मेरे बस में होता, तो बुऱ्हान वणीको जिंदा रखता: कॉंग्रेस नेता

वृत्तसंस्था
शुक्रवार, 7 जुलै 2017

सोझ यांनी "सरकारने राक्षसी आफ्स्पा कायदा मागे घ्यावा; आणि काश्‍मीरमधील नेत्यांशी चर्चा करावी,' अशी मागणी केली होती. आता सोझ यांनी केलेल्या या नव्या विधानामुळे पुन्हा एकदा वाद उफाळून येण्याची शक्‍यता आहे

नवी दिल्ली - भारतीय लष्कराने गेल्या वर्षी (2016) काश्‍मीर खोऱ्यात यमसदनी धाडलेल्या बुऱ्हान वणी या हिझबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्‍यास "हातात असते, तर जिवंत ठेवले असते,' असे विधान कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सैफुद्दीन सोझ यांनी आज (शुक्रवार) केले. "मेरे बस में होता तो बुऱ्हान वणी जिंदा रखता और उनसे डायलॉग करता,' असे सोझ म्हणाले.

वणी याला गेल्या 8 जुलै रोजी लष्कराच्या कारवाईत ठार करण्यात आले होते. यानंतर काश्‍मीर खोऱ्यात अत्यंत हिंसक निदर्शने झाली होती. याच वेळी सोझ यांनी "सरकारने राक्षसी आफ्स्पा कायदा मागे घ्यावा; आणि काश्‍मीरमधील नेत्यांशी चर्चा करावी,' अशी मागणी केली होती. आता सोझ यांनी केलेल्या या नव्या विधानामुळे पुन्हा एकदा वाद उफाळून येण्याची शक्‍यता आहे.

सोझ यांच्या विधानावर भारतीय जनता पक्षाकडून (भाजप) तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. दहशतवाद्याला दहशतवाद्याप्रमाणेच वागणूक मिळावयास हवी, असे भाजपकडून या पार्श्‍वभूमीवर स्पष्ट करण्यात आले आहे. ""सरकारला काश्‍मीरमध्ये शांतता प्रस्थापित करावयाची आहे. आणि येथील दहशतवाद्यांना नष्टही करावयाचे आहे,'' असे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी म्हटले आहे.

जम्मु काश्‍मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनीही या विधानावर टीका केली आहे. ""दहशतवाद्यांना नेता म्हणणाऱ्या लोकांना दहशतवाद्यांचे उदात्तीकरण करावयाचे आहे काय,'' अशी संतप्त विचारणा सिंह यांनी केली आहे.

सोझ यांच्या विधानावर आणखी तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्‍यता आहे. 

काश्‍मीरमध्ये "आझादी'ची मागणी करणाऱ्या फुटीरतावाद्यांशी चर्चा केली जाणार नाही,  अशी ठाम भूमिका सरकारकडून घेण्यात आली आहे..