नांदेडः 'काँग्रेसमुक्त महापालिका' हेच भाजपचे मिशन !

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

सिडकोत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्धार; काँग्रेसचे अपयश जनतेपर्यंत पाेचविण्याचे आवाहन

नवीन नांदेडः आगामी महापालिका निवडणूक काँग्रेसमुक्त महापालिका मोहिमेमधील पुढचे पाऊल आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम करावेत, असे आवाहन भाजपचे सरचिटणीस संतोष वर्मा यांनी केले.

सिडकोत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्धार; काँग्रेसचे अपयश जनतेपर्यंत पाेचविण्याचे आवाहन

नवीन नांदेडः आगामी महापालिका निवडणूक काँग्रेसमुक्त महापालिका मोहिमेमधील पुढचे पाऊल आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम करावेत, असे आवाहन भाजपचे सरचिटणीस संतोष वर्मा यांनी केले.

सिडकोत रविवारी भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना वेळप्रसंगी आपणही महापालिका काँग्रेसमुक्त करण्यासाठी मैदानात उतरणार असल्याचे संकेत त्यांनी दिले. सिडको, हडको, वाघाळा, वसरणी, कवठा भागातील पदाधिकारी व भाजपचे ज्येष्ठ नेते जनार्दन ठाकूर, संतोष वर्मा आदींच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. या वेळी प्रभागामधील इच्छुकांनी आपली मते मांडली. पक्षाकडून तिकीट मिळाले नाही तर कुठल्याही परिस्थितीत बंडखोरी न करता सर्वांनी पक्षाच्या आदेशानुसार काम करण्यासाठी बांधील असल्याचा निर्धार या वेळी करण्यात आला.

नागरिकांच्या समस्या, अपेक्षा जाणून घेणे, मुलभूत प्रश्न सोडविणे आदींबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. शिवाय संपर्काद्वारे जनतेच्या सुचना, अपेक्षा लक्षात घेऊन जाहीरनाम्याचा मसुदा अंतिम करून तो वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती संतोष वर्मा यांनी दिली. जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकांत ग्रामीण भागात भाजपला यश मिळाले असून आता महापालिकेतील सत्ता काबीज करण्यासाठी सर्व स्तरावर हालचाली सुरु झाल्या आहेत. युती होईल न होईल; पण मिशन समजून नवीन नांदेड परिसरात कामाला लागण्याच्या सूचना या वेळी देण्यात आल्या.

महापालिकेचे सत्ताकेंद्र काँग्रेसच्या हाती आहे. गेली काही वर्ष सत्ता भोगत असलेल्या काँग्रेसकडून लोकांचा अपेक्षाभंग झाला आहे. अजूनही सिडको परिसर विकासापासून कोसो दूर आहे. पक्ष कार्यकर्त्यांनी काँग्रेसवरील ही नाराजी कॅश करण्यासाठी जनतेपर्यंत पोचले पाहिजे. यासाठी प्रभागवार नागरिकांशी थेट संवाद साधणे, सोशल मीडियाचा प्रभावी वापर करणे आणि कचरा, ड्रेनेज, पाण्यासह नागरी प्रश्नांवर आक्रमक होऊन नागरिकांशी संवादातून जवळीकता निर्माण करावी त्यासाठी पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी नियोजन करावे, असे आवाहन वर्मा यांनी केले. गजानन चव्हाण, मरिबा कांबळे, राजीव अंबेकर, चंचलसिंग जट, धीरज स्वामी, सिद्धार्थ धुतराज, पराग श्रोते उपस्थित होते.

निलंगेकरांमुळे विश्वास वाढला
लातूर जिल्हा परिषद आणि महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविलेल्या संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर महापालिकेची जबाबदारी सोपविल्यामुळे कार्यकर्त्यांत आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. नांदेडमध्ये आक्टोबरमध्ये होणाऱ्या या निवडणीकीदरम्यान महाराष्ट्रातील कुठेही निवडणूक नसल्याने अनेक दिग्गजांचे याकडे लक्ष राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच अनेक वरिष्ठांच्या सभा घेण्याच्या दृष्टीनेही नियाेजन केले जात असल्याचे सांगण्यात आले.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: