चीनच्या अरेरावीबद्दल मोदी गप्प का? US, इस्राईल दोस्ती काय कामाची?

टीम ई सकाळ
बुधवार, 26 जुलै 2017

मोदी सरकारला गांभीर्य नाही
कालपर्यंत चीनमधील वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांमधून अशा प्रकारच्या धमक्या, इशारे भारताला दिले जात होते. मात्र आता चिनी लष्कराचे प्रवक्ते वू किमाने यांनीच उघड उघड धमकी दिली आहे. मात्र तरीही आपण ती गांभीर्याने घेताना दिसत नाही. कश्मीरचा एक भाग पाकड्यांनी घशात घातला. १९६२ च्या युद्धानंतर चिन्यांनी भारताला कुरतडले आहेच, त्यात आणखी थोडे कुरतडले तर काय झाले या मस्त विचारात सरकार मग्न आहे काय?, असा सवाल सेनेने केला आहे. 

मुंबई : 'डोकलाममध्ये घुसलेल्या चीनला मागे हटविण्यास तरी अमेरिका व इस्रायलचे पंतप्रधान मोदी यांना सहकार्य करतील काय? त्यांचे सहकार्य मिळाले तरच मोदी आणि या पंतप्रधानांनी एकमेकांना दिलेल्या आलिंगनास अर्थ आहे. नाहीतर नेहमीप्रमाणे आपली लढाई आपल्यालाच लढावी लागेल. डोकलामप्रकरणी भारताचे पंतप्रधान गप्प का आहेत?' अशा शब्दांत शिवसेनेने चीनप्रश्नी मोदी सरकारला जाब विचारला आहे. 

एकीकडे कारगिल विजय दिवस साजरा केला जात असताना शिवसेनेने देशाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत असल्याचे निदर्शनास आणून देत मुखपत्र 'सामना'मधून मर्मावर बोट ठेवले आहे. "पाकव्याप्त कश्मीरचा खंजीर पाठीत घुसला असतानाच चीनव्याप्त डोकलामने छातीत काटा घुसवला आहे. पंतप्रधानांवर व त्यांच्या क्षमतेवर आमचा विश्वास आहे. ते नक्कीच काहीतरी करतील," अशी खोचक टिपण्णीही शिवसेनेने केली आहे. 

डोंगर हलवता येईल, पण चिनी सैन्य नाही!...
"चीनचे सैन्य डोकलामपर्यंत म्हणजे जवळजवळ भारती हद्दीत घुसलेच आहे व सिक्कीम-भूतानच्या सीमेवर आता जे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे त्याबाबत देशवासीयांच्या मनात चिंतेची पाल चुकचुकू लागली आहे. डोकलाम चीनचाच भाग असून आपले सैन्य मागे हटणार नसल्याचे त्यांच्यातर्फे बजावण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर भारताने सैन्य मागे न घेतल्यास तेथील चिनी सैनिकांची संख्या वाढविण्यात येईल, अशी धमकी आता चीनने दिली आहे. पुन्हा एकवेळ डोंगर हलविता येईल, पण चीनचे लष्कर डोकलाममधून हटविणे केवळ अशक्य आहे, अशी दर्पोक्तीही चिनी लष्कराच्या प्रवक्त्याने केली आहे. 

भारत, चीन आणि भूतान यांच्या सीमारेषा येऊन मिळतात तिथे हा डोकलाम भाग आहे. चीनला तिथे रस्ता बनवायचा आहे. भारत व भूतानने त्यास विरोध केला असला तरी डोकलाम हा चीनचाच भाग असल्याचे सांगून चीनने तिथे सैन्य घुसवले आहे व युद्धसामग्री पोचवून दबावाची पहिली तोफ डागली आहे. 

दारूगोळा नाही, मांडलिकत्व पत्करणार का?
चीन डोकलामप्रश्नी रोज धमक्या देत आहे व दिल्लीत राजकीय उत्सवाची आतषबाजी सुरूच आहे. संसदेचे अधिवेशन इतक्या निरस आणि कंटाळवाण्या पद्धतीने चालले आहे की, बोफोर्सप्रश्नी लोकसभेत अध्यक्षांच्या दिशेने कागदाचे बोळे काँग्रेसवाले फेकतात, पण डोकलामप्रश्नी धारदार पद्धतीने प्रश्न विचारणे त्यांना जमत नाही. राष्ट्राच्या संरक्षणाबाबत सरकारपेक्षा विरोधी पक्षाने जास्त टोकदार भूमिका घेणे गरजेचे असते. युद्ध झालेच तर फक्त दहा दिवस पुरेल इतकाच दारूगोळा उरला आहे या बातमीने देशातील जनतेची झोप उडाली असेल, पण धडधाकट विरोधी पक्ष व सत्ताधारी जणू मांडलिकत्व पत्करून निपचीत जगण्याच्या तयारीस लागले आहेत.

डोकलाम 'चीनव्याप्त' होऊ नये...
कश्मीरचा एक भाग पाकव्याप्त झाला तसे डोकलामही कायमचे चीनव्याप्त होऊ नये. अमेरिका व इस्राईलच्या राष्ट्राध्यक्षांशी पंतप्रधान मोदी यांची व्यक्तिगत मैत्री आहे. ती कशी दृढ आहे तेदेखील जगाने त्यांच्या भेटीगाठींद्वारा पाहिले आहे. त्यामुळेच भारतासमोरील चीन आणि पाकिस्तानचे आव्हान मोडून काढण्यासाठी ही मैत्री उपयोगी पडेल अशी एक अपेक्षा भारतीय जनतेची आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :