पाहून गुपचूप गालातल्या गालात हसत होता. वयाच्या बाराव्या वर्षीच मरणाचं मार्केटिंग शिकल्याचा तो आनंद होता. आजच्या दुनियेत जगण्याचा आणि फसव्या दुनियेला पद्धतशीर यड्यात काढण्याचा मार्ग त्यानं निवडला होता... 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nitin thorat article social marketing

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: