अहमदाबाद दौऱ्यामुळे पिंपरी पालिकेचे कामकाज तीन दिवस विस्कळीत

उत्तम कुटे
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017

पिंपरीकरांची गैरसोय

महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती व इतर पदाधिकाऱ्यांची काऱ्यालये असलेला पालिका मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर हे पदाधिकारीच नसल्याने शांतता आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर, सभागृहनेते आणि इतर 54 असे जवळजवळ सभागृहातील निम्मे नगरसेवक आणि आयुक्त व इतर 11 वरिष्ठ अधिकारी (विभागप्रमुख) असा मोठा लवाजमा अहमदाबाद (गुजरात) दौऱ्यावर गेल्याने पालिका व त्यातही मुख्यालयाच्या कामकाजावर त्याचा गेल्या तीन दिवसांत मोठा परिणाम  झाल्याचे दिसून आले आहे. चार दिवसांचा हा दौरा असल्याने आता सोमवारीच काहीसे सुनेसुने व सुस्त पालिका मुख्यालय पुन्हा मस्त होणार आहे.

महापौर, सभागृहनेते, आयुक्त हे दौऱ्यावर जाणार असल्याचे माहित नसल्याने त्यांच्या भेटीसाठी आलेल्या नागरिकांना हात हलवत परत जावे लागत आहे. कराची रक्कम प्रमाणापेक्षा अधिक आल्याने ती  कमी करून घेण्यासाठी आयुक्तांकडे आलो होतो, पण ते नसल्याने निराशा झाली, असे काळेवाडी (पिंपरी) येथून आलेले शंकर वडवे यांनी सांगितले. त्यात विरोधी पक्षनेतेही पालिकेत येत नसल्याने त्यांच्याकडे कामासाठी आलेल्यांनाही काम न होता परत फिरावे लागत आहे. दुसरीकडे या पालिका अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडील कर्मचारी निवांत असल्याचे आढळले. परिणामी नागरिक आणि वाहनांनी ओसंडून वाहणाऱ्या वाहनतळानेही सुटकेचा श्वास टाकलेला आहे. वाहनतळ नेहमीपेक्षा रिकामा आहे आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकारी दौऱ्यावर गेल्याने कर्मचारी सुस्त व निवांत होते.  

महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती व इतर पदाधिकाऱ्यांची काऱ्यालये असलेला पालिका मुख्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर हे पदाधिकारीच नसल्याने शांतता आहे. अशीच स्थिती पालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांचे काऱ्यालय असलेल्या चौथ्या मजल्यावरही आहे. या दोन्ही मजल्यावरील अभ्यांगतांच्या खुर्च्याही मोकळ्याच आहेत.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :