esakal | शेतकऱ्यांनो, आता घरबसल्या नोंदवा पीक नुकसानीची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

पीक विमा योजना

शेतकऱ्यांनो, आता घरबसल्या नोंदवा पीक नुकसानीची माहिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाले आहे. पण विमा कंपन्यांना त्यांच्या नियमानुसार दिलेल्या मुदतीत नुकसानीची माहिती देता आली नाही, केवळ या एकाच कारणाने विम्याच्या लाभापासून शेतकरी वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने (central goverment) दिलासा दिला आहे. यानुसार पंतप्रधान पीक विमा योजनेसाठी (prime minister crop insurance scheme) खास ॲप विकसित केले आहे. याला ‘क्रॉप इन्शुरन्स ॲप’ असे नाव दिले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता खरीप हंगामातील पीक नुकसानीची माहिती घरबसल्या नोंदविता येणार आहे. (Farmers now sit at home and report crop loss information)

खरीप हंगामातील पिकांसाठी गेल्या वर्षीपासून पंतप्रधान पीक विमा योजना लागू केली आहे. या योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्तीने पिकाच्या नुकसानीची माहिती ही नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आता विमा कंपन्यांना देणे बंधनकारक आहे. परंतु या नियोजित कालावधीत अनेक शेतकरी हे त्यांच्या पिकाच्या नुकसानीची माहिती देऊ शकत नव्हते. विमा कंपन्या नेमका याचाच फायदा उठवत, पात्र शेतकऱ्यांचेही विम्याचे प्रस्ताव नाकारत असत. परिणामी शेतकऱ्यांना अगोदरच झालेल्या पीक नुकसानीचा फटका बसत असे आणि आणि त्या नुकसानीची भरपाईही त्यांना केवळ तांत्रिक कारणाने मिळत नसे. यामुळे शेतकरी कर्जाच्या बोज्याखाली दाबले जात असत. यावर मार्ग काढण्यासाठी आणि अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक नुकसानीचा विमा मिळण्यासाठी केंद्र सरकारने हे खास ॲप विकसित केले असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर बोटे यांनी सांगितले.

हेही वाचा: मणिपूर सरकारचं चानूला 1 कोटीचं बक्षीस, मुख्यमंत्र्यांची घोषणा

पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, अतिवृष्टी, पूरस्थितीने पिकाचे नुकसान झाल्यास, ढगफुटी आणि वीज कोसळल्यामुळे लागणाऱ्या आगीमुळे पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई मिळत असते. राज्यात सध्या अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना आता त्यांच्या पिकाच्या नुकसानीची माहिती ही या ॲपच्या माध्यमातून घरबसल्या विमा कंपन्यांना निश्‍चित मुदतीत देता येणार आहे.

पुणे जिल्ह्यात १० हजार शेतकरी विमाधारक

पुणे जिल्ह्यातील १० हजार ३०० शेतकऱ्यांनी चालू वर्षीच्या खरीप हंगामातील पिकांचा विमा उतरविला आहे.ही संख्या पीक कर्जाचा लाभ न घेतलेल्या शेतकऱ्यांची आहे. याव्यतिरिक्त पीक कर्जाचा लाभ घेतलेल्यांपैकी किती शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकाचा विमा उतरविला आहे. याची आकडेवारी अद्याप एकत्रित केलेली नाही. पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही विमा योजना ऐच्छिक आहे. त्यामुळे हा आकडा बॅंकाकडून मिळणे अद्याप बाकी आहे.

शेतकऱ्यांनी आपापल्या पीक नुकसानीची माहिती ही पिकाचे नुकसान झाल्यापासून ७२ तासाच्या आत विमा कंपन्यांना कळविणे अनिवार्य आहे. यासाठी शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स ॲप, विमा कंपन्याचे टोल फ्री क्रमांक, बॅक, कृषी व महसूल विभाग यापैकी कोणत्याही एका यंत्रणेला नुकसानीची माहिती कळविली पाहिजे. ही माहिती देताना सर्वे नंबर आणि नुकसानग्रस्त क्षेत्राचा तपशील कळवणे आवश्‍यक आहे.

- ज्ञानेश्‍वर बोटे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, पुणे.

loading image
go to top