लोकल धावताहेत उशिरा; 'लेटमार्क'मुळे प्रवाशांचा संताप

मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

सकाळच्या सत्रात मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे लोकल गाड्या उशिरा धावत असल्याने प्रवाशांना कामावर लेटमार्क लागत असून, प्रवाशांनी उद्रेक केल्यावर रेल्वे प्रशासन जागे होणार का? कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचा रेल्वे प्रशासनाला सवाल. ...

कल्याण : सकाळच्या सत्रात कसारा, कर्जत, कल्याण हुन मुंबईकडे जाणाऱ्या लोकल उशिरा धावत असून त्याचा फटका सर्व सामान्य प्रवाशांना लेटमार्क लागत आहे, यामुळे संतापाचे वातावरण असून मोठा उद्रेक झाल्यावर रेल्वे प्रशासन जागी होणार का असा सवाल कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवाशी संघटनाने केला आहे.

कर्जत आणि कसारा हुन मुंबईच्या दिशेने प्रतिदिन रेल्वे लोकल ने लाखो प्रवासी प्रवास करत आहेत. मुंबईकडे खासगी आणि सरकारी नोकरीवर सकाळी 10 पर्यंत पोहचायचे म्हणून अनेक जण सकाळी 6 ते 8 या कालावधीत लोकल पकडतात, मात्र आजकाल त्या लोकल वेळेवर धावत नसल्याने अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान दाट धुक्याच्या वातावरणामुळे उत्तरेकडील मेल ,एक्सप्रेस गाड्या उशिरा कल्याण रेल्वे स्थानकात दाखल होत आहेत. त्यांना आधी सोडण्याकरीता या कसारा व कर्जत हुन मुंबई कडे जाणाऱ्या लोकल गाड्या सिग्नलवर थांबवून या एक्सप्रेस व मेलला पुढे काढले जात असल्याने प्रवाशीवर्गात संतापाचे वातावरण आहे. मात्र एक दिवस ठीक आहे मात्र मागील एक दोन महिन्यापासून रेल्वे प्रशासनाकडून दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप प्रवासी संघटनेकडून केला जात आहे.

मागील दोन महिन्यापासून लोकल लेट...
आसनगाव रेल्वे स्थानकातुन 7 वाजून 35 जलद लोकल मुंबईच्या दिशेने धावते मात्र ही लोकल मागील दोन महिन्यापासून 20 ते 30 मिनिटाने धावत असल्याने प्रवासी वर्गाचे चांगलेच हाल होत असून नोकरदार वर्गाला लेटमार्क लागत असल्याने संतापाचे वातावरण आहे. आज मंगळवार ता 14 नोव्हेंबर रोजी आसनगाव रेल्वे स्थानकातून ही 7 वाजून 35 मिनिटला लोकल सुटली मात्र ती ही 20 ते 30 मिनिट उशिरा धावल्याने प्रवासी वर्गाने नाराजी व्यक्त केली.

प्रतिदिन आसनगावहून सीएसटीएम 7 वाजून 35 मिनिटाला लोकल सुटते त्यातून वासिंद सीएसटीएम प्रवास करते मागील अनेक दिवसापासून ही लोकल उशिराने धावत असून आज मंगळवार ता 14 नोव्हेंबर रोजी सीएसटीएम रेल्वे स्थानकात 9 वाजून 40 मिनिटला लोकल पोहचली. रोज उशिरा लोकल धावत असल्याने मनस्ताप सहन करावा लागत अशी माहिती महिला प्रवासी काजल पगारे यांनी दिली.

प्रतिदिन आंबिवली दादर या लोकलने प्रवास करत असून आज ही लोकल दादरला 9 वाजून 25 मिनिटाला पोहचली. रोजी ही लोकल उशिरा धावत असून आज ही लोकल उशिरा धावली यामुळे खूप त्रास होत असून रेल्वे प्रशासनाने उपाययोजना केली पाहिजे अशी मागणी रमन तरे या प्रवाशांने केली आहे. आसनगाव वरून धावणारी लोकल का उशिरा धावत आहे याबाबत चौकशी केली जाईल, प्रवाशी वर्गाला दिलासा मिळेल अशी उपाययोजना निश्चित केली जाईल अशी माहिती रेल्वे जनसंपर्क अधिकारी ए के सिंग यांनी दिली.

1 नोव्हेंबरपासून मध्य रेल्वेने लोकल गाड्या आणि फेऱ्या वाढविल्या असल्या तरी कल्याण ते कर्जत आणि कल्याण ते कसारा दरम्यान राहणारा प्रवासी वर्गाचा काही त्रास कमी झाला नाही. याबाबत रेल्वे अधिकारी केवळ उडवा उडविचे उत्तर देत आहे, मागील दोन महिन्यापासून आणि आज ही आसनगाव वरून मुंबई च्या दिशेने जाणारी 7 वाजून 35 मिनिटांची लोकल उशिरा धावली यामुळे नोकरवर्गाला लेट मार्क लागत आहे. प्रवाशांचा उद्रेक झाल्यावर प्रशासन जागे होणार का असा सवाल कल्याण कसारा कर्जत प्रवासी संघटना सचिव श्याम उबाळे यांनी केला आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: mumbai news kalyan locan train delay late mark