Suvarna Mujumdar
Suvarna Mujumdar

मांजाने घेतला 'सकाळ'च्या कर्मचाऱ्याचा बळी

पुणे - चिनी नायलॉन मांजा गळ्याभोवती अडकून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या "सकाळ'च्या कर्मचारी सुवर्णा मनोहर मुजुमदार (वय 45, रा. प्रज्ञा अपार्टमेंट, कांडगे पार्क, सिंहगड रस्ता) यांचा चार दिवसांपासून सुरू असलेला जगण्यासाठीचा संघर्ष अखेर रविवारी थांबला. डॉक्‍टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांना सुवर्णाचे प्राण वाचविण्यात अपयश आले. दरम्यान, सुवर्णा यांच्या मृत्यूप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये रविवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सुवर्णा मुजुमदार या मागील बुधवारी (ता. 7) "सकाळ'च्या बुधवार पेठ येथील कार्यालयातून शिवाजीनगर कार्यालयाकडे जात असताना शिवाजी पुलावर त्यांच्या गळ्याभोवती चिनी मांजा अडकून त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या गळ्यावर शस्त्रक्रियाही झाली. त्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नव्हती. अखेर रविवारी सकाळी साडेसातच्या सुमारास डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुजुमदार यांच्या पश्‍चात वडील मनोहर मुजुमदार व दोन बहिणी असा परिवार आहे.

सुवर्णा यांच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांच्या कुटुंबीयांसह, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, सहकारी आणि परिचितांना मोठा धक्का बसला. सर्वांनी रुग्णालयात आणि त्यानंतर त्यांच्या घरी धाव घेतली. त्यांच्या कुटुंबीयांचे दुःख पाहून, उपस्थितांनी अश्रूंना मोकळी वाट करून दिली. त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी वैकुंठ स्मशानभूमी येथे आणल्यानंतर सहकारीही दुःखात बुडाले. दुपारी बाराच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी "सकाळ'च्या संपादकीय, जाहिरात, वितरण आदी विभागांचे प्रमुख, वरिष्ठांसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याबरोबरच "पीएनजी ज्वेलर्स'चे सौरभ गाडगीळ, "मराठे ज्वेलर्स'चे मिलिंद मराठे, "पीएनजी ब्रदर्स'च्या अरुंधती भिडे, "पीएनजी ऍण्ड सन्स'च्या क्षितिजा आपटे, "चंदुकाका सराफ ऍण्ड ज्वेलर्स'चे सुनील चाणेकर, "रामा'चे अध्यक्ष दिनकर शिलेदार, पदाधिकारी प्रकाश शहा, विनीत कुबेर, संजय साताळकर, सचिन पाटील, दीपक वर्तक, मनीष आंबेकर, विनीत परनाईक, संतोष धुमाळ, अजय मोरे, राहुल देशपांडे, महेश गुधाटे, नमिता कुलकर्णी, अर्चना कुलकर्णी, आशिष पारेख, संदीप कुलकर्णी यांच्यासह शहरातील सर्व प्रसारमाध्यमांमधील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सुवर्णा यांनी अहिल्यादेवी प्रशालेतून प्राथमिक, तर नूमविमध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेतले. पुढे एमईएस गरवारे महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले. प्रारंभी गावकरी, त्यानंतर मोना ऍडव्हर्टाझिंगमध्ये त्यांनी नोकरी केली, तर "सकाळ'मधील जाहिरात विभागात त्या दहा वर्षांपासून कार्यरत होत्या.

'मांजामुळे आम्ही आमच्या बहिणीला गमावले आहे. दांडेकर पुलावरही एक तरुण मांजामुळे गंभीर जखमी झाला. माणसाच्या जिवावर बेतणाऱ्या अशा घटना केवळ पुण्यातच नाही, तर सगळीकडे घडत आहेत. त्यास सर्वसामान्य माणूसच बळी पडत आहे. मांजावर बंदी असतानाही भ्रष्टाचार करून मांजा आयात केला जातो, त्याची सर्रास विक्री होते. तरीही कोणावरही कारवाई होत नाही. पतंग उडविणाऱ्यांना आपण पकडू शकत नाही, हे खरे आहे. मात्र, मांजा विक्रेत्यांवर पोलिसांनी छापे टाकले, यावर आमचा विश्‍वास नाही. त्यामुळे आता तरी सरकारने याप्रकरणी गंभीर भूमिका घेऊन मांजाविक्री थांबविण्यासाठी उच्च पातळीवरून प्रयत्न करावेत. आमच्या बहिणीचा गेलेला जीव परत येणार नाही; परंतु तिच्यासारखी वेळ इतरांवर येऊ नये, यासाठी मांजा हद्दपार करावा.''
- दर्शना परदेशी व अपर्णा बापट (सुवर्णा मुजुमदार यांच्या भगिनी)

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
सुवर्णा मुजुमदार यांच्या मृत्यूप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवध व पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक प्रभाकर शिंदे म्हणाले, ""घटना घडली त्या दिवशी नदीपात्रात चिनी मांजाचा वापर करून कोण कोण पतंग उडवत होते, याचा पोलिस कसून शोध घेत आहेत. नदीपात्रामध्ये दहा ते बारा वर्षांची मुले पतंग उडवितात. त्या मुलांसह त्यांच्या पालकांकडे रविवारी दिवसभर चौकशी करण्यात आली. या परिसरात चिनी मांजाचा वापर करून किती जण पतंग उडवितात, चिनी मांजा कुठून आणला जातो, याचीही चौकशी केली आहे.

त्यातून अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही. नदीपात्रात पतंग उडविणाऱ्या सात ते आठ मुलांच्या पालकांना नोटिसाही बजावल्या आहेत.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com