घरगुती बजेटची कला!

घरगुती बजेटची कला!

या  आठवड्यात आलेल्या देशाच्या ‘बजेट’बद्दल तावातावानं चर्चा करून झाली असेल एव्हाना. आता जरा आपल्या ‘घरगुती’ बजेट बद्दल बोलूया! त्याचं असंय बघा, ‘घरात पैसे येण्यासाठी एखाद-दोन दारंच असतात, पण घरातून पैसे जाण्यासाठी अनंत खिडक्या असतात!’ हा साक्षात्कार प्रत्येक संसारी माणसाला कधी ना कधी होतोच! नवरा-बायकोचे पगार, त्यांच्या ठेवींवरचं व्याज, गुंतवणुकींवरलं उत्पन्न वगैरे पैसा घरात येण्याची निवडक दारं. घराचा हप्ता किंवा घरभाडं आणि वीज, गॅस, पेट्रोलपासून ते किराणा, भाज्या, मुलांच्या शाळेच्या फिया, ट्रिपा, युनिफॉर्म वगैरेपासून कामवाल्या बाया, इस्त्रीवाला, गाडी धुणारा वगैरेंसारखे सेवादाते यांचे पगार हे सारे नियमित खर्च. याशिवाय, मोबाईल रिचार्ज, सिनेमे, हॉटेलिंग, टीव्ही रिचार्ज वगैरे कधीच न संपणारी खर्चांची यादी! एखाद-दोन दारांमधूनच घरात येणाऱ्या पैशाला घराबाहेर जाण्यासाठी ह्या असंख्य खिडक्या असतात! 

पैशाला आपल्याला ‘मॅनेज’ करावं लागतं. हे मॅनेज करण्यासाठी घरगुती ‘बजेट’ करणं आणि ते अमलात आणणं हा एक सर्वोत्तम मार्ग असतो. बजेटची प्रक्रिया म्हटलं तर अगदी सोपी असते. वर्ष सुरू व्हायच्या आधी आपल्याला वर्षभरात काय उत्पन्न येणार आहे हे कागदावर (किंवा एक्सेलमध्ये) मांडायचं अन त्यातून आपण काय खर्च आणि काय बचत अथवा गुंतवणुक करणार आहोत, हेही मांडायचं. पगारदार माणसांना हे करणं एकदम सोपं असतं, कारण वर्षभर दर महिन्याला किती पगार मिळणार आणि आपले नियमित खर्च किती हे दोन्ही त्यांना पक्कं माहीत असतं. व्यवसाय-धंदा करणाऱ्यांना उत्पन्नाचं भाकीत करता येतंच असं नाही, पण खर्चाचं नक्की करता येतं. जेवढं जमतंय तेवढं वर्षभराच्या जमा-खर्चाचं भाकीत नक्की करायचं. मग, दर महिन्यात जे प्रत्यक्ष उत्पन्न मिळालं आणि प्रत्यक्ष खर्च होत गेला तो आपल्या बजेटच्या आकड्यांशेजारी मांडत जायचा. आपण आपल्या बजेटपेक्षा किती कमी किंवा जास्त खर्च करतो आहोत, ते दर महिन्याला समजत गेलं की बजेट ॲडजस्ट करणं किंवा खर्च लिमिटमध्ये ठेवणं ह्या दोन्हीपैकी काहीतरी एक करावं लागतं! अर्थात, हे सगळं करायचं ते आपले खर्च  नियंत्रणात ठेवून बचत आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी. महिन्याला एक दोन तासच लागतात हे करायला, पण इट्स वर्थ इट! 

दोन-चार दारांमधून येऊ शकणारा पैसा वाढवायचा कसा आणि आलेला पैसा योग्य त्या खिडक्यांमधूनच बाहेर पाठवून सत्कारणी लावायचा कसा हे समजणं हे काहीसं शास्त्र अन् फार मोठी कला आहे! कारण येणाऱ्या आणि जाणाऱ्या पैशाच्या या प्रवाहावरच आपलं आयुष्य अवलंबून असतं. ह्या पैशाच्या प्रवाहानं आपलं आयुष्य समृद्ध करण्यासाठी घरगुती बजेट करणं आणि ते काटेकोरपणे पाळणं जमायला हवं!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com