मोदीजी, आता 56 इंचांची छाती दाखवा : संजय राऊत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 जुलै 2017

अमरनाथ यात्रेवरील हल्ला हा दिल्लीतील 'मजबूत' सरकारवर झालेला हल्ला आहे. नोटाबंदी किंवा 'सर्जिकल स्ट्राईक'मुळे दहशतवाद्यांना काहीही फरक पडत नाही, हे यातून सिद्ध होत आहे. आता चर्चा करत बसू नका. हल्ल्याचा बदला घ्या..!

मुंबई : 'अमरनाथ यात्रेवर काल (सोमवार) दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा दिल्लीतील मजबूत सरकारवरील हल्ला आहे. आता 56 इंचाची छाती दाखविण्याची वेळ आली आहे', अशा शब्दांत केंद्रात आणि राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने भाजपवर शाब्दिक हल्ला चढविला. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज (मंगळवार) पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केली. 

राऊत म्हणाले, "अमरनाथ यात्रेवरील हल्ला हा दिल्लीतील 'मजबूत' सरकारवर झालेला हल्ला आहे. नोटाबंदी किंवा 'सर्जिकल स्ट्राईक'मुळे दहशतवाद्यांना काहीही फरक पडत नाही, हे यातून सिद्ध होत आहे. आता चर्चा करत बसू नका. हल्ल्याचा बदला घ्या..! दहशतवाद्यांनी देशाच्या सुरक्षेलाच आव्हान दिले आहे. देशातील हिंदूंना आता वाली कोण आहे? 

सरकारने काळजी का घेतली नाही? : कॉंग्रेस 
'अमरनाथ यात्रेवर हल्ला होऊ शकतो, अशी पूर्वसूचना मिळाली असतानाही केंद्र सरकारने सुरक्षेची काळजी का घेतली नाही' असा प्रश्‍न कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी उपस्थित केला. 

सुरजेवाला म्हणाले, "गुप्तचर यंत्रणांनी 25 जून रोजीच अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याची पूर्वसूचना दिली होती. मग सुरक्षेसाठी योग्य ती पावले का उचलली गेली नाहीत? त्यातही, इथे एक नाही तीन हल्ले झाले आहेत. पहिला बंकरवर, दुसरा पोलिसांवर आणि तिसरा यात्रेकरूंच्या बसवर! लागोपाठ तीन हल्ले होत असतील, तर सुरक्षेतील त्रुटींना जबाबदार कोण आहे? सायंकाळी सातनंतरही या बसचा प्रवास कसा चालू राहिला, याचाही तपास व्हायला हवा.''  

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :