esakal | झूम : आधुनिक तंत्रज्ञान, दर्जाही बदलतोय...

बोलून बातमी शोधा

Harrier
झूम : आधुनिक तंत्रज्ञान, दर्जाही बदलतोय...
sakal_logo
By
प्रणीत पवार

टाटा मोटर कंपनीने आपल्या वाहनांच्या तंत्रज्ञानात, दर्जात सुधारणा करत इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या तोडीस तोड कार गेल्या काही वर्षांत बाजारात आणल्या. त्यात २०१८च्या अखेरीस आधुनिक तंत्रज्ञानासह भारतीय बाजारात आलेल्या ‘हॅरियर’ने टाटाला वेगळीच ओळख दिली. यानंतर ‘नेक्सॉन’, ‘हेक्सा’, ‘टिआगो’ या कारही पकड ठेवून आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला टाटाची ‘सफारी’ नव्या रूपात बाजारात आली, तरीही टाटाने ‘हॅरियर’मध्ये बदल करत २०२०मध्ये पुन्हा बाजारात आणली. विशेषतः एसयूव्ही सेगमेंटमध्ये हॅरियरच्या ऑटोमेटिक व्हर्जनला ग्राहकांची अधिक पसंती मिळत आहे.

टाटा हॅरियरची डिझेल ऑटोमेटिक (XZA+) ही परफॉर्मन्सच्या अपेक्षेत उत्तीर्ण ठरते. एसयूव्ही चालवताना अपेक्षित पॉवर हॅरियरमध्ये मिळते. हॅरियरमध्ये ६ स्पीड ऑटेमेटिक गिअर बॉक्स, १७० बीएस पॉवरचे दमदार ४ सिलिंडर, २ लिटर डिझेल क्रायोटेक इंजिन (१९५६ सीसी) दिले असून, जे ३५० एनएम टॉर्क जनरेट करते. त्यामुळे ही एसयूव्ही कार चालवताना लक्झरियस फिल मिळतो. हॅरियरमध्ये सिटी, इको, स्पोर्ट्स आदी ड्रायव्हिंग मोडसह ऑफरोडसाठीही वेट आणि सॉफ्ट आदी मोड देण्यात आले आहेत. कोणत्याही व्हायब्रेशनशिवाय १२० ते १४० चा वेग सहज काही सेकंदात घेता येतो. हॅरियर पाच आसनक्षमता असलेली एसयूव्ही आहे. मोठा अँटी फिंच पॅनोरमिक सनरूफ हे हॅरियरचे खास वैशिष्ट्य. सुरक्षेच्या दृष्टीने ६ एअर बॅग, इलेक्ट्रॉनिक ट्रॅक्शन कंट्रोल, हिल होल्ड कंट्रोल, कॉर्नर स्टॅबिलिटी कंट्रोल, एबीएस+ईबीडी आदी फीचर्स देण्यात आले आहेत. हॅरियर महामार्गावर १२-१३ किलोमीटर प्रतिलिटर तर शहरी रस्त्यांवर किंवा ऑफ रोडवर १० ते ११ च्या दरम्यान मायलेज देते.

अधिक बळकट आणि स्थिर

हॅरियरची रचना ‘ओमेगाआर्क प्लॅटफॉर्म’वर करण्यात आली आहे.अधिक टिकाऊपणासाठी हॅरियरची २२ लाख किलोमीटर चाचणी घेण्यात आली, ज्यामुळे ही कार अधिक बळकट आणि ड्रायव्हिंग करताना अधिक वेगातही स्थिर वाटते. लॅण्डरोव्हरच्या डी-८ प्लॅटफॉर्मवरून हे तंत्र घेण्यात आले आहे. डिस्कव्हरी स्पोर्ट्स, जॅग्वार ई-पेस आणि रेंज रोव्हर ई-व्होक या तिन्ही कारमध्ये हे डी-८ प्लॅटफॉर्म वापरण्यात आले आहे. या तंत्राची चाचणी सर्व प्रकारच्या रस्त्यांवर घेण्यात आल्याने टाटा हॅरियर अधिक दमदार ठरते.

किंमत आणि व्हेरिएंट

१४ ते २१ लाख किमतीपासून सुरू होणाऱ्या हॅरियरमध्ये ५ व्हेरिएंट (XE, XM, XT, XZ and XZ+) दिले असून यातील तीन (XMA, XZA, XZA+) मॉडेलमध्ये ऑटोमॅटिक गिअर ट्रान्स्मिशनचा पर्यायही दिला आहे. तर नोव्हेंबर २०२० मध्ये टाटाने हॅरियरचे ‘कॅमो’ एडिशन लाँच केले. या स्पेशल एडिशनच्या इंटेरिअरसह फीचर्समध्ये बदल केले आहेत. शिवाय टाटाने हॅरियरचे आकर्षक असे ‘डार्क एडिशन’ही बाजारात आणले आहे.

हॅरियरच्या सेगमेंटमधील इतर कार

कार इंजिन ऑन रोड किंमत

किया सेल्टोस १३५३ ते १४९७ सीसी ९ ते १८ लाख

ह्युंदाई क्रेटा १३५३ ते १४९७ सीसी १० ते १८ लाख

एमजी हेक्टर १४५१ ते १९५६ सीसी १३ ते १९ लाख