Chandrayaan 2 : यशस्वी भव!; 'चांद्रयान-2'चे यशस्वी प्रक्षेपण 

Chandrayan 2
Chandrayan 2

श्रीहरिकोटा : अब्जावधी स्वप्ने उराशी बाळगून चांद्रस्वारीसाठी भारताने आज दमदार पाऊल टाकले. महत्त्वाकांक्षी "चांद्रयान-2'चे आज भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2.43 वाजता यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. पुढील 48 दिवसांनी हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या जवळ उतरेल. या भागात यान उतरविणारा भारत पहिला देश ठरेल. ही मोहीम संपूर्ण स्वदेशी आहे. 

"चांद्रयान-2' चे प्रक्षेपण या आधी 15 जुलै रोजी निश्‍चित करण्यात आले होते. मात्र, त्या वेळी प्रक्षेपकामधील तांत्रिक अडचणींमुळे त्याची उलटगणती 56 मिनिटे 24 सेकंद आधीच थांबविण्यात आली. त्यानंतर प्रक्षेपणासाठी आजची तारीख ठरविण्यात आली. "जीएसएलव्ही मार्क 3-एम 1' या "बाहुबली' प्रक्षेपकाद्वारे "चांद्रयान-2'चे प्रक्षेपण सतीश धवन अवकाश केंद्रातून करण्यात आले. उड्डाणानंतर 16 मिनिटे व 20 सेकंदांनी "चांद्रयान-2' हे 170 किलोमीटर बाय 39059 किलोमीटर या भूस्थिर कक्षेत सोडण्यात आले. पुढील दीड दिवस यानाच्या सर्व प्रक्रियांची चाचणी करण्यात येणार आहे आणि नंतर त्याचा पुढचा टप्पा सुरू होईल. भूस्थिर कक्षेत ते काही दिवस फिरत राहणार आहे व नंतर चंद्राच्या कक्षेत सोडण्यात येणार आहे. "चांद्रयान-2'च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर शास्त्रज्ञांनी एकच जल्लोष केला. 

प्रक्षेपणाच्या तारखेत बदल करण्यात आल्याने मोहिमेच्या एकूण कार्यक्रमात आणि यानाच्या वेगातही थोडे बदल करण्यात आले आहेत. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) 11 वर्षांच्या प्रयत्नांचे हे यश आहे. "चांद्रयान-2' हे चंद्राभोवती 3400 फेऱ्या मारेल आणि पुढील 312 दिवस त्याचा कार्यकाल असणार आहे. रशिया, अमेरिका आणि चीन यांच्यानंतर चंद्रावर यान उतरविणारा भारत हा चौथा देश असेल. "चांद्रयान-2'वर एकूण 13 उपकरणे आहेत. 

अशी आहे मोहीम... 
- पृथ्वीच्या कक्षेत जाण्याचा कालावधी सुमारे मिनीटभराने वाढविण्यात आला 
- "चांद्रयान-2' पृथ्वीभोवती 170 किलोमीटर (पेरीजी) बाय 39059 किलोमीटरच्या (अपोजी) कक्षेत प्रदक्षिणा करेल. 
- चंद्राच्या कक्षेत पोचायला यानाला 48 दिवस लागतील. 15 जुलै रोजी प्रक्षेपण झाले असते, तर 56 दिवस लागले असते. 
- "चांद्रयान-2' हे 10305.78 मीटर प्रतिसेकंदांनी प्रवास करेल. याचा वेग 1.12 मीटर प्रतिसेकंदाने वाढविण्यात आला आहे. 
- सहा सप्टेंबरला यान चंद्रावर उतरेल. 

भारतीयांसाठी अभिमानास्पद क्षण 
"चांद्रयान 2'चे श्रीहरीकोटा येथून झालेले ऐतिहासिक प्रक्षेपण हा सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद क्षण आहे. भारताच्या स्वदेशी अवकाश कार्यक्रमाला पुढे नेणारे आपले शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे 
अभिनंदन. नवीन तंत्रज्ञानावर "इस्त्रो'चे प्रभुत्व कायम राहो. आजपासून 50 दिवसांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवानजीक उतरणारे "चांद्रयान 2' हे पहिले अंतराळ यान ठरेल. या मोहिमेतून नव्या शोधांचा जन्म होईल आणि आमच्या ज्ञानकक्षा अधिक समृद्ध होतील, अशी आशा आहे. 
- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती 

"चांद्रयान 2'चे प्रक्षेपण हा देशाच्या गौरवशाली इतिहासातील सर्वात स्मरणीय घटना ठरेल. शास्त्रज्ञांची अथक मेहनत आणि 130 कोटी भारतीयांच्या इच्छाशक्तीमुळे यानाचे यशस्वी उड्‌डाण झाले. "चांद्रयान 2'मुळे विज्ञानातील नव्या गोष्टींचा शोध लागेल. आज सर्व भारतीयांना अभिमान वाटत आहे. 
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

"चांद्रयान 2'चे श्रीहरीकोटाहून झालेल्या यशस्वी उड्डाणाबद्दल "इस्त्रो'च्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन. या उड्डाणानंतर अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि स्वदेशी चांद्रमोहिमेमुळे भारताच्या अवकाश संशोधनाच्या इतिहासात नवा अध्याय "इस्त्रो'च्या चमूने लिहिला आहे. हा चमू आणि आपले शास्त्रज्ञाबद्दल देशाला खूप अभिमान वाटत आहे. 
- राजनाथसिंह, संरक्षण मंत्री 

"चांद्रयान 2'च्या यशस्वी उड्डाण आणि अवकाश तंत्रज्ञानात आणखी एक मापदंड निर्माण केल्याबद्दल "इस्त्रो'मधील आपल्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन. कृतज्ञ देशाला त्यांचा अभिमान आहे. प्रत्येक वेळी नवीन आदर्श निर्माण करण्यासाठी आपल्या संस्थांना प्रोत्साहन दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही मी आभार मानतो. 
- अमित शहा, केंद्रिय गृहमंत्री 

चांद्रयानाच्या यशाबद्दल भारत व "इस्त्रो'वर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अमेरिका, इस्त्राईल अशा अनेक देशांमधील भारतातील वकिलातींकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहे. 

आजच्या मोठ्या भरारीसाठी "इस्त्रो'चे अभिनंदन. आता "चांद्रयान 2' चा पुढील थांबा चंद्र आहे. "जीएसएलव्हीएमके 3'च्या पुढील वाटचाल काय असेल याची उत्सुकता आहे. 
- अमेरिकी वकिलात 

"चांद्रयान 2'च्या यशस्वी उड्डाणाबद्दल भारत आणि "इस्त्रो'च्या पथकाचे अभिनंदन. "चांद्रयान 2' च्या चांद्र प्रवासासाठी शुभेच्छा. जेव्हा आमचे "बेरेशीट -2' हे यान चंद्रावर पोचेल तेव्हा आम्ही तुमच्या मागेच असू.  इस्त्राईली वकिलातीतर्फे केले आहे. 

भारताच्या वैज्ञानिक प्रगतीच्या दृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिक आहे. चंद्राच्या दिशेने प्रवास करण्याच्या दृष्टीने "चांद्रयान-2'चा आजचा दिवस महत्वाचा होता. लॅंडर, रोव्हर यांसाठीचे तंत्रज्ञान आपण प्रथमच विकसित केले. जीएसएलव्ही या आपल्या प्रक्षेपकाची क्षमताही 15 टक्‍क्‍यांनी वाढविण्यात आली आहे. आजचे यश हे संपूर्ण "टीम इस्रो'चे आहे. या प्रकल्पात सहभागी असलेल्या सर्वांना सॅल्युट! 
- के. सिवन, इस्रोचे अध्यक्ष 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com