‘पीएफ’साठी सक्तीचे योगदान कमी करण्याचा निर्णय अखेर बारगळला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफची काही टक्के रक्कम एक्स्चेंज ट्रेड मार्केट मधील निफ्टी, ईटीएफ सेन्सेक्स आणि सीपीएस मध्ये गुंतविण्यात येत आहे. सन 2015 मध्ये 5 टक्के, 2016 मध्ये 10 टक्के गुंतविण्यात आली होती. चांगला परतावा मिळत असल्याने ही रक्कम 15 टक्क्यांवर आणण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे.
- बंडारू दत्तात्रय, केंद्रीय कामगार मंत्री

प्रस्तावाला कामगार संघटनासह उद्योजक प्रतिनिधींचा विरोध

पुणे: कर्मचारी आणि कंपनीचा 'पीएफ'मधील हिस्सा कमी करण्याचा निर्णय अखेर बारगळला असून यापुढेदेखील कंपनी आणि कर्मचाऱ्यांकडून पीएफमध्ये 12 टक्केच योगदान सुुरु राहणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधी अर्थात पीएफचे व्यवस्थापन पाहणाऱ्या ‘कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना – ईपीएफओ’चे निर्णायक मंडळ असलेल्या विश्वस्त समितीची बैठक केंद्रीय मंत्री बंडारु दत्तात्रय यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पुण्यात पार पडली.

या बैठकीत, कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी अर्थात ईपीएफसाठी दरमहा सक्तीचे योगदान हे सध्याच्या मूळ वेतनाच्या 12 टक्क्यांवरुन 10 टक्क्यांवर आणण्याला कामगारांसह उद्योजकांचा विरोध झाला. कर्मचाऱ्यांच्या योगदानाप्रमाणे पीएफमधील कंपनीचे अंशदानही 10 टक्के करण्याचा निर्णय अखेर रद्द झाला आहे.

योगदानाची मर्यादा कमी करण्याबाबत अनेकांकडून आलेल्या शिफारसी लक्षात घेत केंद्रीय कामगार मंत्रालयाने हा प्रस्ताव पुढे आणला होता. यातून कामगारांकडे दरमहा खर्च व उत्पन्नाची तोंडमिळवणी करताना थोडा अधिक पैसा हाती राहील. तसेच कंपनीचे दायित्वही कमी झाल्याने तो पैसा व्यवसायवाढीसाठी वळवता येईल आणि याचा अर्थव्यवस्थेला फायदा होईल, असे या कारण मंत्रालयाने पुढे केले होते. मात्र, या प्रस्तावाला विश्वस्त समितीतील कामगार संघटनांसह, उद्योजक प्रतिनिधींनी कडाडुन विरोध केला.

विरोधानंतर अखेर निर्णय बारगळला
कर्मचारी महागाई भत्त्यासह मूळ वेतनाच्या रकमेतून दरमहा 12 टक्के योगदान कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी अर्थात ईपीएफसाठी देतो. त्याचवेळी कंपनीदेखील तेवढेच योगदान देते. त्यातील 8.33 टक्के हे कर्मचाऱ्याच्या निवृत्तीपश्चात पेन्शनसाठी आणि 3.67 टक्के हे पीएफ खात्यात जातात. शिवाय या रकमेच्या 0.5 टक्के विमा संरक्षण म्हणून ‘ईडीएलआय’साठी, ईपीएफओला प्रशासकीय शुल्क म्हणून 0.65 टक्के असे मिळून नियोक्त्याचे योगदान 13.60 टक्क्य़ांवर जाते. हे योगदान कर्मचारी व कंपनी दोहोंसाठी 10 टक्क्यांवर आणण्याचा ईपीएफओचा प्रस्ताव होता. आजच्या बैठकीत विरोध झाल्यामुळे हा निर्णय बारगळला.

ताज्या बातम्याः