केळीच्या माध्यमातून  मिळाला सक्षम पर्याय

banana-farming
banana-farming

कोल्हापूर जिल्ह्यातील जुने पारगाव (ता. हातकणंगले) येथील ‘फॅमिली फार्मिंग प्रोड्यूसर कंपनी ने सहा वर्षांपासून परिसरातील शेतकऱ्यांचे यशस्वी संघटन केले आहे. केळीसारखे नगदी पीक निवडून शेतकऱ्यांकडे उत्पन्नाचा स्रोत कायम राहील या दृष्टीने प्रयत्न करताना कंपनीने वर्षाला सुमारे दोन कोटी रुपयांपर्यंत उलाढाल वाढवली आहे. शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून उद्योजक म्हणून घडवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. 

कोल्हापूर जिल्ह्यात जुने पारगाव (ता. हातकणंगले) हे वारणा पट्ट्यातील गाव आहे. पाराशर ऋषींच्या वास्तव्यामुळे गावाचे वेगळे महत्त्व आहे. ग्रामीण कृषी परिवर्तन हे ब्रीदवाक्‍य घेऊन गावातील उदय पाटील व त्यांच्या उच्चशिक्षित दहा शेतकरी सहकारी एकत्र आले. सन २०१४ मध्ये कृषी विभाग, महाराष्ट्र स्पर्धात्मक कृषी विकास कार्यक्रमांतर्गत त्यांनी फॅमिली फार्मिंग प्रोड्यूसर कंपनीची स्थापना झाली. जुने पारगाव, तळसंदे, पाडळी, नवे पारगाव, मनपाडळे, वाठार वारणा आदी गावांतील शेतकऱ्यांचे संघटन त्याद्वारे झाले. सलग कोपरा सभा, ग्रामपंचायत स्तरावर मार्गदर्शन शिबिरे घेऊन शेतकऱ्यांची संख्या  वाढविण्यात आली. 

केळीचा सक्षम पर्याय 
कोल्हापूर भागातील शेतकरी मुख्यत्वे ऊस उत्पादक आहे. त्याचा किमान वर्षभराचा हंगाम व त्यातून मिळणारे उत्पन्न पाहता केळीसारख्या पिकाचा सक्षम पर्याय उभा राहू शकतो हे कंपनीच्या सदस्यांना जाणवले. त्यांनी या पिकाचे अर्थकारण शेतकऱ्यांना मेळाव्याद्वारे समजून सांगण्यास सुरुवात केली. केळी लागवडीचे संपूर्ण व्यवस्थापन त्यांना समजावून देण्यात येऊ लागले. त्यातून केळीचे क्षेत्र वाढू लागले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

विक्री व्यवस्था 
खरेदीची जबाबदारी कंपनीने घेतली. बाजारभावापेक्षा किलोला एक ते दीड रुपये जास्त देऊन वर्षाला सुमारे सातशे टन खरेदी होते. त्यासाठी नामवंत कंपन्यांशी करार केला आहे. व्यापाऱ्यांनाही विक्री होते. त्यामुळे बाजारपेठेची चिंता शेतकऱ्यांना भासत नाही. खरेदीनंतर शेतकऱ्यांना तातडीने रक्‍कम दिली जाते.  मागील वर्षी महापूर आल्याने केळी लागवडीत यंदा काहीशी घट झाली असली तरी पुन्हा नव्याने शेतकरी त्याकडे वळला आहे.  

सुविधा केंद्र 
 "कृषिलां" नावाने सुविधा केंद्र उभारले आहे. तेथेच वीस टन क्षमतेचे शीतगृहही आहे. शेतकऱ्यांना आपल्याकडील अतिरिक्त माल साठविण्यासाठी अत्यल्प दरात त्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. कंपनीतर्फे शेतकऱ्यांना खतेही उपलब्ध करून देण्यात येत आहेत. एक वर्षासाठी सोयाबीनची खरेदी विक्रीही एका खासगी कंपनीच्या माध्यमातून क्विंटलला ५० ते १०० रुपये दराने करण्यात आली. सध्या सोयाबीनचे प्रमाण कमी असल्याने खरेदी थांबविण्यात आली आहे.   वर्षाला सुमारे दोन कोटी रुपयांची उलाढाल कंपनीने केली आहे. पाच टक्के नफा ठेवून कंपनीची वाटचाल सुरू आहे. उसासाठी खते पुरविण्यात येत आहेत. कृषी विभाग व अन्य संस्थांच्या तज्ज्ञांकरवी ऊस विषयक परिसंवाद घेणे, शेतकऱ्यांच्या प्लॉटसवर जाऊन त्यांना हवामानानुसार मार्गदर्शन करणे आदी उपक्रम सुरू असतात.  

 शेतकऱ्यांना प्रशिक्षण
कंपनीचे अध्यक्ष उदय पाटील म्हणाले, की केळी लागवडीबरोबरच आम्ही विनाशुल्क ॲग्री क्‍लिनिक आणि ॲग्री बिझनेस सेंटर सुरु केले आहे.  कोल्हापूर येथे हे वर्ग घेण्यात येतात. कृषी व्यवसायांना चालना देऊन युवा शेतकरी घडविणे हे या केंद्राचे उद्दिष्ट आहे. यात अनुभवी तज्ज्ञ निवडलेल्या व्यवसायांसाठी सखोल मार्गदर्शन करतात. ‘बॅंकर्स’च्या माध्यमातून प्रकल्प अहवाल बनविण्यासाठीही मार्गदर्शन करण्यात येते. उद्योग उभारणीसाठी प्रशिक्षार्थ्यांना बॅंकेकडून पतपुरवठा मिळवून देण्यासाठी सहकार्य या केंद्राच्या माध्यमातून दिले जाते. आत्तापर्यंत ३५ विद्यार्थ्यांची बॅच या प्रमाणे १४० प्रशिक्षणार्थींनी कृषी उद्योजक म्हणून प्रशिक्षण घेतले आहे. केंद्रात माती व पाणी परीक्षण,  जैविक खते व कीडनाशके,  पाॅलिहाउस, हायड्रोपोनिक्‍स युनिट, अवजारे केंद्र, विद्राव्य खते युनिट, शेळीपालन, कुक्कुटपालन, मुरघास, कृषी पर्यटन, रोपवाटिका, सोयाबीन प्रक्रिया उद्योग, डाळ मिल, रेशीमशेती, मधमाशीपालन, मशरूम उत्पादन, फळबागा लागवड आदी व्यवसायांच्या प्रशिक्षणाची सोय आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com