धुळे: 'पंचायत राज'च्या दौऱ्यावेळी संकलित खंडणीचे अनिल गोटेंकडे पुरावे

निखिल सूर्यवंशी
मंगळवार, 18 जुलै 2017

गोटे यांच्याकडे पुरावा 
या पार्श्‍वभूमीवर समितीचे उपाध्यक्ष व आमदार गोटे यांनी सात जुलैला प्रसिद्धिपत्रक दिले. त्यात त्यांनी म्हटले, की समितीच्या पहिल्या दिवशी शासकीय विश्रामगृहात सकाळी साडेदहाला जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमक्ष समितीच्या नावाखाली प्रत्येकी सात हजार रुपये गोळा केल्याचे प्रकरण लावून धरले होते.

धुळे : भाजपचे शहर आमदार आणि राज्यस्तरीय पंचायत राज समितीचे उपाध्यक्ष अनिल गोटे यांच्या जाबजबाबातून जिल्हा दौऱ्यावर येऊन गेलेल्या या समितीच्या नावाखाली संकलित झालेल्या "खंडणी'ची लवकरच तड लागेल. काही प्रामाणिक कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांकडून "खंडणी' गोळा केली जात असल्याची तक्रार माझ्याकडे केली आणि त्याचे "रेकॉर्डिंग'ही उपलब्ध असल्याची माहिती आमदार गोटे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे. त्यामुळे "एसीबी'ला मोठा पुरावा उपलब्ध झाला असून या प्रकरणाची आता तड लागू शकेल. 

पाच ते सात जुलैला पंचायत राज समिती दौऱ्यावर येऊन गेली. तीत 23 पैकी 17 सदस्य आमदार उपस्थित होते. समितीच्या पथकाकडून कापडणे (ता. धुळे) येथे काही योजनांच्या तपासणीत अनियमितता, काही गैरप्रकार उघडकीस आणले गेले. त्याची वाच्यता विधिमंडळाच्या अधिवेशनात होऊ नये म्हणून नांदेडचे शिवसेनेचे सदस्य आमदार हेमंत पाटील यांना दीड लाखाची लाच देऊ केल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाकडून "डेप्युटी सीईओ' तुषार माळी यांना अटक झाली होती. 

गोटे यांच्याकडे पुरावा 
या पार्श्‍वभूमीवर समितीचे उपाध्यक्ष व आमदार गोटे यांनी सात जुलैला प्रसिद्धिपत्रक दिले. त्यात त्यांनी म्हटले, की समितीच्या पहिल्या दिवशी शासकीय विश्रामगृहात सकाळी साडेदहाला जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमक्ष समितीच्या नावाखाली प्रत्येकी सात हजार रुपये गोळा केल्याचे प्रकरण लावून धरले होते. समितीच्या नावाखाली साडेचार कोटींची "खंडणी' गोळा झाली. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकडून "खंडणी' गोळा केली जात असल्याची तक्रार काही प्रामाणिक कर्मचाऱ्यांनी माझ्याकडे केली. त्याचे "रेकॉर्डिंग' आमच्याकडे आहेच. खंडणी गोळा करणाऱ्या सूत्रधारांची माहिती मिळाली असून तीन वरिष्ठ अधिकारी व एक ज्येष्ठ पदाधिकारी यांचा "खंडणी' गोळा करण्याच्या कटात समावेश आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री व पंतप्रधानांकडे करेल. 

"एसीबी'ला मोठा दिलासा 
या प्रकरणी "एसीबी'कडून 28 अधिकाऱ्यांचे जाबजबाब झाले आहेत. यातून लाचेतील दीड लाखाच्या रकमेसह आरोपातील "खंडणी'बाबत तपास सुरू आहे. त्यात आमदार गोटे यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या पुराव्याबाबत माहिती दिल्याने "एसीबी'चा तपास सुकर होणार आहे. या प्रकरणी सखोल तपास होताना समितीच्या सदस्य आमदारांचेही जाबजबाब होतील, असे संकेत "एसीबी'चे नाशिक विभागीय पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी दिलेत. त्यात आमदार गोटे यांच्या जबाबासह भूमिकेकडे, तसेच ते त्यांच्याकडील पुरावे "एसीबी'ला केव्हा देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यात युतीकडून दावा होणाऱ्या "पारदर्शकते'चा कारभार सिद्ध होण्यास मदत होणार आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :