रायगड : खालापूरमध्ये नदीत बुडून पाचजणांचा मृत्यू

अनिल पाटील
बुधवार, 7 जून 2017

  • तीन मुले व दोन महिलांचा समावेश
  • शिरवली गावावर शोकाकळा
  • यातील चार एकाच कुटुंबातील
  • आई व मुलांचा समावेश

खोपोली : खालापूर तालुक्यातील शिरवली गावातील तांबट कुटुंबातील दोन महिलांसह त्यांच्या कुटुंबातील तीन मुले नदीच्या खोल पाण्यात बुडाल्याने यात पाचही जणांचा बळी गेला. या भयंकर घटनेने बुधवारी सकाळी संपूर्ण खालापूर तालुका हेलावून गेला. काही वेळाने या घटनेबद्दल समजताच गावातील तरुण व नागरिक घटनास्थळी धावले. मात्र तोपर्यंत पाचही जण मृत्युमुखी पडले होते.

गावकऱ्यांनी सदर घटनेची माहिती खालापूर पोलिस व महसूल विभागाला दिली आणि बुडालेली तीन मुले व नंतर दोन महिलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. या घटनेने संपूर्ण तालुका हादरला असून, शिरवली गावावर शोककळा पसरली.

नेमकं काय घडलं? 
आज (बुधवारी) खालापूर तालुक्यातील शिरवली गावातील अनेक वर्षापासूनचे रहिवासी असलेले व मूळ रोहा-अष्टमी येथील असलेले तांबट समाजाच्या कुटुंबातील दोन महिला, रोजी-रोटीसाठी बाहेर जातात म्हणून, नेहमीप्रमाणे सकाळी सातच्या सुमारास कपडे धुण्यासाठी गावाला लागून असलेल्या बाळगंगा नदीवरील बंधाऱ्याजवळ गेल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत कुटुंबातील तीन मुलेही होती. महिला कपडे धुवत असताना यातील एक मुलगा पाण्यात अंघोळीसाठी उतरला. तो खोल पाण्यात गेल्याने बुडायला लागल्याचे बघून या मुलाची आई त्याला वाचविण्यासाठी पाण्याकडे धावली. तीही बुडायला लागल्याचे बघून इतर दोन मुलेही पाण्याकडे धावली, मात्र पाणी खोल होते आणि पोहता येत नसल्याने ती दोन्ही मुलेही बुडू लागली. हे बघून दुसरी महिलाही त्यांना वाचविण्यासाठी खोल पाण्यात गेली, मात्र तीही बुडायला लागली. हे सर्व बघून कपडे धुवत असलेली तिसऱ्या महिलाने त्यांना वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. मात्र यात तिला अपयश आले. त्यादरम्यान गावातील एक व्यक्ती नदीकडे येत असल्याने, त्याने हा प्रकार बघून आरडाओरडा करुन गावातील लोकांना मदतीला बोलाविले. काही वेळातच गावातील मोठ्या संख्येने तरुण व नागरिकांनी नदीकाठी धाव घेत मदत करण्यास सुरवात केली  मात्र, काळानेच झडपच अशी घातली की ते पाचही जण पाण्यात बुडाल्याने मोठा अनर्थ घडला.

या दुर्घटनेत मीनाक्षी वाकनीस (वय 31), शुभम मिलिंद वाकनीस (वय 8), गौरी गणेश आरते (वय 33), तेजस्विनी गणेश आरते (वय 10), तुषार गणेश आरते (वय 7), सर्व राहणार - शिरवली (ता. खालापूर) या पाचजणांचा बळी गेला. यातील तीन मुले व एक महिला एकाच कुटुंबातील आई व तिची मुले आहेत. काही वेळात या घटनेची ख़बर गावात धडकल्यावर गावातील तरुण व नागरिक घटनास्थळी धावले. यावेळी गावातील सर्वानी धावाधाव करुन बुडालेल्यांचा प्राण वाचविण्याचा आटोकात प्रयत्न केला, मात्र काळ आला होता की काय.. त्यामुळे या प्रयत्नांना यश आले नाही, अशी खंत जेष्ठ नेते शंकर मानकवळे, एच.आर. पाटील यांनी अतिशय दुःखदपणे व्यक्त केली.

यासंदर्भात माहिती मिळताच खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारी पांढरपट्टे, तहसीलदार राजेंद्र चव्हाण हे आपल्या संपूर्ण टीमसह घटनास्थळी पोचले, मात्र तोपर्यंत सगळे घडून गेले होते. या घटनेने संपूर्ण तालुका हादरून गेला. मृतावस्थेततील पाचही मृतदेह खालापूर ग्रामीण रूग्णालयात आणले तेंव्हा तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली. मात्र घटना अत्यंत भयानक व अत्यंत वेदना देणारी असल्याने सर्वांपुढे  तीव्र दुःख व्यक्त केल्याशिवाय काहीही पर्याय उरला नाही.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
लातूर: मुसळधार पावसामुळे पूल गेला वाहून
अकोला, बुलडाणा जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी
'सीएम'साहेब! जाळपोळ करणारे शिवसेनेवाले समजायचे का?​
नागालँड: चकमकीत जवान हुतात्मा, 3 दहशतवादी ठार​
लंडनवासीयांनी लुटला सांस्कृतिक कार्यक्रमांचा 'आस्वाद'​
बसोलीच्या कलावंतांनी साकारले अनोखे भित्तिचित्र​
कोहली फाउंडेशनच्या कार्यक्रमात मल्ल्या ‘बिन बुलाए मेहमान’