करिअरचे ‘पतंग’ 

करिअरचे ‘पतंग’ 

लहानपणी तुम्ही पतंग उडवला असेल. संक्रांत म्हणजे पतंग उडवायचा सीझन आल्यावर दुकानातून आपल्याला हव्या त्या आकाराचे अन् रंगाचे पतंग आणायचे. जुना मांजा, आसारी वगैरे शोधून काढायची. पतंगाला मोजून मापून ‘कण्णी’ लावायची, वाटलं तर मोठं शेपूट चिकटवायचं. संध्याकाळी वारा सुटला की घराची गच्ची, बिल्डिंगची टेरेस किंवा मोकळ्या मैदानात जाऊन पतंग उडवायचा. पतंग उडवताना पहिलं स्किल लागतं ते या सगळ्या पूर्वतयारीचं. ‘लोकांना आकाशातला पतंग दिसतो, पण तो ज्याच्यामुळं आकाशात आहे ती दोरी दिसत नाही,’ असा एक सिनेमा-कादंबऱ्यांमध्ये वापरला जाणारा डायलॉग आहे! हे खरं आहेच, पण त्याही आधी होत असलेली पतंगासाठीची पूर्वतयारी इतर कोणालाच दिसत नाही. इतरांना दिसत नसली, तरी ती अत्यंत महत्त्वाची असते हे आलंच! 

पतंग उडवण्याचं दुसरं महत्त्वाचं स्किल म्हणजे पतंग जमिनीवरून आकाशात ‘लाँच’ करणं. हातातला पतंग आकाशात सोडण्यासाठी काय काय उद्योग करायला लागतात! वाऱ्याची दिशा बघायची, पतंग दोन्ही हातात धरून वर फेकायचा प्रयत्न करायचा, एका हातात मांजा धरून जोरात पळत जायचं. हे सगळं करून एकदा पतंग हवेत गेला अन् त्याला योग्य वारा मिळाला, की मग तो सरसर वरती जायला लागतो! मग निवांतपणे ढील देऊन उंच उंच पतंग उडवत राहाणे ही सॉलिड धमाल असते! अर्थात, हे झालं की दोन गोष्टी लक्षात ठेवाव्यात. एकतर आपल्याकडं जेवढा मांजा आहे, त्याहून जास्त लांब पतंग जात नाही. आणि आकाशात पतंगांची खूप जास्त गर्दी असेल, तर आपला पतंग ‘काटायला’ इतर कोणी पतंग येऊ शकतात. आपल्याला काटाकाटी खेळायचा अनुभव आणि स्किल नसेल, तर कोणी सुमडीत आपला पतंग काटून टाकू शकतं... 

पतंगाच्या ह्या खेळाचं आपल्या करिअरशी असलेलं साम्य विलक्षण रोचक आहे! उंच उडणारा पतंग म्हणजे यशस्वी करिअर हे मानलं, तर ते लोकांना सहज दिसतं, पण त्यासाठी, त्याआधी खूप तयारी करावी लागते, ती इतर कोणाला दिसत नाही. करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांत, ते लाँच करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, वेगवेगळ्या आयडिया वापरायला लागतात. हवेची दिशा आपल्याला समजली नाही किंवा कण्णी चुकीची बांधली असल्यास कितीही प्रयत्न केले तरी करिअरचा पतंग लाँच करता येत नाही. लाँच करणं जमल्यानंतरही भरपूर हवा येणारी योग्य ती दिशा पकडली असेल, तर करिअरमध्ये प्रगती होत राहाते. मोकळ्या आकाशात आपला एकटा पतंग असेल तर ठीक, पतंगांनी भरलेलं आकाश असल्यास आपल्याला काटू पहाणारे प्रतिस्पर्धीही असतात. आणि आपण कितीही प्रयत्न केला तरी आपल्याजवळच्या मांजाहून, म्हणजे आपल्या क्षमतेहून जास्त उंची आपण गाठू शकत नाही. आपल्या हातात असलेल्या गोष्टी आणि आपल्या नियंत्रणाबाहेर असलेल्या गोष्टी याचा योग्य मिलाफ साधल्यास पतंग आणि करिअर दोन्हीमध्ये भरपूर उंची गाठता येते! 

म्हणतात ना, ‘ज्याचे हाती पतंगाची दोरी, तो स्वत-चे उद्धारी!’ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com