हिशेब चुकविणारे सोशल ट्रेन्ड 

सम्राट फडणीस
बुधवार, 24 जून 2020

ट्विटरच्या पोलची गंमत आहे.अजेंडा राबविण्यासाठी पोल(मतदान)घेतलं,तर ते प्रत्येकवेळी अपेक्षित निकाल देईलच असं नाही.विशेषतः राजकीय विषयांच्या बाबतीत ट्विटर कमालीचा धक्का देऊ शकतं.

सोशल मीडियानं लोकांना ‘आवाज’ दिला, मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य बोटांवर आणलं, असं मानलं जातं. लॉगीन केलेल्या कोणालाही मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य सोशल मीडियावर आहे. त्या स्वातंत्र्याचा फायदा-गैरफायदा घेतला जातो आणि त्यातून वाद निर्माण होतात. विशिष्ट राजकीय विचारसरणीची बांधीलकी असलेले गट सोशल मीडियावर हवा तो अजेंडा रेटण्यासाठी संख्यात्मकदृष्ट्या सतत वाढीसाठी प्रयत्न करतात. संख्येनं जास्त असले, की आवाज मोठा करता येतो आणि अजेंडा पुढं रेटता येतो, हा साधा सरळ हिशेब. कधीकधी हा हिशेब चुकतो. विशेषतः गेल्या वर्षभरात सोशल मीडियावर आक्रमक झालेल्या विरोधी आवाजाचं कामच मुळी हा हिशेब चुकविण्याचं बनलं आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

ट्विटरच्या पोलची गंमत आहे. अजेंडा राबविण्यासाठी पोल (मतदान) घेतलं, तर ते प्रत्येकवेळी अपेक्षित निकाल देईलच असं नाही. विशेषतः राजकीय विषयांच्या बाबतीत ट्विटर कमालीचा धक्का देऊ शकतं. भारत-चीन सीमेवरील तणावाचे पडसाद ट्विटरवर उमटणं स्वाभाविक होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं समर्थन करणारा आणि त्यांच्यावर टीका करणारा, असे दोन्ही गटही स्वाभाविक आक्रमक आहेत. राजकीय पाठीराख्यांच्या भाऊगर्दीत प्रस्थापित माध्यमांची ट्विटरवर चांगलीच गोची झाली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या सीमा सुरक्षित आहेत का, या प्रश्‍नावर बहुमत ‘नाही’कडं झुकणं, याचा अर्थ लावणं कठीण झालं. नरेंद्र मोदींना ‘सरेंडर मोदी’, की ‘धुरंधर मोदी’ म्हणावे यावर बहुमत ‘सरेंडर’ झाले! 

हेही वाचा : प्रतिक्रियावादी आभासी जग

ट्विटरवर किंवा एकूणच सोशल मीडियावर एखाद्या गोष्टीविषयी समज निर्माण करून द्यायला बहुमताचा आधार घेतला जातो. आधीच आशयाची रचना आपल्या अजेंड्याला पुढं रेटणारी असते. त्याबरहुकूम निकाल मिळविण्यासाठी पुरेशा संख्याबळाची जुळणी झालेली असते. त्यामुळं, आम्ही सांगतोय तोच आशय खरा आहे, असा समज निर्माण करता येतो. ही पद्धत २०१४च्या लोकसभा निवडणुकीपासून चालत आली आहे. त्यासाठी फेसबूक, ट्विटर, यू-ट्यूब आणि आता इन्स्टाग्राम, हेलो अशा सोशल मीडियाचा सर्रास वापर होतो आहे. 

अलीकडच्या दोन वर्षांमध्ये बहुमताची गणिते बिघडत चालली आहेत. याचं कारण, सर्वच राजकीय विचारसरणींचे आता सोशल मीडियावर अस्तित्व आहे. त्यांना पुरेसं संख्याबळही आहे. त्यामुळंच, जाता जाता लालूप्रसाद यादवांची टर उडवता येत नाही आणि फक्त ‘मोदी जी की जय होsss’ असा सूरही लागत नाही. 

चीनबद्दलची भारताची भूमिका ट्विटरवरून ठरत नसते. आपल्या देशाच्या भूमिकेबद्दल आपलं स्वतंत्र मत असू शकतं. ते मांडण्याची जागा सोशल मीडियावर असू शकते; मात्र आपलं मत म्हणजेच देशाचं मत, असा भ्रम करून घेणाऱ्यांना सोशल मीडियावर आता विरोधी मताचं बहुमतही होताना पाहावं लागत आहे. सगळे धक्के, टीका-टिप्पणी पचवत विस्तारणाऱ्या सोशल मीडियासाठी असे ट्रेन्ड महत्त्वाचे ठरणारे आहेत.

samrat.phadnis@esakal.com 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: samrat phadnis writes about Social Trends